अगा ये सगुणा निर्गुणा (५)

"सजीवांच्या पेशी अणुंच्या बनलेल्या आहेत. त्या अणुंचा उगम, पार सूर्यमालिकेतील ताऱ्यान्च्या रासायनिक विस्फोटातून निघून, आद्य मेघावर स्वार होऊन, पृथ्वीवरील रसायनात मिसळून बनलेल्या जीवक्क्णात आहे. म्हणून आपण सर्व एकमेकान्शी जैविकरित्या, पृथ्वीशी रासायनिकरित्या व ह्या विश्वाशी आण्विकरित्या जोडलेले आहोत. आपण ज्या विश्वात आहोत तेच विश्व आपल्यातही आहे". हे उद्गार, अमेरीकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी, ह्या सन्स्थेच्या नील दग्रास टायसन, ह्या खगोलशास्त्रज्ञांचे आहेत. म्हणजे "पिंडी ते ब्रम्हांडी" हे तत्त्व विज्ञानालाही मान्य आहे. विज्ञान व अध्यात्म ह्यांचा सखोल अभ्यास, ह्या दोहोतील सीमा धूसर आहेत, हेच स्पष्ट करतो.

आद्य रेकीगुरू मिकाओ उसुई, ह्यानी रेकी ज्ञानशाखा जपानमध्ये विकसित केली. बौद्धधर्माचा भारतातून तिबेटमध्ये, तेथून चीनमध्ये, तेथून कोरियामध्ये व शेवटी जपानमध्ये प्रवेश झाला. हा प्रवास हजारो वर्षापूर्वी झाला. त्यामुळे रेकीप्रणालीवर बौद्ध तत्त्वज्ञानाचाही सन्स्कार झालेला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्व " सर्व जीवमात्रात एकात्मतेचे दर्शन" हे आहे. हेच मूलतत्त्व रेकीच्या अभ्यासाचा पाया आहे. ते शिकल्याशिवाय रेकीशिक्षणात प्रगतीच होऊ शकत नाही.

हे तत्त्व विद्यार्थ्याना खरोखर समजावे, म्हणून मी त्याना श्रीमदभागवतातील (स्कंद १, अध्याय ९, श्लोक ४२) भीष्मस्तुती अध्यायातील, बेचाळीसावा श्लोक अर्थासहीत समजाऊन देते. हा श्लोक इतका अर्थपूर्ण आहे की तो आपल्यालाही देण्याचा मला मोह होतो. कुरुक्षेत्रावर झालेल्या नरसन्हारामुळे विषण्ण झालेले धर्मराज, श्रीकृष्ण व पांडवान्सहीत भीष्मराजांच्या भेटीला आलेले आहेत. शरपंजरी भीष्मराज परमात्मा श्रीकृष्णाशी अखेरचा सम्वाद साधतात;

तमिमाम अहमजाम शरीरभाजम / हृदी हृदी धिष्ठिताम आत्मकल्पितानम /प्रतिद्रसम इव नैकधर्कम एकम / समाधिगतोस्मी विधुत भेद मोह //४२// अर्थ-- आता मी पूर्ण एकाग्र होऊन, माझ्यासमोर ठाकलेल्या त्या एकाच परमेशाचे ध्यान करू शकतो; कारण मी द्वैताच्या अज्ञानातून बाहेर पडलो आहे. प्रत्येकाला सूर्य वेगवेगळा भासमान होतो, पण सूर्य एकच आहे. तद्वतच भक्त परमेशाला निरनिराळ्या रूपात पाहतात, पण प्रत्येकाच्या हृदयात असलेला परमात्मा एकच आहे.

त्रेचाळीसाव्या श्लोकात भीष्मराज परमात्म्यात विलीन होतात. बेचाळीसाव्या श्लोकातील सूर्याचा दृष्टान्त विद्यार्थ्याना फारच भावतो. आपल्या सर्वांच्या हृदयातील परमेश्वर एकच आहे म्हणून जीवमात्रात अंतर्गत समानता आहे हे सहज पटते. कधीकधी माझ्याकडे अहिंदू विद्यार्थी येतात. त्याना मी जॉन डॉन (१५७२-१६३१) ह्या ब्रिटिश मिशनरीची कविता समजाऊन देते. वास्तविक हे ध्यानात(मेडीटेशनमध्ये) स्फुरलेले गद्य होते. त्याची मग कविता झाली, जिच्यातल्या ओळी, "FOR WHOM THE BELL TOLLS" आपल्या कादंबरीला शीर्षक म्हणून वापरण्याचा मोह अर्नेस्ट हेमिंग्वे ह्याना १९४० मध्ये झाला. काही ओळी अशा आहेत:

NO MAN IS AN ISLAND, ENTIRE OF ITSELF; EVERY MAN IS A PIECE OF THE CONTINENT, A PART OF THE MAIN.  ANY MAN'S DEATH DIMINISHES ME, BECAUSE I AM INVOLVED IN MANKIND, AND THEREFORE NEVER SEND TO KNOW FOR WHOM THE BELL TOLLS, IT TOLLS FOR THEE. (कोणीही बेटाप्रमाणे एकाकी राहू शकत नाही. प्रत्येकजण ह्या खंडाचा भाग आहे, भूप्रदेशाचा हिस्सा आहे. मातीचे एक ढेकूळ जरी समुद्राने वाहून नेले, तरी यूरोपात तेव्हढीच पोकळी होईल, जेव्हढी समुद्राजवळचा कडा कोसळला तर भासेल, नाहीतर तुझे वा तुझ्या मित्राचे घरकुल उध्वस्त झाल्याने भासेल. कोणाही व्यक्तिचे निधन मलाही कणाकणाने झिजविते, कारण मी मानवतेमध्ये गुंतलो आहे. जेव्हा (दफनविधिनन्तर) चर्चची घंटा वाजेल, तेव्हा 'कोणासाठी घंटा वाजते आहे, हे विचारायला कोणासही पाठवू नकोस. "ती घंटा तुझ्यासाठीच वाजत आहे"). ह्या कवितेमुळे समस्त जीवसृष्टीच्या अंतर्गत एकात्मतेचे सत्य विद्यार्थ्याच्या मनात ठसते. सकारात्मकरित्या आपण असेही म्हणू शकतो, की अर्भकाच्या रूपात आपणच पुन्हापुन्हा जन्मतो.

स्वताच्या अस्तित्त्वाची वेगळी जाणीव नष्ट होऊन चराचर सृष्टीसह मी एकच अस्त्तित्त्व आहे ह्याचे ज्ञान होते. सर्व सचेतन व अचेतन एकाच सृजनशील ऊर्जेचे निरनिराळे आकार आहेत. घटाघटाचे रूप आगळे असले तरी त्यातील मूलद्रव्य "माती" ही एकच आहे. ह्या तत्त्वाच्या अनुभूतीमुळे जीवन अमुलाग्र बदलून जाते. पोटजात, जात, भाषा, धर्म ह्यांच्या बंधनापलिकडे रेकीधर्म संपूर्ण विश्वाला सामावून घेतो. म्हणूनच रेकीच्या आदानप्रदानाला " हे विश्वचि माझे घर" असा आयाम लाभतो.

माझ्याकडे  एकदा एक अहिंदू आई आपल्या ५ वर्षाच्या मुलाला घेऊन आली. त्या बालकाला झोप लागत नव्हती. सौम्य औषधोपचाराबरोबर रेकीही द्यावी असे त्याच्या डॉक्टरनी सुचवले होते. रेकीसाधक रेकी देण्याआधी रुग्णाची परवानगी घेतात. रूग्ण जर सज्ञान नसेल किन्वा कोमात असेल तर त्याच्या पालकाची परवानगी घेतात. त्या बालकाच्या आईने माझ्या कुंकवाकडे पाहात म्हटले, " तू माझ्या धर्माची नाहीस, तेव्हा माझ्या बाळासाठी तू कशी काय प्रार्थना करू शकतेस"? आता मला तिच्या पातळीला जाऊन समजवावे लागले. आपण जरी वेगवेगळ्या धर्माचे आहोत, तरी आपल्या मूलभूत प्रेरणा एकच आहेत. मी जन्मता जरी हिंदू आहे, तरी चंद्रसूर्य जसे आपल्याला सारखाच प्रकाश देतात, तसेच रेकीधर्माप्रमाणे आपण तिघेही परमेश्वराच्या कृपेला पात्र आहोत. तिला माझे म्हणणे पटले किन्वा तिच्यातल्या आईने तिच्या साशंक  मनावर मात केली म्हणा, तिने मला परवानगी दिली. त्या पहिल्या सत्रात बालकाला थोडा आराम वाटला. पाचसहा सत्रानंतर त्याची झोप सुधारली. बाराव्या सत्रानंतर त्याला रेकी ऊपचारांची गरज राहिली नाही.

चराचरातील एकत्वाचे परिमाण म्हणजे कुठल्याही प्रसन्गात दूसऱ्याला समजून घेण्याची मानसिक शक्ती. ही वसुंधरा बहुरत्ना आहे. कुठले रत्न कुठे भेटेल, ह्याचा काही नेम नाही. आपल्याशी कोणी कसेही वागले, तरी असेल त्या व्यक्तिची परिस्थिती तितकीच गंभीर; अशी आपली समजूत काढता आली, तरी ह्या शिक्षणाचे सार्थक झाले, असे म्हणता येईल. जसजसे आपण दूसऱ्याला समजून घेत जातो तसतसे आपण निरपेक्ष होत जातो. निखळ निरपेक्ष मैत्रीचे नाते आपण समाजातल्या विविध स्तरात जोडू शकतो, ते केवळ ह्या एकात्मतेच्या शिक्षणामुळेच.

विश्वातील अंतर्गत समानतेचा सदैव सन्मान करण्याची सुबुद्धी मला दे, अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरूंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.