अगा ये सगुणा निर्गुणा (९)

इटालियन संगमरवर

इराणी गालिचा, बेल्जियन झुंबर

स्वप्नील आरास, सत्यात येईल क्षणभर?

क्षणभरासाठी
नाही, तर आपली सर्व स्वप्ने आयुष्यभर सत्यात आणण्यासाठी रेकीप्रणाली एक
सुंदरसे प्रतिकचिन्ह घेऊन सज्ज आहे. त्याचे जपानी नाव आहे, "चो कु रे". हे
चिन्ह आपल्या संस्कृतीतील "स्वस्तिक" ह्या चिन्हाचे विकसित रूप आहे
(स्टायलाइज्ड स्वस्तिक).

" चो कु रे " ह्या शब्दांचा अर्थ आहे,
विश्वातील सगळ्या शक्ती ह्या ठिकाणी, ह्या वेळी केंद्रीभूत झाल्या आहेत.
म्हणूनच ह्या चिन्हाला शक्तिचिन्ह (पॉवर सिंबॉल) असेही म्हटले जाते. भौतिक
विकासाकरता रेकीध्यान साधताना चो कु रे असे पुन्हापुन्हा मनोमन उच्चारले
जाते. रुग्णावर उपचार करतानाही चो कु रे असे म्हणून रेकीध्यान सुरू होते
आणि ते सत्र संपतानाही उच्चारले जाते.

रेकीप्रणालीत अशी संकल्पना आहे
की ह्या चिन्हांना स्वतःची अशी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा संकल्पना बहाल
होते. माझ्या मते ह्या चिन्हाचा जो अर्थ आहे, तोच इतका सकारात्मक आहे की
त्यामुळे संकल्पसिद्धी सुलभ होते.   माझ्या प्रत्येक रेकीध्यानात चो कु रे
ला महत्त्वपूर्ण स्थान असते.

मला एका विद्यार्थिनीने इतका विलक्षण
प्रश्न विचारला की त्याचे उत्तर म्हणून मला माझा वैयक्तिक अनुभव सांगावा
लागला. तिने विचारले, " करुणा आणि भौतिक विकास ह्यांची सांगड रेकी कशी
साधते"? माझे उत्तर होते, " ह्या अनंत अवकाशालाही प्राण आहे व त्यालाच आपण
रेकी असे म्हणतो. जसजशी  आपण रेकीआराधना नियमितरीत्या करू लागतो, तसतशी
आपल्याला ह्या अनंत अवकाशाच्या जिवंतपणाची जाणीव होऊ लागते. आपली भौतिक
विकासाची मागणी मान्य करताना रेकी आपल्याकडे इतरांसाठी फक्त करुणेचे दान
मागते, पण अवश्य मागते, असा नेहमी अनुभव येतो.

साधारण १९९६च्या
सुमाराला माझे वडील निम्न रक्तदाबाने आजारी होते. त्यांना प्रकाश व आवाज
सहन होत नसे. त्यावेळी आम्ही भरवस्तीत तीन खोल्यांच्या लहान जागेत राहत
होतो. जवळजवळ एक वर्ष आम्ही टीव्ही बघितला नाही. शांत वस्तीत मोठी जागा
घेणे भागच होते. जागेच्या किमती ऐकून मी रेकीमातेलाच साकडे घातले.
वडिलांसाठी एक स्वतंत्र खोली, जिच्यापर्यंत टीव्हीचा आवाज जाणार नाही, अशी
पाच खोल्यांची जागा मला हवी होती. त्या जागेचे कल्पनाचित्र मी चो कु रे सह
मनोमन रंगवत असे.

लोकसत्तेत १ जून १९९८ला जाहिरात आली, सरकारी
गृहनिर्माण संस्थेने काही जागा आहेत त्या स्थितीत विक्रीस काढल्या आहेत.
ऑक्टोबर १९९८ला आम्ही निसर्गरम्य ठिकाणी पाच खोल्यांच्या जागेत स्थलांतर
केले. माझ्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली व आम्हालाही स्वास्थ्य
मिळाले. पण रेकीमातेची कृपा एवढ्यावरच थांबली नाही. जागेच्या किमतीचे
हप्ते भरताना मला चारपाच वेळा बँकेत जावे लागले. एकदा मी अशीच कागदपत्रात
मग्न असताना एक चतुर्थश्रेणी स्त्री कर्मचारी मला म्हणाल्या, " तुमच्या
ओळखीचे कोणी स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत का? माझ्या पतीच्या निधनानंतर मी माझ्या
मुलीचे लग्न करून दिले. आता एखादे नातवंड बघीन म्हणते".

वास्तविक मी
स्वतः माझीच बिकट परिस्थिती एकहाती हाकत होते. त्यात हे कुठले नवीन काम?
अन मी स्वतःला सावरले. माझी रेकीमाता म्हणत होती, मी तुला एव्हढी मोठी
जागा घेऊन दिली, मग हे नवीन काम किती आनंदाचे आहे. मी त्या ताईंना माझ्या
डॉक्टर मैत्रिणीकडे घेऊन गेले. त्यांच्या घरी २०००साली मी त्यांच्या
नातवाच्या बारशाला गेले.

माझ्या वडिलांचे आजारपण, माझे रेकीध्यान, चो
कु रे, आमची नवीन जागा, स्वास्थ्य, बँकेतील ताई, माझी डॉक्टर मैत्रीण आणि
ताईंचा नातू असे एक आनंदाचे वर्तुळ रेकीमातेने भौतिक विकास व करुणा यांची
सांगड घालून पूर्ण केले".

जगात प्रज्ञा व करुणा सतत एकत्र नांदोत, अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.