अगा ये सगुणा निर्गुणा (४)

मावळत्या दिनकराला जेव्हा सूर्योपासक अर्घ्य देत असतात, तेव्हा रेकीसाधक रेकीच्या पाच तत्त्वानुसार आपला आजचा दिवस गेला का?; ह्याचा आढावा घेत असतात. त्यात जर काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्या कश्या सुधाराव्या?; ह्याचा विचार करतात. काळाबरोबर ही तत्त्वे रेकीसाधकांची  जीवनशैलीच बनतात. ह्या पाचही तत्त्वान्मुळे रेकीसाधकांचे घरात आणि समाजात अतिशय मैत्रीपूर्ण स्नेहबंध निर्माण होतात. परंतू एव्हढेच काही ह्या तत्त्वांचे प्रयोजन नाही.

रेकी ही एक ऊर्जा उपचार प्रणाली आहे. निरोगी शरीरही ज्ञानेंद्रियांद्वारे आजूबाजूच्या वातावरणातून ऊर्जा मिळवत असते; पण त्याची आपल्याला विशेष जाणीव नसते. मी एका शनिवारी बॅंकेत गेले होते. तिथे शिरताक्षणीच मला लालबागच्या राजाचे कॅलेंडर दिसले. मला अगदी छान वाटले. पण एकदा शॉर्टकट घ्यावा म्हणून मी समुद्राकडच्या रस्त्याने जात होते. सहज समुद्रावर नजर गेली आणि पटकन डोळेच मिटले गेले. मनात आले, "काल अनंतचतुर्दशी होती, हे विसरून मी का आले समुद्रावर? लवकरात लवकर इथून गेले पाहिजे". एका सालंकृत गणपतीचे दर्शन सकारात्मक ऊर्जा पुरवते तर त्याच दैवताचे रंगहीन दर्शन ऊर्जेचा ऱ्हास करते. सुमनांचा सुवास आपल्याला मोहरून टाकतो. भरपूर बेचव अन्नाऐवजी मोजकेच पण स्वादिष्ट अन्न आपली रसना तृप्त करते. "संजीवन मिळता आशेचे, निमीषात पुन्हा जग सावरले" असली किमया दुरूनी आलेले स्वर करतात. 

जर चित्र, सुगंध व संगीत ह्याना आपण एव्हढे सन्वेदनाशील आहोत, तर रूग्ण हा रेकीसाधकाच्या प्रभामन्डळाला  किती सन्वेदनाशील असेल? म्हणूनच रेकीसाधक रेकीच्या पाच तत्त्वाना अतिशय महत्त्व देतात. क्रोध, चिंता व अप्रामाणिकपणा ह्या नकारात्मक भावना दूर होऊन कृतज्ञतेने व समाधानाने मन भरून जाते. करूणेने रुग्णाविषयी अतीव अनुकंपा वाटते. अशा विशुद्ध अंतकरणाने प्रक्षेपित केलेली दैवी प्राणशक्ती "रेकी", रूग्ण सहजपणे स्वीकारतो. 

वैज्ञानिक सन्शोधनानुसार रेकीची जीवनशैली अनुसरल्यामुळे साधकांचा मेंदू उच्च अल्फा स्थितीत असतो. आपला मेंदू हा एक विद्युतरासायनिक अवयव आहे. त्यातून बीटा, अल्फा, थेटा व डेल्टा अशा विद्युत्लहरी निघत असतात.

जेव्हा आपण काम करत असतो, तेव्हा आपले शरीर व मेंदू दोन्ही सक्रिय असतात. त्यावेळी मेंदूतून बीटा लहरी निघत असतात. त्यांची वारन्वारता (फ्रिक्वेन्सी) साधारण १५-३० आवर्तने प्रती सेकंद (हर्टझ) असते. बीटा स्थितीचा अंतर्ध्वनी कार्यसन्मुखता आहे.

जेव्हा आपण काम संपवून खुर्चीत शान्त बसतो तेव्हा आपले शरीर विश्रान्त व मेंदू जागृत असतो. त्यावेळी मेंदूतून अल्फा लहरी निघत असतात. त्यांची वारन्वारता साधारण ८-१४ आवर्तने प्रती सेकंद असते. ध्यानाच्या (मेडिटेशनच्या) प्राथमिक अवस्थेतही मेंदूतून अल्फा लहरी निघत असतात. सजगता व एकाग्रता हे अल्फा स्थितीचे गुणधर्म आहेत. रेकीच्या आदर्श आदानप्रदानासाठी रूग्ण व रेकीसाधक दोघांचे मेन्दू अल्फा स्थितीत असावे लागतात. अल्फा स्थितीचा अंतर्ध्वनी अंतर्ज्ञान (INTUTION)आहे.

जेव्हा खुर्चीत आपले डोळे मिटतात तेव्हा आपले शरीर व मेंदू दोन्ही विश्रान्त असतात. त्यावेळी मेंदूतून थेटा लहरी निघत असतात. त्यांची वारन्वारता  साधारण ५-७ आवर्तने प्रती सेकंद असते. ध्यानाच्या अंतिम अवस्थेतही मेंदूतून थेटा लहरी निघत असतात. सृजनशीलता हा थेटा स्थितीचा गुणधर्म आहे. थेटा स्थितीचा अंतर्ध्वनी निशब्द शांतता आहे.

जेव्हा खुर्चीत आपल्याला गाढ झोप लागते तेव्हा आपले शरीर विश्रान्त व मेंदू निद्रीस्त असतो. त्यावेळी मेंदूतून डेल्टा लहरी निघत असतात. त्यांची वारन्वारता साधारण १.५-४ आवर्तने प्रती सेकंद असते. डेल्टा स्थितीचा अंतर्ध्वनी स्वप्न आहे.

अल्फा स्थितीची शांत मनोवृत्ती प्रदान करणारी रेकीची पाच तत्त्वे पुन्हा पाहू.

[1] JUST FOR TODAY DO NOT ANGER. [2] JUST FOR TODAY DO NOT WORRY. [3] JUST FOR TODAY BE GRATEFUL. [4] JUST FOR TODAY WORK HARD WITH HONESTY. [5] JUST FOR TODAY BE KIND TO OTHER.

समस्त जीवसृष्टीला स्वस्थचित्त करण्याची मी रेकीमातेला प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.