तो चिमुरडा जे काही सांगत होता ते ऐकून मला ठीक १७ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा मणिबेलीत गेलो होतो, त्याची आठवण झाली. तशी ती का व्हावी याला काही कारण नव्हतं. असेलच तर ते माझ्या समोर अथांग पसरलं होतं. १९९० साली मी पहिल्यांदा तिथं गेलो तेंव्हा नदीचं पात्र अवघं २० मीटर खोलीचं होतं. त्यावेळी ते महाकाय धरण अवघ्या २७ मीटरवर होतं. त्यावेळी एका छोट्या डुंगीतून आम्ही ती नदी ओलांडली होती. आता तिथं एक महाकाय जलाशय झाला होता. आता ती नदी डुंगीतून ओलांडण्याची कल्पनाही अंगावर शहारे उमटवून गेली. आणखी एक गोष्ट होती. त्यावेळी ती नदी वहात होती. आत्ता मात्र ती निशब्द होती. तेंव्हा आणि आत्ता समान असणारी एकच गोष्ट होती: युगानुयुगे त्या नदीने आधार दिलेले जीवन आजही तसंच होतं जसं तेंव्हा, १७ वर्षांपूर्वी, मला जाणवलं होतं. तसंच हा शब्द मी अत्यंत जाणीवपूर्वक वापरतोय.
जीवन बदललं आहेही आणि नाहीही. ते तसंच आहे, कारण त्यातील कष्ट आजही तसेच आहेत. ते बदललेलं आहे, कारण इतरांच्या सुखी जीवनासाठी आता त्यांच्यावर कष्ट लादले गेले आहेत. ती घरं त्यांच्या आकारापुरता विचार केला तर तशीच आहेत, जशी तेंव्हा होती. त्यांच्या जागेचा, ठिकाणाचा विचार केला तर मात्र ती बदलली आहेत. आधी ती नदीच्या किनाऱ्यावर होती, आता ती तिथून वर १५० मीटरवर गेली आहेत. नदी तशीच आहे, फक्त पाण्याचा विचार केला तर. प्रवाहाच्या जिवंतपणाचा विचार करायचा झाला तर मात्र नदी बदलली आहे. आता ती वहातच नाही. अन्न तेच आहे, कारण जंगल आहेच. अन्नाची उपलब्धी आणि प्रमाण यात मात्र खचितच बदल झाला आहे. मोसमांचा विचार केला तर शेती तशीच होते. उपज म्हणायची झाली तर मात्र त्यातही बदल झाला आहे. जमीन तर नाहीच. जगण्याविषयीची वृत्ती तशीच असल्यानं जीवन तसंच आहे. भविष्याचा विचार करावयाचा झाला तर मात्र जीवन बदललं आहे. आधी ते चिरंतन आशादायी असायचं, जीवन जो-जो आनंद आणेल तो घ्यायचा, यात आधी कसलीही सीमा नव्हती. आत्ता मात्र तसं नाही. आता जगण्याच्या मर्यादा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ठळकपणे दिसून येतात.
मी भादल या गावांत आहे. त्या धरणाखाली बुडणारं महाराष्ट्रातलं शेवटचं गाव. मी गावात असल्याचाच हा परिणाम असावा की सरकारी हिशेबात हे गाव बुडालंही आहे, हे माझ्या ध्यानातही येत नाहिये. करण नावाच्या या मुलासोबत मी एका ओंडक्यावर बसलो आहे, त्याच्या आवडत्या शाळेपाशी. सुर्य अजून अस्ताला जायचा आहे. पण, त्या आणि त्यासारख्या अनेक धरणांनी आणलेल्या `प्रकाशा'पासून दूर असल्यानं, मी आकाशात अनेक चांदण्या आणि चंद्रालाही पाहू शकतोय. माझ्या घराच्या गच्चीवरून दिसतात त्यापेक्षा अधिकच चांदण्या इथं दिसताहेत. `प्रकाशप्रदुषण' एक क्षणभर माझ्या मनात चमकून जातं. पण त्या चिमुरड्याच्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी तो विचार मनाच्या अंधारात झटकून टाकतो. त्या गाण्यात या नदीनं माणसावर उधळून दिलेल्या जीवनानंदाबद्दल स्तुति असते. `मां रेवा...' अशी त्या गाण्याची सुरवात असते. गाणं शेवटाकडं येतं, तसं नकळत मीही ते म्हणायला लागतो. तो चिमुरडा ज्या पट्टीत ते गात असतो ती काही केल्या मला पकडता येत नाही. माझ्या त्या `अगोचर'पणानंही तो इतका आनंदी झालेला असतो की, तो त्याच्या बोलक्या डोळ्यातून ओसंडून वाहत असतो. काही क्षणांतच त्याचे मित्र आमच्या सुरांत सूर मिसळतात.
गाणं संपतं आणि तो मुलगा मला एक कहाणी सांगू लागतो. भादलच्या या जीवनशाळेत तो त्याच्या मध्य प्रदेशातील गावातून आलाय. दोनच दिवसापूर्वी तो जत्रेसाठी तोरणमाळला गेला होता. अशा एकाद्या मोठ्या जत्रेसाठी जाण्याची त्याची ती पहिलीच वेळ आहे. तिथं पूजा केली आणि मिठाई खाल्ली, असं तो मला सांगतोय. जत्रेनंतर दोन दिवसांची पायपीट करून तो भादलला परतलाय. एकाच ठिकाणी इतकी माणसं पाहिल्याचा आनंद त्याच्या शब्दागणीक व्यक्त होत असतो. पण त्याचवेळी, त्याच्या जीवनशाळांच्या संमेलनाला आपल्याला जाता आलेलं नाही याचं, माझ्या भाषेतलं, वैषम्यही आहेच. मीच त्याला विचारलं होतं, `तू संमेलनात होतास का?' `नाही, सर, या यात्रेमुळं मला येता आलं नाही,' तो निराश सुरात सांगतो. मग त्याच्या लक्षात येतं की मी तिथं त्या संमेलनाला होतो. तो एकदम माझी मुलाखत सुरू करतो. कसं झालं संमेलन? काय-काय झालं तिथं? ताई तिथं होती का? (ताई म्हणजे, मेधा पाटकर.) भादलच्या जीवनशाळेच्या मुलांनी काय-काय केलं? बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीसारखे त्याचे प्रश्न येत असतात. मी एका प्रश्नाचे उत्तर पूर्ण करत नाही, तोवर दुसरा येत असतो.
माझ्या मनात संमेलन जागं होतं. चारशेहून अधिक मुलांसोबत तीन दिवस जगणं इतकं आनंददायी असू शकतं याची मी कल्पनाही केली नव्हती. त्या मुलांना खो-खो, कबड्डी, धावणे यासारख्या स्पर्धांत भाग घेताना पाहणं हा इतका समृद्ध करणारा अनुभव असतो हे त्या दिवसांत मला पहिल्यांदाच उमजलं. सगळी मुलं बुडणाऱ्या किंवा बुडालेल्या गावांतील. दिवस या स्पर्धांचे होते तर रात्री ढोल, गाणी, नाटकं, नाच यांनी सजलेल्या. चहूबाजूंनी सातपुड्याचे डोंगर घेऊन वसलेल्या त्या गावांत. वर आकाशाची सावली. पाठीशी ते डोंगर. गावाचं नावही सुरेख. त्रिशुल. तिन्ही बाजूंनी नद्या वाहात असल्यानं.
संमेलनासाठी काही मुलं दोन दिवसांची पयपीट करून आलेली. संमेलनाची व्यवस्था शिस्तबद्ध. एकेका शाळेची सोय गावातल्या एकेका घरात. आमच्यासारखी पाहुणे मंडळीही अशाच एका घरात. साधंच पण चवदार जेवण. खिचडी, डाळ-रोटु, बिनदुधाचा चहा. तीन दिवसांचं हे संमेलन झाल्यावर आम्ही नदीकिनाऱ्यावरील भुशा या गावी गेलो आणि तिथून भादलला आलोय.
हे सारं मी करणला सांगतोय, तेवढ्यात जेवणासाठी हाळी आली. आम्ही निघालो. माझ्यासमोर एक आश्चर्य उभं आहे. त्या गावच्या कारभाऱ्याचा कुत्रा. `कोप्या'! हे नाव त्याच्या स्वभावावरूनच त्याला पडलंय. माझ्यासाठी आश्चर्य हे आहे की, त्यानं मला ओळखलंय. सहा महिन्यांपूर्वी मी तिथं गेलो होतो, तेंव्हा तो मला भेटला होता. माझ्यासोबत आहे तो त्याचाच मित्र, रोहन. आधी रोहनच्या छातीपर्यंत उड्या मारुन प्रेम व्यक्त केल्यानंतर कोप्या माझ्याकडे वळतो. आधी मी घाबरलो; पण मग त्याने न भुंकता माझ्या छातीपर्यंत उडी मारल्यावर माझ्या ध्यानी येतं की, आपल्याला काही धोका नाही. मी त्याला `कोप्या' अशी हाक मारतो. तो शेपूट हलवू लागतो. रोहन मला सांगतो की, कोप्यानं मला ओळखलं आहे बहुदा.
गावातल्या काही लोकांशी गप्पा करत सकाळ सुरू होते. इतके कष्ट असतानाही ते अजून या गावांमध्ये का राहताहेत? अगदी स्वाभावीक प्रश्न आधी येतो. मग सुरू होते एक कहाणी. जंगल आमच्या जगण्यात कसं महत्त्वाचं आहे आणि नेमकं तेच कसं पुनर्वसनाच्या जागी नाहीये आणि म्हणूनच मूळच्या या गावातील कष्टांपेक्षा तिथलं जगणं केवळ अशक्य कसं आहे, याची कहाणी. पुनर्वसनाच्या गावांमध्येही दर पावसाळ्यात `बुडिताचा' सामना कसा करावा लागतोय हे ती माणसं सांगू लागतात. हा एक मोठा बदल आहे गेल्या १७ वर्षांतील. तेंव्हा ही माणसं म्हणजे नुसत्या सावल्या वाटायच्या, मलाच वाटून गेलं. कहाणी तीच आहे. गेल्या काही वर्षांपासून. फरक इतकाच, की आधी त्यांना पुनर्वसनाची काही आशा होती, आता ती पूर्ण संपून गेलीय.
आम्ही खाली नदीच्या, किंवा आत्ता जे काही आहे त्याच्या, किनाऱ्याशी येतो. प्रवास पुढे सुरू होतो. पहिला थांबा आहे जलसिंधी. असं म्हणतात की, नदी उगमापासून निघाल्यानंतर आधी इथं थांबली होती. जलसिंधी येताच मला आठवण येते ती १९९७ सालची. पुराचा सामना करत झालेल्या सत्याग्रहाची. हे गाव लुहाऱ्याचे. त्या काळात `टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये पान एकवर आलेल्या एका बातमीचा नायक. आत्ता तो शेतात आहे. त्याला निरोप जातो आणि आम्ही त्याचा भाऊ आणि इतर काही गावकऱ्यांशी बोलत बसतो. एकच वाक्य त्यांची कहाणी सांगण्यास पुरेसं आहे:
`जहां हमारे जानवर चरनेके लिये भी नही जाते थे, वहां हम आज रह रहे है.'
`का?'
`सरकारला विचारा.'
लुहाऱ्या येतो तेंव्हा त्यात आणखी एका वाक्याची भर पडलेली असते.
`यहां लोग लेकरही जाते है, कोइ कुछ देकर नही जाता.'
त्याचे हे उत्तर असते माझ्या एका प्रश्नावर. लुहाऱ्यावर `टाईम्स'मध्ये जशी बातमी आलेली असते, तशीच एक फिल्मही झालेली आहे. ते दोन्ही पाहिल्यावर काय वाटलं, असं मी त्याला विचारलेलं असतं.
पुनर्वसन नाही, बुडित तर दरवर्षीच आहे. या साऱ्या अन्यायाविरुद्ध हाती शस्त्र (इथं त्याचा अर्थ केवळ तीर-कमठा किंवा दांडकी इतकाच असतो, फार तर दगड) घ्यावं असं कधी वाटलं नाही का, मी विचारतो. क्षणाचाही विलंब न लागता उत्तर येतं, `नाही.'
`का?' मी विचारतो.
`क्या होगा? यहांके चार-पांच और वहांके चार-पांच मारे जायेंगे. उसके बाद तो सरकार फौज लेकरही आयेगी. फिर कहां जायेंगे?'
त्यांची मनस्थिती उमजून मी पुढचा प्रश्न विचारणे टाळतो: सरकारचं संख्याबळ आणि सामर्थ्य यामुळे त्यांनी हिंसाचार केला नाही का?
डनेल या पुढच्या गावात नूरजी या वृद्धाकडून मला याही प्रश्नाचे उत्तर मिळते. काही काळ नूरजीनं कडव्या डाव्या संघटनेत काम केलेलं आहे. तो म्हणतो, `चर्चा केल्यानेच आम्हाला या काळात किमान काही लोकांसाठीचं पुनर्वसन मिळालं आहे. बाकीचे लोक इथं डोंगरांवर वर चढून राहू तरी शकतात. आम्ही हिंसाचार केला असता तर हे शक्य झालंच नसतं. मरण हाच निकाल ठरला असता.'
त्या आधी आम्ही मुखडी या गावात थांबलो होतो. तिथं मला एक `प्रमाणपत्र' मिळालं होतं. या लोकांच्या आंदोलनातील एक तपोवृद्ध सदस्य राण्या यांच्या घरी आम्ही होतो. बीडी देण्याऐवजी त्यांनी गुडगुडी दिली. माझ्यासोबतच्या मित्रांना झुरकाही घेता आला नाही; मला तो जमला. ते पाहून राण्या म्हणाला, `हा माणूस खरा आदिवासी आहे. बाकी सारे शहरी आहेत.'
मणिबेली हा पुढचा आणि शेवटचा थांबा आहे. हे गाव महाराष्ट्रातील बुडालेलं पहिलं गाव. (इतक्या प्रवासानंतर आणि इतकं ऐकल्यानंतर बहुदा माझ्या धारणेत बदल होऊ लगलेला आहे. म्हणून मी `बुडालेलं' असा शब्दप्रयोग करतोय.) आजही तिथंच आहे. १९९० साली मी तिथं भेटलो होतो तेंव्हाचे सरपंच नारायण तडवी यांना. आजही तेही तिथंच आहेत. किमान ५० घरं तिथं आहेत. (मला आठवतं, आम्ही त्यावेळी त्यांना झोपड्या म्हणायचो. ज्यासाठी वापरलेलं सागच मुळी तेंव्हा लाखांत मोजलं जायचं.) रात्रीचा अंधार आहे. वर चंद्रबिंब उगवलंय. या गावात असलेल्या जीवनशाळेची मुलं ढोल वाजवत फेर धरून नाचताहेत. होळीची ती नांदी असते. वातावरणात `भिर्रर्र' ही शीळ घुमत असते.
जीवन त्याचे खेळ करत असते. ते येताना बुडितही आणते आणि वर डोंगरांवर चढून जगण्याची शक्ती, प्रेरणाही देत असते.
आम्ही परतीच्या प्रवासात आहोत. मोटरबोटीखाली असणारी नदी शांत असते. एका मृत नदीची कल्पनाच मला हादरवून जाते. तिच नदी जी युगानुयुगे काठावरच्या आदिवासींसाठी जीवनदात्री ठरलेली असते.
इथं ताई आली तेंव्हा तिनं एक गाणं रचलं होतं, `धरण आलं रे...'
हा प्रवास आता `धरण झालं रे...' पर्यंत येऊन पोचला आहे. जीवन तसंच आहे.
पण खरंच तसंच आहे का?
माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं.