मी एम. ए. करत असतांना आजीकडे राहत होते, तेंव्हाची गोष्ट. माझी तेंव्हा सत्तरीची आजी रोज अतिशय छान स्वयंपाक करायची दोघींसाठी. अगदी सकाळचीच भाजी असेल, तरी नवीन कोशिंबीर तरी, किंवा साधी खिचडी असेल तरी त्यात नवीन प्रयोग करून, सगळ्या डाळी घालून त्यांना वेगळीच चव आणायची. तिला बिचारीला जेमतेम अर्धी पोळी जात असेल, प्रकृती, पचनशक्ती मंदावलेली, पण उत्साह दांडगा, अशीच ती अजूनही आहे. पण तरीही, कधीकधी तिला वाटायचं, की मी तिला स्वयंपाकात मदत करावी, तिच्यासाठी नव्हे, तर मला शिकायला मिळेल म्हणून.
आता आईकडे मी स्वयंपाकात अजिबात लक्ष घातलं नव्हतं. भाजी चिरायला मला आवडतं, आणि ते मी तिथेही करत होते, पण आपण सुंदर चिरलेली भाजी फोडणीस घातली, की त्याचं भरीतच होणार, अशी भीती सतत मनात असायची. कुठे आजीचा उत्तम स्वयंपाक, आणि कुठे आपले नवशिक्याचे प्रयोग- आपल्या हातचं तिला खावं लागू नये, ह्याकडेच जास्त कल होता :)
एकदा मात्र मजा झाली, मी सकाळी सकाळी अंघोळ करून तयार, आणि आजीने मला म्हणायला- की आज तू स्वयंपाक करतेस का? आणि मी तिला सांगायला- की मैत्रिणींबरोबर पिक्चरचा प्लॅन आहे, त्यामुळे लगेच तिकिटं काढायला जातेय... एकच गाठ पडली. तिला एकदम रडू आलं- थकली असणार, कधी आयतं मिळावं असं तिलाही वाटलं असणार, पण उठली, भराभरा कामाला लागली. तेव्हा आणि त्यानंतर अनेकदा माझ्या मनात विचार यायचा- की आज तिला म्हणूया- “तू बस, मी करते सगळा स्वयंपाक- जसा होईल तसा, पण तुला आराम तरी मिळेल.” पण तेवढी जबाबदारी घ्यायची सवय नव्हती तेंव्हा, आणि गळ्यात पडल्याशिवाय करता येईल असा आत्मविश्वासच नव्हता. विचार खूप केला मी, पण नाहीच जमलं...
आता लग्न झालं- नवऱ्यावर प्रयोग करून करून बऱ्याच गोष्टी शिकत गेले :) आणि तेव्हा आजीने बोलता बोलता सांगितलेले मंत्र आता आठवू लागले. पण एकीकडे युनिव्हर्सिटी, पार्ट टाईम नोकरी करतांना कधीतरी वाटतं- की आता नवऱ्याने का कधी भात-वरण लावून ठेवू नये? मी रात्री उशीरा क्लासहून येणार असले, तर नूडल्स का होईना, करून ठेवायला काय जातंय ह्याचं? हा नाही का लग्नाआधी ६ वर्ष इथे एकटा राहिला, तेव्हा करतच होता ना? पण मी जशी आजीला मदत करायला घाबरले, तसा तो ही घाबरतोच. अगदी चहा सुद्धा मला त्याच्या पद्धतीचा आवडत नाही, हे जाणवून मागे मागेच राहतो... त्याच्या मनातही असतील ना विचार, मला मदत करण्याचे, पण It is the thought that counts, or is it???
मधे आमचा असाच वाद झाला. "मी तुला बॅंकेची कामं सांगून ठेवली होती, ती झाली का नाही अजून?" - तो मला विचारत होता. "अरे होती डोक्यात, आहेत डोक्यात, पण वेळ नाही मिळाला!” मी काहीतरी थाप ठोकली. खरंतर मी ती कामं का केली नव्हती हे माझं मलाच माहिती नव्हतं. पण विचार डोक्यात होता, हे ही तितकंच खरं! "आता तुझ्या डोक्यातले विचार मला कसे दिसणार आहेत?? तर मी काय समजू की तू नक्की तो विचार करते आहेस, की नाहीस???"
झालं, त्यावरून अर्धा तास मेजर भांडण. मी सांगतेय मी करणार आहे, आणि त्याचं एकच पालूपद- कधी? आणि कशावरून तू विसरणार नाहीस.....! आता मनातल्या विचारांचं मी तुला काही प्रूफ देऊ शकत नाहिये, त्यामुळे तुझंच खरं, असं म्हणून मी गप्प बसले. पण ह्याने तरी माझ्यावर थोडा विश्चास दाखवावा की नाही, असं वाटल्यावाचून राहिलं नाही.