कंडक्टर प्रवाशांवर का ओरडतात ?

शहरी बसच्या किंवा एस.टी.च्या कंडक्टरचा आपण कधी ना कधी अनुभव घेतलेलाच असतो. बरेच कंडक्टर अनेकदा प्रवाशांवर सतत खेकसत असतात, असे आढळते. गर्दीच्या बसमध्ये तर प्रवासी इतका केविलवाणा होतो, की, `मुकी बिचारी, कुणी हाका' अशा स्थितीत दिसतो. तिकिटाचे नेमके `सुट्टे पैसे' द्या असा एक `आदेश' बसमध्ये दिसतो. त्यामुळे, सुट्टे पैसे न देणे हा जणू गुन्हा असावा, असे वाटावे, अशा पद्धतीने प्रवाशांवर खेकसणारे आणि त्यामुळे कधी एखाद्याला पुढच्या स्टॉपवर उतरवून देणारे कंडक्टर मी पाहिलेले आहेत. स्टॉपवर थांबलेल्या बसच्या दरवाजाबाहेरच्या गर्दीवर खेकसणे हादेखील जणू कंडक्टरला मिळालेला व्यवसायसिद्ध हक्क असावा. 

प्रवासी बेशिस्त असतात आणि आपण त्यांच्यावर खेकसलो नाही, तर त्यांना शिस्त लागणार नाही, असाच या जमातीचा समज असावा, असे मला वाटते. अर्थात, तमाम कंडक्टर वर्गाबद्दल असे असतेच असे नाही. पण दिवसातून अनेकदा प्रवास करणाऱ्याने एकदा तरी असा कंडक्टर `अनुभवलेला' असावा. कदाचित, दिवसभराच्या फेऱ्यांमध्ये अनेक प्रकारच्या, स्वभावांच्या आणि तऱ्हांच्या प्रवाशांना `तोंड देताना' हा प्राणी जेरीस येत असेल. सर्वच प्रवाशांवर खेकसून सुरुवातीलाच सर्वांना `नरम' केले, की, एखादा `ज्यादा' प्रवासीदेखील गप्प राहातो, असा अनुभव एका कंडक्टरने मला सांगितला आहे. `समूहा'वर अशा पद्धतीने दडपण आणण्याचे त्याचे `मानसशास्त्र' अनेक प्रवासी निमूटपणे मान्य करतात, आणि तो सांगेल तसे वागतात, असे दिसते. कधीकधी तर बिचारे त्याच्या खेकसण्यापुढे शरमून गेलेलेही दिसतात. बसमधल्या समूहाला `शिस्त' लावण्याची ड्यूटी बजावणारा असा `कंडक्टर', समजाच्या अन्य क्षेत्रांतही असेल तर?