अगा ये सगुणा निर्गुणा (६)

अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम ।
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंध:
चिदानंदरूपः शिवोऽहम शिवोऽहम. ६.
इति श्रीमद शंकराचार्यविरचितम आत्मषटकम सम्पूर्णम// 

मी संकल्पहीन आहे. मी निराकाररूप  आहे. मी सर्वस्थळी आहे. मी सगळ्या इंद्रियात आहे. मी समभावी आहे. मला मुक्तिही नाही व बंधनही नाही. मी आनन्द घेणारी चिद म्हणजे जाणीव असून शिव म्हणजे कल्याणकारी आहे.

परमेश्वराचे निर्गुण वा निराकार रूप सर्वसामन्यांना आकलन होण्यास कठीण पडते, म्हणून  आपल्या सन्स्कृतीने देवाला उंची वस्त्रप्रावरणे व अलंकार घालून भक्तान्समोर सादर केले आहे. त्याच्या दर्शनाने भक्तांची ऊर्जा वाढावी, असाही त्याला नटवण्यामागे हेतू आहे. सगुण भक्तिप्रमाणेच आपल्या  सन्स्कृतीने गुरुशिष्य परंपरेला उच्च स्थान दिले आहे. प्राचीन काळी विविध विद्या व कला शाखा ह्या परंपरेतच बहरल्या. ह्या परंपरेमुळे ज्ञान राजकिय हस्तक्षेपाबाहेर राहीले.

भारताप्रमाणेच जपानही गुरुशिष्य परंपरेला मानते. अनारोग्य संपूर्ण नष्ट झाल्याशिवाय मी मृत्यू वा निर्वाण स्वीकारणार नाही, असा निर्धार केला, म्हणून गौतमबुद्धाना बोधिसत्त्व अशी संज्ञा आहे. रेकीप्रणालीतही अशी संकल्पना आहे की जेव्हा रेकीसत्र सुरू असते किन्वा रेकीबद्दल प्रवचन / लेखन चालू असते, तेव्हा रेकी आद्यगुरू मिकाओ उसुई ह्यांचा आत्मा हजर असतो. म्हणून हा लेख लिहून झाल्यावर मी त्यांचे आभार मानते.

अध्यात्म म्हणजे परमेशाचा वा सत्याचा शोध. काही तिबेटी पंथाना रेकी आजारी रुग्णान्वर उपचार करण्यासाठी उपयोगात आणणे, मान्य नाही. ते रेकीने आत्म्यावर उपचार करतात. त्यांच्या मते आत्म्यावरील उपचाराने दैहिक रोग आपोआप बरे होतात. परंतू प्रचलित रेकीप्रणालीत वैश्विक प्राणशक्तीच्या सहाय्याने रुग्णाच्या शरीरावर ऊर्जा उपचार केले जातात किन्वा दैवी प्राणशक्तीद्वारे भौतिक विकास साधला जातो.

रुग्णाच्या शरीरावर उपचार करताना रेकीसाधक आपल्या दोन्ही तळहातांचा व मानसिक शक्तीचा वापर करतात. रेकी प्रथमामध्ये अनुसंगतता (अट्युनमेंट) प्राप्त केल्यावर, साधकानी रेकीला आभारपूर्वक आमंत्रण दिल्यावर, साधकाच्या तळहातातून नाजूक झिणझिण्यान्गत सन्वेदना येतात किन्वा तळहात उष्ण होतात. रेकीसाधक इतर लोकांच्या तुलनेत जास्त पाणी पितात.

रुग्णाच्या शरीरावर तळहात ठेऊन रेकीसाधक रेकीध्यान (रेकी मेडीटेशन) सुरू करतात. हाताच्या सन्वेदना येत रहातात, पण रेकीसाधकाना उपचार थांबवण्याची अंतर्सूचना मिळते. कधीकधी रुग्णच आता उपचार थांबवा, अशी सूचना करतात. उपचाराच्या प्रथम सत्रात रेकी ग्रहण करणारे रुग्ण साधारण तीन प्रकारे प्रतिसाद देतात. साधारण सत्तर टक्के रुग्ण विश्रान्त होतात. त्याना रेकीची दहा ते बारा सत्रे पुरेशी होतात. तीस टक्के रुग्णापैकी काहीना विषाद वाटतो तर काहीजण उद्विग्न होतात. त्याना उपचाराची वीस ते तीस सत्रे लागतात. रोग जर जीर्ण असतील तर उपचार दीर्घकाळ चालतात.

रुग्णाचा मेंदू जितका शान्त असेल तितका तो रेकी ग्रहणशील असतो. त्यामुळे रेकीसाधक सहसा समुपदेशन करत नाहीत. कारण त्यामुळे रुग्णाचा मेंदू सक्रिय होतो. पण उद्विग्न झालेले रुग्ण बोलू लागतात. तुम्हाला रोग होतात का? मलाच का हा रोग झाला आहे? तुम्ही हे काय करत आहात? असे खूप प्रश्न विचारतात. ते जर शान्त झालेच नाहीत, तर सत्र रद्द करावे लागते.

रेकीचे सहाय्य जर भौतिक विकासाकरता घ्यायचे असेल, तर त्याकरता रेकी शिकावी लागते. रेकीसाधक दूसऱ्याच्या भौतिक विकासासाठी रेकी करू शकत नाहीत. भौतिक विकासाकरता फक्त रेकीध्यान पुरेसे असते. ईश्वरप्राप्तीकरता ध्यान करणारे (सन्माननीय अपवाद वगळता) मन एकाग्र होत नाही किन्वा मनात ईश्वर सोडून वेगळेच विचार येतात अशा अडचणी सांगतात. पण रेकीध्यान सहज साधले जाते. ज्यात आपल्याला रस असतो त्या विषयातील कारकीर्द कमालीची यशस्वी होते, त्याप्रमाणे भौतिक साधने घर, गाडी इत्यादी अध्यात्मापेक्षा जास्त जवळची भासतात, म्हणून रेकीध्यान सहज साधत असावे.

जगविख्यात शास्त्रज्ञांचे "युरेका" क्षण हे मनाच्या विश्रान्त अवस्थेत आलेले आहेत. माझे बरेच वैज्ञानिक सहकारी रेकी वा तत्सम ज्ञान प्रणाली शिकलेले आहेत. मी पूर्णवेळ सन्शोधनाची नोकरी करून माझा डॉक्टरेटचा प्रबंध केवळ बावीस महीन्यात सादर केला. ह्यात माझ्या मार्गदर्शकांबरोबर रेकी जीवनशैलीचाही वाटा आहे. एखाद्या वैज्ञानिक समस्येवर रेकीध्यान करून मी जर ग्रंथालयात गेले तर नेमके असे पुस्तक माझ्या हातात येते की ज्यात त्या समस्येचा तिढा सुटेल असे सूत्र असते. माझे दैनंदिन जीवन रेकीमुळे खूपच सुलभ झालेले आहे. शनिवार रविवारसुद्धा सकाळी पाच ते रात्री अकरापर्यंत मी कार्यरत असते. कितीही दीर्घ विमानप्रवास केला तरी अर्ध्यातासभराचाही जेटलॅग मला लागत नाही.

सगळ्यांच्या  अंतरीचा ज्ञानदीवा सदैव तेवत राहो, अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.