(मनातले विचार कागदावर उतरविण्याची पहिलीच वेळ .. बघु कसे जमतेय )
आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मुर्ति होय. आई हाच माणसाचा पहिला गुरु होय. आईचे अन्तःकरण जात्याच श्रद्धायुक्त असते. स्त्री जेव्हा मुलाला जन्म देते, तेव्हा ती स्वतःला अतिशय भाग्यवान समजते. मुलान्ना लहानाचे मोठे करतानाच ती त्यान्च्यावर चांगले संस्कार करत असते. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात तर ती हेच बोलते. माझ्या मुलांची परीक्षा, त्यांचे क्लास, त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी याविषयीच बोलत असते. हल्लीच्या परीस्थीत तर मुलांना चांगल्या मित्रांची गरज असते. खरे तर मुलांनी आपल्या वडीलांना जवळचा मित्र समजावे आणि मुलिंनी आईला. पण प्रत्यक्षात असे फ़ार क्वचित घडते. प्रत्येक मुला-मुलींना आपली आई फ़ार कडक आहे, आपल्याशी ती फ़ार वाईट वागते असे वाटते. काहिंना तर आपली आई आडाणी आहे, तिला काहीच कळत नाही असे वाटते. कित्येकदा तर " तु गप्प बैस, तुला ह्यातले काहिच माहित नाही" हे वाक्य मुले अगदी सहज बोलून जातात. आईचे विचार, तिच्या भावना जर तिच्या मुलांनी, नवऱ्याने जर समजुन घेतल्या तर त्या माउलीला केवढा आनंद होईल. काही घरातून तर आईची किंमत फ़ार कमी असते. कारण कधितरी तिच्या नवऱ्याने कळत-नकळत मुलांसमोर बोलुन ती कमी केलेली असते. मुलांच्या प्रगतिसाठी आईवडील दोघे रात्रंदिवस झटत असतात. आपल्या मुलांना व नवऱ्याला थोडे जरी बरे वाटत नसेल तर आई फ़ार हवालदील होते. लगेचच ती देवाजवळ हात जोडून म्हणते "देवा, जे काय व्हायचे असेल ते मला होवू दे. पण माझ्या मुला-बळांना, नवऱ्याला आधी बरे वाटू देत. त्यांना सतत निरोगी आणि सुखी ठेव."