सल (भाग- २)

सल (भाग- १) वरुन पुढे चालू.


-------


दुसऱ्या दिवशी सकाळच्या एकाही लेक्चरला मीता हजर नव्हती. दुपारी प्रॅक्टीकलला ती आली पण आपल्याच विचारांत हरवलेली होती.


"मीता, मला बोलायचय तुझ्याशी, आपण नंतर कॅन्टीन मधे भेटू."
ठरवल्याप्रमाणे मीता कॅन्टीन मधे आली. मी तिला रियाझ बद्दल छेडलं. कुठे भेटला, काय करतो, हे घरी चालणार आहे का? अनेक प्रश्न विचारले.


मीता नेहमी सारखीच शांत दिसली पण तिच्या शांतपणात एक प्रकारची बेफिकिरी होती.


"बस स्टॉपवर भेटला. अंधेरीला पार्ट टाइम जॉब करतो. बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे. मला पहाताक्षणीच प्रेम बसल त्याच माझ्यावर. खूप प्रेमळ आहे. गोवंडीला त्याच्या मोठया भावाबरोबर रहातो. बाकीच कुटुंब उत्तर प्रदेशात असतं. फार चांगला मुलगा आहे, आम्ही असेच फिरणार नाही काय, लग्नही करणार आहोत. माझी खात्री आहे की ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला चांगली नोकरी लागेल आणि मलाही, मग दोघे मिळून आमच चांगलं चालेल."


"हे काय अगदी सिनेमातल्या सारख बोलत्येस? एखादा माणूस आवडणे, त्याच्यावर प्रेम बसणे आणि त्याच्याशी आयुष्यभराची साथ जोडणे या वेगळ्या गोष्टी आहेत गं, आणि घरच्यांच काय? तुझ्या डॅडना चालेल का?"


"हं, तू प्रेमात नाहीस ना म्हणून असं रुक्ष बोलत्येस," मीताचा चेहरा क्षणभर पालटला. "डॅडना नाही चालणार. मला माहित्ये पण धोका पत्करायला मी तयार आहे आणि पुढे मागे सर्व एकत्र होतात."


वाटलं हिला गदागदा हलवाव आणि म्हणाव, जागी हो. कसलं स्वप्न बघत्येस? फ्लॅट मधे वाढलेली तुझ्यासारखी मुलगी गोवंडीच्या चाळीत रहाणार आहे का? काय माहिती आहे त्याच्या कुटुंबाची, माणसांची की तू खुशाल पुढच्या आयुष्याची चित्रं रंगवत्येस. मीतासारखी समंजस मुलगी असला वेडेपणा करु शकते यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मी गप्प राहिले. फक्त एवढचं म्हंटल की, "घाई करु नकोस. शेवटचं वर्ष आहे, अभ्यासात लक्ष ठेव."


त्यानंतर मीता पार बदलून गेली, कधी लेक्चरनां दांडी, कधी प्रॅक्टीकल्सना. हजर असली तरी आपल्याच नादात. संध्याकाळ होण्याची वाट पहात. रोज संध्याकाळी रियाझ तिला घ्यायला यायचा. एव्हाना ही गोष्ट ग्रुप मध्ये सर्वांच्या लक्षात आली होती, माझा ग्रुपच नाही तर प्रोफेसर, लेक्चरर यांनाही कुणकुण लागली होती. कधी कधी मीताचा प्रचंड संताप यायचा. माणसाने इतक वेड व्हाव की चांगल्या वाईटाचा विचारच सोडून द्यावा, अनेकदा तिच्या वागण्याच आश्चर्यही वाटायच.


असच एकदा रागाच्या भरात मी तिला म्हंटल, "मीता, काय लावल आहेस हे तू? अक्कल गहाण टाकली आहेस का? मला वाटतय की एक दिवस सरळ तुझ्या मा ला फोन करावा आणि सांगाव तुझ्या बद्दल. त्या दोघांना कल्पनाही नसेल की तू कॉलेजचा वेळ कसा घालवतेस याची."


"नको नको असलं काहीतरी नको करुस. माझं घरातून बाहेर पडणं बंद होऊन जाईल. काय आनंद आहे तुला त्यात? माझ खूप प्रेम आहे रियाझवर पण देईन अभ्यासावरही लक्ष," मीताने मनधरणी केली.


त्यादिवसा नंतर ती आमच्या पासून दूर दूर राहू लागली. वर्गात लांब बसायची, कॅन्टीनमधे भेटणं नाही, दिलखुलास बोलणं नाही आणि आठवडया दोन आठवडयात पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मीताची गैरहजेरी वाढतच चालली होती. त्यातच सेमिस्टर परीक्षा आल्या...मीताची गैरहजेरी इतकी जास्त झाली होती की तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली.


"आपल्याला नसत्या भानगडीत पडायचं काही कारण नाही, आणि तूही नको तिथे नाक खुपसायला जाऊ नकोस," अशी ग्रुपमधे प्रत्येकाची भावना होती. तरीही राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं की आता काय होणार? किती दिवस घरच्यांपासून ही गोष्ट लपून रहाणार?


परीक्षा संपल्या, शेवटचं सेमिस्टर सुरु झालं, मीताचा काही पत्ता नव्हता. तिच्या घरी फोन करुन उगीच आपल्याला नको त्या चौकशीला समोर जायला नको म्हणून कधी फोनही केला नाही...आणि मग एके दिवशी अवचितच मीता आणि रियाझ कॉलेजमधे भेटायला आले.


अंगावर साडी, गळ्यात एक काळा पोत आणि तोंडभर हसू घेऊन मीता उभी होती, "आम्ही निका केला..दोन दिवसांपूर्वी. तुम्हा सगळ्यांना भेटून सांगावसं वाटलं."


"पण घरी कधी सांगितलस?"


"घरी कुठे सांगितलय? पळून जाऊन केलं. मा ला चिठ्ठी ठेवली होती, त्यांना नक्कीच कळलं असणार. आज जाऊ घरी असं रियाझ म्हणतोय पण डॅड घरात घेणार नाहीत हे मला माहित्ये."


"अगं पण मीता...."


"मीता नाही माहताब. निका पढण्यापूर्वी धर्म बदलला." मीता म्हणाली.


मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. मीताचं इतक्या दिवसांपासूनच वागण पाहिलं तर हे सर्व अपेक्षितच होतं. यापुढे तिला फार काही विचारण्यात अर्थ आहे असही मला वाटत नव्हतं. फक्त "कॉलेजच काय करणार?" एवढं मात्र विचारुन घेतल. पण त्यावरही अजून काही ठरवलेलं नाही असं बेफिकिर उत्तर मीताने दिलं.



त्यानंतर कित्येक महिने, वर्षे मीताची भेट झाली नाही. मी माझ्या आयुष्यात व्यस्त झाले होत. लग्न, नोकरी, घर यासगळ्यात मीताची आठवणही काढायलाही वेळ नव्हता आणि मग एक दिवस अचानक माझी तिची भेट अंधेरी स्टेशनवर झाली. जुना पंजाबी ड्रेस, विस्कटलेले केस, खांद्यावर शबनम आणि कडेवर एक दिड वर्षांच बाळ.


"कित्ती बदलली आहेस तू मीता. ओळखलच नाही बघ तुला. कशी आहेस? काय करतेस? आणि हे बाळ कोण? मुलगा की मुलगी? कुठे निघाली आहेस? आणि रियाझ काय म्हणतो?" मी एका दमात सगळे प्रश्न विचारुन घेतले.


मीताने नेहमीसारख स्मितहास्य केलं पण त्यात एक प्रकारचा विशाद होता. मला कससच वाटून गेल.


"ही सारा. सव्वा वर्षांची आहे. रियाझ दुबईला असतो. तिथे नोकरी करतो."


"बरं झालं ना. तू का नाही गेलीस? की जाणार आहेस लवकरच?"


"नाही गं. तलाक देऊन गेला. आपलं जमतं नाही, तू आणि मी भिन्न परिस्थितीतून आलो आहोत असं म्हणायला लागला. मी तयार होते गं जमवून घ्यायला. सारा फक्त चार महिन्यांची होती. तेव्हापासून मा कडे असतो आम्ही दोघी. डॅड बोलतही नाहीत कधी बोललेच तर म्हणतात, तुझ्यामुळे आमची लाज गेली. धाकटया बहिणीच्या लग्नात अडथळे येतील. सगळीकडे छी थू झाली. आता आणि हे आणखी एक लोढणं गळ्यात बांधून घेतलं आहेस," मीताच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.


समोरच्या प्लॅटफॉर्मवरुन ट्रेन धडधडत गेली की मीताच्या गोष्टीने पायाखालची जमीन थरथरली ते नाही सांगता यायचं.


"तू काही करतेस का मीता? म्हणजे नोकरी वगैरे?"


"हो. हल्लीच एके ठिकाणी असेंब्लरचा जॉब लागला आहे."


"असेंब्लर?"


"मी कुठे ग्रॅज्युएशन केलं? जी मिळाली ती नोकरी धरलीये गं. जगणं नकोस झालयं. मा कडे फार दिवस नाही राहू शकत. पायावर उभ रहायच म्हंटल तर कुठुन तरी सुरुवात करायला हवीच ना," मीता मंद हसत म्हणाली.


माझी ट्रेन येत होती, "मीता मला निघायला हवं, मीटींग आहे ऑफिसात महत्वाची, चुकवून चालणार नाही." घाई घाईत पर्स मधे हात घातला आणि शंभराची एक नोट साराच्या हातात कोंबली आणि ट्रेनमधे घुसले.


"तुझा नंबर दे ना गं," मीता खालून ओरडली. गडबडीत लक्षातच आलं नव्हतं माझ्या आणि आता इतक्या गर्दीतून देणं अशक्यच होतं. त्यानंतर पुन्हा मीताची भेट झालीच नाही. दिसली ती आज. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपपाशी.


----


आपण परिस्थिती नुसार जसं वागायच तसच वागतो पण मनाला एक गोष्ट जरुर सलते. एक फोन कॉल मीताच्या इच्छेविरुद्ध मी तिच्या मा ला करायला हवा होता का? आपल्याला काय घेणं देणं? नसतं लफडं आपल्या मागे नको म्हणून मी नामानिराळे राहून तिच्या अधोगतीला जबाबदार आहे का? मैत्रीण तर तशीही गमावणारच होते, पण अचूक निर्णय घ्यायला मी कचरले होते.


एखादा माणूस आयुष्यात चुकला तर सहज त्याच्याकडे आपण बोट दाखवतो. एक छानशी गोष्ट रचवून मोकळेही होतो. चुकलेल्याच्या डोक्यावर सहज खापर फोडतो आणि विसरतो की कदाचित त्याच्या बरोबर आपण स्वत:ही कुठेतरी चुकत असतो, हा सल अजूनही मनात कायम आहे.