तो परतला त्या वेळी क्लबरुम रिकामी झाली होती. खाली सिगारेटच्या थोटुकांचा ढीग व टेबलावर अस्ताव्यस्त पत्ते.इतक्या वेळ निरनिराळ्या भावना धारण करून नाचणारे पत्ते आता निर्जीव पडले होते. ना सुख, ना दु:ख, ना अर्थ. प्रत्येकाने आपला अर्थ आपण पाहायचा.
बाहेर आता पावसाची सौम्य झिमझिम अंधाराच्या पाटीवरील गिजबिजाटाप्रमाणे सुरू झाली होती. केळकर कसाही छत्री विसरून गेला होताच. दत्तूने ती छत्री उचलली व तो एकटाच घराकडे चालू लागला.
ओलसर रस्ता सुस्त पडलेल्या सापाप्रमाणे चकाकत होता. त्यावरील दिव्याच्या प्रतिबिंबाच्या वाकड्यातिकड्या रेषा सळकेच्या वेदनेप्रमाणे दिसत. मध्येच मोटारीच्या लाल दिव्यांचा शिडकावा दिसे. त्यामुळे लालनिळ्या जखमा मधूनमधून फुटल्याप्रमाणे दिसत.
तो घरी आला. छत्री बंद करून ती कोपऱ्यात ठेवतो न ठेवतो तोच मोहनचा हात धरून त्याला ओढत आणीत सुधा बाहेर आली. नेहमीच्या तक्रारीचा खास अंक तयार होता. मोहनने शेजारच्या शिंपिणीला चिंध्यांची बाहुली म्हटले होते, व ती बोंबलत आली होती. नव्या शर्टावर त्याने तळहाताएवढा शाईचा डाग पाडला होता व टारझन म्हणून कपड्यांच्या दोरीला लोंबकळताच दोर तुटून ढीगभर कपडे अस्ताव्यस्त पडले होते. व...
आपण तो लालनिळ्या रंगाच्या जखमा अंगावर घेणारा रस्ता आहोत व आपल्यावरून माणसे पचक पचक पावले टाकीत चालली आहेत, असे दत्तूला वाटले. त्याने कोट खुंटीवर ठेवला व तेथेच निर्विकारपणे तो खुर्चीवर पसरला.
"पण बेबी कुठाय? त्याने त्रासिकपणे विचारले. पत्नी, मुलगा, मुलगी. निदान येथे तरी चांगला सिक्वेन्स जमू द्या! दूर कुठे तरी रेखा अशीच पाहात बसली असेल.