मनोगती संमेलनाचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंतच्या कार्यक्रमांत एका विशिष्ट गटाचे वर्चस्व राहिले असल्याच्या नाराज सुरांनीच या दिवसाची सुरुवात झाली. 'कंपूबाजी नही चलेगी, नही चलेगी','आम्हालाही बोलू द्या, नाहीतर खुर्ची खाली करा' अशा घोषणांनी वातावरण तापत होतेच, तेवढ्यात प्रवेशद्वारातून हळूहळू प्रवासी चालत येताना दिसला. 'हा विद्रोही संमेलनाचा अध्यक्ष काय करतोय इथे?' माधवने जी एस ला विचारले. पण प्रवासी कुणाशीही न बोलता व्यासपीठावर गेला आणि त्याने बोलायला सुरुवात केली.
"मंडळी, मला इथे पाहून आपल्यापैकी काही लोकांना धक्का बसला असेल, काहींना वाईटही वाटले असेल.." चक्रपाणिने सन्जोपकडे पाहून भुवया उंचावल्या. सन्जोपने मानेनेच "मला नाही.."' असे सांगितले. "पण मी इथे का आणि कसा हे मी माझ्याच एका जुन्या गजलेला कल्हई करून सांगतो.." ( "मेलो, सक्काळी सक्काळी गजल! 'मनोगत' वरच्या या गजला संपणार तरी कधी? शायद उनका आखरी हो ये गजल, हर गजल ये सोचकर हम सह गये... खि... खि... खि..." वात्रटाने त्रासून टग्याकडे बघितले. ) प्रवासी बोलू लागला,