जी.एं. चे इंग्रजी वाचन
'शॅलो पीपल डिमांड व्हरायटी. आय हॅव बीन रायटिंग द सेम स्टोरी ईच टाईम ट्राईंग टु कट निअरर टु द एकिंग नर्व्ह'
-स्ट्रिंडबर्ग
चांगला लेखक हा उत्तम वाचक असलाच पाहिजे यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. जी.एं चे इंग्रजी साहित्याचे वाचन अफाट होते. (याला त्यांचे इंग्रजी या विषयाचे प्राध्यापक असणे एवढेच कारण असावे असे वाटत नाही. प्राध्यापकांचे वाचन आणि त्यांचा व्यासंग चांगला असला पाहिजे, हे सूत्र तर कधीच कालबाह्य झाले आहे!) कर्नाटक विश्वविद्यालयाचे वाचनालय हे तर त्यांचे दुसरे घरच होते. जगातले उत्तमोत्तम साहित्य मिळवून ते वाचणे, त्यावर विचार, चिंतन (! ) करणे हा जातिवंत वैचारिक गुण जी. एंमध्ये प्रकर्षाने दिसतो. धारवाडमध्ये त्यांच्या घरी स्वतः विकत घेतलेल्या चार - साडेचार हजार पुस्तकांचा संग्रह होता. चार - साडेचार हजार! याशिवाय वेळोवेळी वाचनालयातून आणून वाचलेली, मित्रांनी, स्नेह्यांनी वाचायला दिलेली असंख्य पुस्तके, जवळजवळ तितकीच मासिके - हे निव्वळ आकडेच चकरावून टाकणारे आहेत. जी. एंचे इंग्रजी वाचन हे थोडेसे त्यांच्या पेशातील गरजेमुळे, आणि बरेचसे त्यांच्या इंग्रजीवरील प्रेमामुळे झाले आहे. 'इंग्रजी भाषेला एक आणि सिगारेटला एक - अशा दोन गोष्टींना अर्पण करण्यासाठी मला दोन पुस्तके लिहायची आहेत' असे त्यांनी म्हटले आहे.
जी. एंच्या इंग्रजी वाचनाचा धांडोळा घेताना दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एकतर त्यांनी आपले आवडते म्हणून जे लेखक/ कवी सांगितले आहेत, ते भलतेच आहेत. 'गावाचे एक तर गावड्याचे (गावंढ्याचे? ) एक' हे तर त्यांचे आवडते वाक्य. 'जे जे लोकप्रिय आहे, ते दर्जेदार नसतेच' हा त्यांचा जबरदस्त पूर्वग्रह इथेही तितक्याच प्रभावीपणे दिसतो. 'इफ अ बुक इज एक्स्ट्रीमली पॉप्युलर, आय बिकम सस्पिशिअस अबाउट इट. दी लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटर ऑफ इंटेलिजन्स इन ऍन ऑर्डिनरी रीडर इज सो लो, दॅट इफ अ बुक टचेस दॅट, ऑलवेज इन्व्हेरिएबली दी बुक मस्ट बी बॅड' असे त्यांनी म्हटले आहे. थोडा विचार केला तर हे पटूही लागते. 'वुडहाऊसचे एक पुस्तक वाचले की सहा महिने त्याच्याकडे बघवतही नाही' या एका वाक्यात ते त्या थोर लेखकाची वाट लावून टाकतात. अमेरिकन पेपरबॅक्सवर तर त्यांनी निव्वळ जहरीपणाने लिहिलेले आहे. आयन रँड ही लोकप्रिय लेखिकाही जी. एंना वर्ज्यच होती. 'काळ्या काचेचे मणी घालून एखाद्या प्रॉफेटेसचा आव आणणारी ही बाई म्हणजे एक बुडबुडा होती' असे त्यांना वाटते. तिची 'वुई द लिव्हिंग' ही कादंबरी दोस्तोव्हस्कीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे समजणाऱ्या एका मित्राशी त्यांचे संबंध दुरावले. ही कादंबरी फार फार तर एखाद्या हिंदी चित्रपटासाठी योग्य आहे, असे त्यांना वाटे. जी. एंचे हिंदी चित्रपटांविषयीचे मत ध्यानात घेता धिस इज सेईंग अ लॉट!
दोस्तोव्हस्की हे तर त्यांचे व्यसनच होते. दोस्तोव्हस्की आणि ओ'नील यांच्या कथांमधील आकर्षक साचाहीनता ओ. हेन्रीच्या कथांमधील निव्वळ कसबापेक्षा त्यांना कितीतरी सरस वाटत असे. इंग्रजी साहित्यातले जी.एं. चे स्वतःचे आवडते लेखक अगदी दुर्लक्षित, लोकप्रिय नसलेले असे होते. ल्यूक्रेशियस हा इसवीसनपूर्व काळातला रोमन कवी आणि तत्त्वज्ञ जी.एं. नी स्वतःच्या तिशीच्या आत वाचला होता आणि त्याने ते बरेच प्रभावितही झाले होते. ल्यूक्रेशियस नंतर त्यांना बराच अपूर्ण वाटत असे. असेच त्यांचे झ्वाईगच्या बाबतीतही झाले होते. एक वाचक म्हणून मला स्वतःला जी. एंचा हा मोठा गुण वाटतो. वयानुसार आणि अनुभवानुसार अभिरुचीत असा बदल घडत राहणे आवश्यकच आहे, असे मला वाटते. अगदी पालापाचोळा तुलना करायची तर 'ग्रीन सॅलड डेज' मध्ये व. पु. काळे वाचणे व त्या पुस्तकांच्या प्रेमात वगैरे पडणे आणि नंतर त्यांचे कोणतेही पुस्तक हातातही न धरवणे - अशी जशी अगदी सामान्य वाचकाची उत्क्रांती होते तसे! (लग्नानंतर प्रथम शरीरसंबंधाचा अनुभव घेतल्यानंतर या सगळ्याचा अर्थ काय असा प्रश्न पडणारा 'पार्टनर' मधला नायक आजही थोडा सुसंगत वाटतो, पण यावर उत्तर म्हणून 'चांदनी रात सनम चांदके लच्छे लच्छे, दो उंगली चमडी के लिये, मर गये अच्छे अच्छे' लिहिणारा पार्टनर त्या वेळी फार मोठा तत्त्वज्ञ वगैरे वाटला होता, आज तो पोरकटच नव्हे तर चक्क खुळचट वाटतो ! असो. ) आवडता कलाकार हा अथपासून इतिपर्यंत आवडला पाहिजे या भाबडेपणापासूनही जी. ए. दूर होते. इथे जी. एं आणि पु. ल. यांच्यातला मोठा फरक दिसून येतो. 'वुडहाऊस हा बालगंधर्वांच्या गाण्यासारखा आहे, तो एकतर पूर्ण आवडतो, किंवा अजिबात आवडत नाही' असे पु. लंचे मत आहे. एक आस्वादक म्हणून मला जी. एंची वस्तुनिष्ठता अधिक पटते. 'रायटिंग, नॉट द रायटर!' मग एखाद्या आवडत्या लेखकाच्या लिखाणात हिणकस काही आले, तर ते तसे आहे, हे सांगण्याचे धैर्य पाहिजे. (वुडहाऊअसचे तरी सगळे लिखाण कुठे दर्जेदार आहे? ) 'मी उगाच सांगत नाही ' या गडकऱ्यांच्या ओळींवर 'माणसे अरभाट आणि चिल्लर' मध्ये जी टिंगल आहे, ती जी.एंच्या याच मताचे प्रतिबिंब आहे. ऑलिव्ह श्रायनर या लेखिकेचे 'स्टोरी ऑफ ऍन आफ्रिकन फार्म' हे जी. एंचे आवडते पुस्तक. त्याचे भाषांतर करण्याचाही त्यांना कैकदा मोह झालेला आहे. पण या लेखिकेच्या इतर कादंबऱ्या ' आपल्याकडे स्त्री लेखिका ज्या लायकीच्या कादंबऱ्या लिहितात, त्याच लायकीच्या' असे जी. एंचे मत होते. स्त्री लेखिकांविषयी जी. एंची मते ध्यानात घेता त्यांना काय म्हणायचे आहे, ते कळते. हेन्री जेम्सचे फक्त 'आर्ट ऑफ फिक्शन' हे पुस्तक जी. एंना आवडत होते. त्याची इतर पुस्तके न वाचण्याच्या लायकीची असे त्यांचे रोखठोक मत होते. या सगळ्या यादीत मॉमचा समावेश असावा, याची गंमत वाटते. मॉम हा तसा लोकप्रिय लेखक. तरी जी. एंनी तो त्यांच्या प्रसिद्ध नियमाला बगल देऊन वाचला, आणि त्याचे 'ऑफ ह्यूमन बॉंडेजेस' त्यांना आवडले, हे एक नवलच. नीत्शे या तत्त्वज्ञ कवीच्या 'बर्थ ऑफ ट्रॅजेडी' या पुस्तकाचा ते तसाच आवडलेल्या पुस्तकांत उल्लेख करतात . विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे, हे तर सर्वज्ञातच आहे. ओ'नीलच्या 'लाँग डेज जर्नी इंटू नाईट' या नाटकाचाही त्यांनी 'दिवस तुडवत अंधाराकडे' या नावाने अनुवाद केला आहे. (आपल्या) दुर्दैवाने त्यांनी त्या हस्तलिखितावर 'हे प्रकाशनार्थ नाही' असे स्पष्टपणे लिहिले असल्याने तो अनुवाद वाचकांसाठी उपलब्ध नाही.