अगा ये सगुणा निर्गुणा (३)

भक्तजन रोज आपल्या आराध्यदैवताची मनोभावे पुजा करतात. अगदी त्याच निष्टेने रेकीसाधक रोज सकाळी रेकीच्या पाच तत्त्वांचे मनन व चिंतन करतात. ती आपल्या दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित व्हावीत असा प्रयत्न करतात. ती आहेतः

[१] फक्त आज क्रोध करू नका. [२] फक्त आज चिंता करू नका. [३] फक्त आज  कृतज्ञ रहा.

[४] फक्त आज प्रामाणिकपणे कष्टपूर्वक उपजीविका मिळवा. [५] फक्त आज इतरान्शी करूणेने वागा.

ही तत्त्वे जितकी साधी वाटतात तितकी ती आचरणात आणण्यास कठीण आहेत. रेकीसाधक दिवसभर ह्या रेकीतत्त्वान्शी अनुसंधान ठेऊन असतात. ती रेकीसाधकांच्या घरी अथवा कार्यालयात देवाच्या फोटोसारखी लावलेली आढळतात. माझ्या टेबलवरील ही तत्त्वे वाचून मला सहकारी  प्रश्न विचारतात. " फक्त आज म्हणजे काय? उद्या का नाही? " त्यावर मी सान्गते की "हे रोजच वाचायचे आहे. तेव्हा आजचा लाक्षणिक अर्थ आहे रोज. आज ह्या शब्दामुळे आपण वर्तमानात रहातो, काल भूतकाळात गडप झाला आहे व आज उद्याला जन्म देणार आहे म्हणून आजच महत्त्वाचा आहे". काही सहकारी मला ह्या प्रत्येक तत्त्वाचे विवेचन करण्यास सान्गतात.

[१] फक्त आज क्रोध करू नका.

क्रोध ही एक नैसर्गिक भावना आहे. कोणीही दोन किन्वा अधिक व्यक्ती एकमेंकाच्या सम्पर्कात जास्त वेळ आल्यास कधीही रागाचे प्रसंग येऊ शकतात. प्रसंगाची घडी विस्कटली की राग येतो. राग जर वेळीच नियंत्रणात आणला नाही तर घडी हाताबाहेर विस्कट्ते. जर विसन्वादी स्वर लागायला लागले तर आपलाच आवाज बंद करावा. रागाचा स्फोट व्हावा इतके त्याला बिलगू नये. तर त्याची कारणे विचारपूर्वक शोधून रागालाच मनातून काढून टाकावे. अतीक्रोधामुळे रक्तदाब वाढण्याचा संभव असतो.

[२] फक्त आज चिंता करू नका.

चिंता म्हणजे भविष्यकाळातील विवंचना. बहुतेकवेळा ती काल्पनिक असते. चिंता करण्याऐवजी ती नाहिशी व्हावी म्हणून आपण काही रचनात्मक आज करावे. अतीचिंता खिन्नमनस्कता / अवसादग्रस्तता अशा मानसिक रोगाना जन्म देऊ शकते.

[३] फक्त आज कृतज्ञ रहा. 

आपल्याला लाभलेल्या प्रत्येक गोष्टीकरता जर आपण आभार मानले तर आपण अत्यंत समाधानी आयुष्य जगू शकतो. "धन्यवाद" ही एक परिपूर्ण प्रार्थना आहे.

[४] फक्त आज प्रामाणिकपणे कष्टपूर्वक उपजीविका मिळवा.

अप्रामाणिकपणा अपराधी मनस्थितीला जन्म देतो. ही नकारात्मक भावना कधी कधी जगणे असह्य करते.

[५] फक्त आज इतरान्शी करूणेने वागा.

करुणा म्हणजे सक्रिय सहनुभूती. करुणेविषयी मी काय बोलू?

जीझस ख्राइस्ट, भगवान बुद्ध, सन्त एकनाथ, मदर टेरेसा व बाबा आमटे ह्यांच्या जीवनात जी करुणा पूर्णपणे व्यापून राहिली होती, तिचा अन्श तरी माझ्या जीवनात यावा अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.