तेजस्विनी-५
"अहो झेडपी मेंबर, अर्धा कप चहा मिळेल का ?" राजाभाऊंनी सुरेखाताईंना म्हटले.
राजाभाऊंची रविवारच्या सकाळी आळसांत सुरू असलेली सगळी कामे व मध्येच सोडलेले चहाचे फर्मान त्यांना नवीन नव्हते.
नवीन होते ते त्यांनी दिलेले संबोधन....
लटक्या रागाने वर्तमान पत्रातून डोके काढून त्यांनी मानेला झटका दिला व म्हणाल्या,
"झेडपी मेंबरची स्वयंपाकीण बाई आज रजेवर आहे, चहाचा भत्ता रोखीत घेऊन बाहेरूनच चहा प्यावा आज राजेसाहेबांनी."
वैशाली अजून झोपलेलीच होती. आजींची अंघोळ आटपून देवपूजेची तयारी सुरू होती. त्यांची देवपूजा आटोपताच भिजत ठेवलेले पोहे फोडणीला टाकायचे होते. तोवर पटकन आपण अंघोळ करून घ्यायच्या विचारांत असतानाच राजाभाऊंचे फर्मान सुटले होते. आता अजून पंधरा मिनिटांची खोटं ह्या विचारांत असतानाच राजाभाऊ उठून उभे होत म्हणाले,
"मग असंच करावं म्हणतो.... " "हो, तेव्हढीच एखादी सिगारेट फुंकायला मिळेल ते सांगा की" त्या परत लटक्या रागाने म्हणाल्या.
अधून मधून लहर आली की राजाभाऊ धूम्रपान करीत ते आता सुरेखाताईंच्या चांगले सवयीचे झालेले होते. त्यांच्याकडे मिश्कीलपणे तिरपा कटाक्ष टाकत राजाभाऊंनी पायांत चपला सरकवल्या व घातलेल्या बुशकोटाची बटणे लावत लावत बाहेर पडायची तयारी केली. सुरेखा ताई वळून स्वयंपाक घरापर्यंत पोहचल्या नसतील एव्हढ्यात राजाभाऊंचा " अरे... तू इकडे कुठे ?" असा आवाज आला म्हणून त्या मागे वळल्या. बघतात तर अंगणात प्रियांक मोटरसायकल स्टॅंडवर लावण्याच्या तयारीत होता.
"बाबांनी आज मीटिंग लावलीय दुपारी, तुम्हा दोघांना बोलवलंय ३ वाजता" लावलेली बाइक स्टॅंडवरून काढत तो बोलला.
एक क्षण काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने त्या तश्याच उभ्या होत्या. "हो, नक्की येऊ म्हणून सांग...." पाठमोऱ्या राजाभाऊंचे शब्द त्यांनी ऐकले.
'चला, रविवार सार्थकी लागला' असा मनातल्या मनात विचार करत त्या पटकन न्हाणीघरात शिरल्या.