ट्रेकिंगमधल्या कसलेल्या सिद्धांचा गड तो सिद्धगड असे वर्णन वाचले होते सिद्धगडाचे, त्यामुळे तिकडे जाण्याचे बरेच दिवस मनात होते. पण दोन दिवसांचा हा ट्रेक एका दिवसात वा रात्र-दिवसात कसा बसवावा असा प्रश्न होताच.
अखेर शनिवारी १ जुलैला गिरी, कूल, आरती, भक्ती, मिहिर आणि मी असे पाच जण सायंकाळी पाचच्या नागरकोईल एक्सप्रेसने पुण्याहून निघालो. कल्याणला इंद्र ( दत्तराज ) आणि नरेश आम्हाला भेटणार होते. आम्हाला नारिवली या गावी जायचे होते. तिथे कर्जतहून जाणे हे पुणेकरांना जवळचे आहे पण तशा सोयीस्कर बस नाहीत संध्याकाळी पाचनंतर.