ही गोष्ट आहे दोन मित्रांची, राज आणि अमितची.
राज आणि अमित, दोघेही शेजारीच राहणारे, शाळाही समोरासमोर. एकत्र
जाणे-येणे, खेळणे चालूच होते. राजचे विश्व छोटेसेच होते. थोडेफार शिकून
एखादी चांगली नोकरी करायची, लग्न करायचे आणि पुढे संसारात रमून जायचे हीच
त्याची स्वप्न. अमितचे तसे नव्हते. त्याची स्वप्न काही वेगळीच होती.
सहावी-सातवीत असल्यापासूनच त्याला मर्चंट-नेव्हीचे वेध लागले होते. पुढे
त्याच्या मेहनतीने, जिद्दीने आणि थोड्याफार ओळखीने त्याचे स्वप्न पूर्णं
झाले आणि त्याने मर्चंट-नेव्हीतली नोकरी पत्करली. काही दिवसांतच तो आपले
मित्र, आई-वडील-बहिणीला सोडून नोकरीकरता दूर निघून गेला. राजला काही दिवस
त्याची पत्र येत राहिली.. कधी हॉलंड मधून, कधी अमेरिकेतून, तर कधी
श्रीलंकेतून. आपण शहरातल्या पेठा बदलाव्यात तसा तो देश बदलत होता. त्याचा
पगार ज्युनीयर असूनही ८०,००० वगैरे होता. एक वर्षानंतर महिन्याच्या
सुट्टीवर जेव्हा तो आला तेंव्हा तो खूप खूश होता. वेगवेगळ्या देशात केलेली
खरेदी, तेथील फोटो त्याने राजला दाखवले. त्याची बचतही खूप झाली होती.
त्यातून त्याने एक मोठी गाडी पण घेतली.