लपेटून तारे शरीरावरी
निघालीस कोठे मनोहर नारी?
जवळ ये जराशी, जिवा ये हुशारी ।ध्रु।
नसे मीच जर, सांग हृदयेश्वरी,
कुणा पाहुनी हाय तू लाजणे?
पहाणार नाहीस तू आरसा
असे मजविना तुजनशीबी भिणे ।१।
लपेटून तारे ...
नसे मौज नटण्या-मुरडण्यामधे
रसिक ना कुणी जर असे पाह्यला
सुको व्यर्थ ना रूपराजीव हे
कुणी भृंग बंदी हवा व्हायला१ ।२।
लपेटून तारे ...
परीक्षा घडे प्रीतिची आज ही
कि धुंदीत तुज देवि संबोधले
निवाडा करू दे जगाला अता
कि हे कृत्य वाईट की चांगले ।३।
लपेटून तारे ...
टीपा
१. पाठभेद : ह्या दोन ओळींचे भाषांतर करतना कल्पनेचे स्वातंत्र्य घेतलेले आहे. मूळ कल्पनेप्रमाणे भाषांतर :
फुका रूपज्योती विझाया नको
हवा चाहता जीव टाकायला
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल
)
ध्रुवपदाची पहिली ओळ आणि कडव्यातील सर्व ओळी : लगागा लगागा लगागा लगा (शेवटी गा नसलेले भुजंगप्रयात? )
ध्रुवपदातली दुसरी आणि तिसरी ओळ : लगागा लगागा लगागा लगागा (भुजंगप्रयात?)
(भाषांतर करताना चालीत बसेल इतपत केलेले आहे. )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे
शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. उत्तरे व्यनी तून पाठवू नयेत.
३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील
)
४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका
काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)