अगा ये सगुणा निर्गुणा (७)

मनाचिये गुंती,  गुंफियेला शेला /

बाप रखुमादेवीवरे, विठ्ठले अर्पिला /

मोगरा फुलला, मोगरा फुलला //

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या मनाच्या शेल्याच्या दैवी प्रतिभेचा अलौकिक परिमळ अजूनही भक्तांच्या मनात दरवळत आहे.

मन हे जाणीवेचा अनुभव व बुद्धिगम्य विचार ह्यानी बनलेले आहे. मनाचे पैलू भावना दर्शविणे, लक्ष देणे, ग्रहण करणे, तर्क करणे, कल्पना करणे, स्मृती ठेवणे, सम्वाद व दूरसन्वाद (टेलिपथी) करणे हे आहेत. प्रेम, तिरस्कार, भीती, दुःख व आनंद ह्या मनात उमटणाऱ्या मूलभूत भावना आहेत, तर तर्क व स्मृती ही मनाची उच्च प्रतीची कार्ये आहेत. मन व शरीर एकमेकात बेमालूम मिसळून आहे.

मन बोलते म्हणजे आपणच मुग्ध स्वगत बोलतो. स्वकेंद्रित व्यक्ती सतत मनात बोलत राहतात. जोपर्यंत हे बोलणे सकारात्मक असते, तोपर्यंत ते आत्मविश्वास वाढविणारे, प्रोत्साहित करणारे असे लाभदायी असते. आनंदी मनोवृत्तीचे ते लक्षण असते. परंतू मनाची नकारात्मक बडबड दुःखी मनोवृत्तीला जन्म देते.

बर्ट्रांड रसेल आपल्या "दी कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस / सुखाचा शोध (प्रकाशन १९३०)" ह्या पुस्तकात म्हणतात, "श्रीमंत लोक आनंदात असतात पण काही श्रीमंत लोक खूप दुःखात जीवन कंठतात. गरीब लोक दुःखी असतात पण काही गरीब मात्र मजेत जगतात. विवाहित लोक सुखी असतात पण काही विवाहित लोक खूप दुःखात असतात. अविवाहित लोक एकटेपणामुळे दुःखी असतात पण काही अविवाहित लोक मजेत असतात. म्हणजेच जगात सुखदुःखाची वेगवेगळी कारणे आहेत पण लोक मात्र दोनच प्रकारचे आहेत. एक आनंदी मनोवृत्तीचे नाहीतर दुःखी मनोवृत्तीचे". आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपण मन सदैव प्रसन्न ठेवणार आहोत की अप्रसन्न रहाणार आहोत.

मला आयुष्याने इतके भाबडे ठेवले नाही की मी म्हणेन मानवी जीवन खूप सुंदर आहे. त्याच्यातील असुंदर आपल्याला सुंदर करून घ्यायचे आहे. हलाहल पचवून अमृताचा स्वाद जिभेवर आणणे श्रेयस्कर आहे. आनन्दी प्रवृत्ती उत्साहाची उर्जा निर्माण करते. भूक जिवंत राहण्यासाठी आवश्यक आहे, तर उत्साह जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. दुःखी मनोवृत्ती आपल्यातील उर्जेचा म्हणजेच प्राणशक्तीचा ऱ्हास करते. एक दुःख दहा दुःखाना आमंत्रण देते. आनंदाच्या लहरी नवनवीन आनंदाना बोलावतात.

रेकी आद्यगुरू मिकाओ उसुई रेकीला "आनंदाच्या आमंत्रणाचे रहस्य" असे म्हणत. दैनंदिन रेकीसाधनेमुळे रेकीसाधक आनंदी मनोवृत्ती धारण करतात. काही अपरिहार्य कारणामुळे रेकीसाधक विमनस्क मनस्थितीत असले, तर ते रेकी उपचारसत्र रद्द करतात. नकारात्मक दुःखी मनोवृत्ती बदलण्यासाठी एक साधा व जलद उपाय म्हणजे कृतज्ञता. आपण चांगले हवामान, आरोग्य, डोक्यावर छप्पर अशा गोष्टीसाठी कृतज्ञ राहू शकतो. करूणेच्या गुणधर्मामुळे रेकीसाधकाच्या आसपासच्या लोकांचे जीवनही सकारात्मकरित्या बदलून जाते.

शेवटी सगळी धडपड "शेवटचा दीस गोड व्हावा" यासाठी आहे. जर त्या दिवशी, सर्व सुखदुःखाच्या पार जाऊन, आपले मन प्रसन्न असेल, तर आपण म्हणू शकू,

मन हा मोगरा, अर्पूनि ईश्वरा, पुनरपि सन्सारा, येणे नाही.

सगळ्यांची मनकमळे सदैव उन्मीलित राहू देत, अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते. मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते.

मी आपलेही आभार मानते.