अगा ये सगुणा निर्गुणा (८)

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा

दैव कोप होता भाळी सर्वनाश त्याचा

वाहणे प्रवाहावरती धर्म एक साचा

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा //

ही नियतीशरण अगतिकता रेकीप्रणालीला मान्य नाही. कारण रेकी म्हणजे वैश्विक प्राणशक्ती. निराकार जाणीवेचा अनुभव घेण्याकरता सृष्टिरूपात प्रगटले आहे. ते आपल्यातही प्राणशक्तीच्या रूपात असल्यामुळे, आपणही प्रतिसृष्टी निर्माण करत असतो, पण आपल्याला त्याची विशेष जाणीव नसते.

प्रत्येकजण ज्या वैयक्तिक परिस्थितीत असतो, ती ज्याची त्यानेच तयार केलेली असते. पण आपल्याला ह्याचे भान नाही. यशस्वितेचा कर्ता अहम् असतो. अपयशाचे श्रेय दैवाला दिले जाते. दैव कसे निर्माण होते, तर मग आहेतच पूर्वसंचित, प्रारब्ध व कर्मदोष असे शब्द. फार मोठा वर्ग ह्या पूर्वसंचित कर्मसिद्धांताच्या प्रभावाखाली आहे.

माझ्या एका विद्यार्थ्याने मला विचारले, " मला व्यवसायात सतत अपयश येते. ते माझ्या पूर्वजन्मातील कर्मदोषामुळेच, अशी माझी खात्री झालेली आहे. रेकीने माझे कर्मदोष दूर होतील का? ".

मी त्याला सविस्तर उत्तर दिले, "रेकीप्रणाली कर्मदोषाविषयी खास असे काहीच सांगत नाही. पण गतजन्मावर विश्वास ठेऊन आपली जी मनोरचना (माइंडसेट) तयार झालेली आहे, तिच्यावर रेकी उपचार जरूर करू शकते. उसुई रेकीत पाच सन्स्कृतोद्भव प्रतीकचिन्हे आहेत. त्यांची आकृती व रेखाटने मी शिकवीनच. पण त्यांचा अर्थ जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. ह्या प्रतीक चिन्हांची नावे जपानी भाषेत आहेत. गतजन्मावर उपचार करणाऱ्या चिन्हाचे नाव आहे, ' होन शा झे शो नेन'. ते आपल्या नमस्तेवर आधारित आहे. त्याचा अर्थ आहे, ' माझ्यातले देवत्त्व तुझ्यातल्या देवत्त्वाला नमस्कार करते. भूतकाळ नाही, वर्तमानकाळ नाही, भविष्यकाळ नाही. क्षणोक्षणी योग्य विचार (माइंडफुलनेस) हे अस्तित्त्वाचे मर्म आहे. जीवनाचे पुस्तक उघडा व लिहा. ' हा अर्थ नीट वाचा. पुन्हापुन्हा वाचा. माझ्याशी त्याविषयी चर्चा करा. त्या चिन्हाच्या अर्थाचे जसजसे आकलन होत जाईल तसतशा गतजन्मीच्या शत आर्ती व्यर्थ होत जातील. ह्या क्षणी योग्य विचार झाला तरच पुढचे सगळे क्षण सुफळ संपूर्ण होतील. बौद्ध तत्त्वज्ञानात म्हणून रेकीत एक संकल्पना आहे, मोठे मन (विश्व) लहान मनाचे ( माणसाचे) आज्ञापालन करते. आपल्या मनाने यशाचे तपशिलवार चित्र रंगवून यशासाठी रेकीध्यान केले, तर संपूर्ण विश्व ते यश साकारण्यासाठी सुसज्ज होते".

त्या विद्यार्थ्याने पुढे विचारले, " मला अमर्याद यशाची प्राप्ती होईल का?" मी म्हटले, " ते आपाआपला संकल्प, त्यासाठी केलेले भौतिक प्रयत्न ह्यावरही अवलंबून आहे. रेकीमुळे आपण यशाच्या निश्चित जवळ जाल आणि तसे जात असताना आपला आध्यात्मिक विकास होईल. रेकीचे अध्यात्म म्हणजे करूणेचे, माणुसकीचे अध्यात्म. रेकीच्या मार्गावर आपल्याला परोपकाराच्या संधी मिळतील".

विद्यार्थ्याच्या तोंडून उद्गार आले, "म्हणजेच रेकीमुळे मी अर्थपूर्ण यशस्वी जीवन जगेन".

सगळ्याना अर्थपूर्ण यशस्वी जीवन लाभो, अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.

ताजा कलमः मी बाहेरगावी जात असल्यामुळे साधारण महिनाभर ही लेखमाला लिहू शकणार नाही. मी वाचकांची अत्यंत दिलगीर आहे. जून महिन्यानंतर मी नियमित लेखन सुरू करेन. सगळ्याना वर्षाऋतूसमयी शुभेच्छा.