अगा ये सगुणा निर्गुणा (२)

"चिदानंदरूपम शिवोहम शिवोहम", आठ वर्षाच्या आदी शंकरानी आपल्या गुरुच्या "बालका तू कोण आहेस?" ह्या प्रश्नाला आत्मषटक / निर्वाणषटक रचून उत्तर दिले. आजवरच्या हिंदू तत्त्वज्ञानात "जीव कोण आहे" ह्याचे ते अंतिम उत्तर समजले जाते. जपानमध्ये विकसित झालेल्या उसुई रेकीतही प्रथम सजीवात प्राणाचे रोपण भारतीय शिवाने केले असे समजले जाते. सजीव पेशी ही अमिनो आम्लासारखे सेंद्रिय पदार्थ आणि विद्युत्शक्ती ह्यांच्या सन्योगाने निर्माण झाली अशी विज्ञानाची संकल्पना आहे.

सजीवाच्या चयापचय / चलनवलन अशा क्रिया प्राणशक्तीद्वारे चाललेल्या असतात. ह्या प्राण शक्तीला जपानी भाषेत "की" अशी संज्ञा आहे. जीवाप्रमाणेच ह्या अनंत अवकाशालाही प्राण आहे. त्यालाच रेकी म्हणतात. जपानी भाषेत "रे" म्हणजे दैवी किन्वा वैश्विक. आद्य रेकीगुरू मिकाओ उसुई प्रथम ह्या रेकीशी समस्वर झाले. त्यांच्यापासून ही परंपरा सध्याच्या रेकीसाधकापर्यंत पोचली. रेकीशी समस्वर होऊन साधक स्वतावर वा रूग्णावर हस्तस्पर्शाने वा दूरंत उपचार करतात.

अलोपथी /आयुर्वेद / होमिओपथी ह्या प्रमुख उपचारप्रणालीना पूरक किन्वा आधार म्हणून रेकी काम करते. शल्यक्रियेनंतर रक्तस्त्राव आटोक्यात आणणे, जखम लवकर भरणे, वेदना हलक्या करणे  अशी कामे ती करते. रेकीची साधना रोज केल्यामुळे आरोग्यपूर्ण जीवन मिळते. सुलभ जन्म, यशस्वी कारकिर्द व क्लेशरहित निर्वाण ह्या सर्व टप्प्यावर रेकीची अकल्पनीय मदत होते.

रेकी स्वयंप्रज्ञ आहे. साधक तिचा वाहक असतो. आपला उपचाराचा मार्ग ती स्वता ठरवते. परंतू रेकी आपल्याला कोणतेही वचन देत नाही. साधारण रोज एक तास असे दहा दिवस उपचार करून अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत तर उपचार थांबवावे लागतात. रेकी नेहमीच नैतिक निर्णय घेते.

रेकीच्या आदानप्रदानाची प्रक्रिया नितांतसुंदर असते. भावस्पर्शी तरल रेकीउपचारानी रूग्णाचे दूषित प्राणपटल शुद्ध होत जाते. अनेकवेळा रूग्ण रेकी शिकण्याची इच्छा व्यक्त करतात. बालके, पाळीव प्राणी ह्यानाही रेकी देता येते. काही साधक तर घड्याळ, मोटार ह्यानाही रेकी देतात.

रूग्णाप्रमाणेच उपचार करता करता साधकाचे व्यक्तित्व सकारात्मकरित्या अन्तर्यामी बदलते. दसरा डायलिसिसच्या रूग्णाना रेकी देऊन साजरा होतो. दिवाळीचा आनंद कर्करोगाच्या रूग्णाला रेकी देऊन द्विगुणित होतो.

रेकीसाधकाला विविध प्रसंगाना सामोरे जावे लागते. रेकीच्या कार्यशैलीवर जपानी शिष्टाचाराचा प्रभाव आहे. नम्र वाणी व सेवाभाव हे उग्र स्वभावाच्या व्यक्तिना बालिश व हास्यास्पद वाटू शकतात. अशावेळी अत्यंत शांतपणे आपले काम करत राहावे लागते. भारतात तर रोज एकतरी रेकीचा टीकाकार भेटतोच भेटतो. त्याला शांतपणे आदरपूर्वक निरोप द्यावा लागतो.

वादविवाद अखंड चालू राहू शकतो. पण रूग्णासाठी  एकएक क्षण महत्त्वाचा असतो आणि त्याला वेळ देऊन त्याच्या सन्वेदना समजून घेणारा दुर्मिळ असतो. रेकीसाधकांची संख्या वाढावी म्हणून मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.