अगा ये सगुणा निर्गुणा (१०)

मन उदास, कधी प्रफुल्ल

मन हताश, कधी चलबिचल

मना हो की जरा निश्चल

मनुष्याचे
प्राणपटल हे शरीर व मन ह्यांनी बनलेले आहे. शरीर स्थिर राहू शकते, पण मन
मात्र पाऱ्यासारखे इकडेतिकडे धावत असते. मनात विलक्षण वेगाने घडामोडी होत
राहतात. शरीराप्रमाणे मनाचे आरोग्य जपणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. आत्यंतिक
नकारात्मक भावना मनाचे आरोग्य बिघडवतात.

रेकीप्रणालीमधील प्रतिकचिन्ह
"से हे के " मनावर उपचार करते. जपानी भाषेतील ह्या शब्दांचा अर्थ आहे, 'मी
बाण सजगतेकडे रोखते ( आय पॉइंट ऍरो टू अवेअरनेस ). रेकीच्या
तत्त्वज्ञानाचा भर मन वास्तवात ठेवण्याकडे आहे. जितके आपण सजग राहतो, तितके
आपण योग्य निर्णय घेत जातो.

शरीर व मनाच्या चालीत एक त्रुटी आहे.
शरीर नेहमी वर्तमानात राहते. पण मन कधी शैशवात बागडते तर कधी भविष्यातील
वृद्धत्वाच्या चाहुलीने व्यथित होते. भूतकाळातील दुःखद स्मृती आठवून आठवून
मन उगाचच व्यथित होत राहते. ही त्रुटी "से हे के" भरून काढते आणि मनाचा
समतोल साधते.

से हे के " रेकी आणि मनुष्य" ह्यांच्यातील साम्याचे
निर्देशक आहे. भावनिक ताणतणाव व दोलायमान मन:स्थिती ह्यावर ह्या चिन्हाचा
उपयोग होतो.  व्यसनाधीन व्यक्ती रेकी उपचार स्वीकारत नाहीत. पण "से हे के"
अपेयपानाची घातक सवय दूर करते.  

मला ह्या प्रतिकचिन्हांची रेखाटने
इथे देण्यास फार आवडले असते. पण कॉपीराइटबद्दल मला शंका आहे. वाचकांनी
"रेकी सिंबॉल्स" असा गुगलशोध केल्यास सहज मिळतील. मला आज ती रेखाटने देता
येत नाहीत, याचे वैषम्य वाटते. कारण "से हे के" च्या रेखाकृतीचे भारतीय
संस्कृतीशी निकटचे नाते आहे.

आपल्या मंत्रामध्ये " ऱ्हीः " हा
बीजमंत्र आहे. तो जसा " सिद्धम " ह्या लिपीत लिहिला जातो,  तीच "से हे के"
ची रेखाकृती आहे. संस्कृत लिहिण्यासाठी सिद्धम ही लिपी ब्राम्ही लिपीतून
इस ६००-१२०० मध्ये  उगम पावली. आसामी व बंगाली लिपीची सिद्धम ही जननी
आहे. जपानमध्ये काही बौद्धसाहित्यात ती आजही लिहिली जाते. " ऱ्हीः " ह्या
बीजमंत्राचे अनेक अर्थ आहेत व त्यातील बरेचसे भावनांशी निगडित आहेत.

भारतीय संस्कृतीसूर्य सगळ्यांची मने प्रकाशमान करो, अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकी गुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.