... दिलासा!

.........................
... दिलासा!
.........................

दूर तिथे तू; तुझ्या व्यथांची
इथे लागते आंच मला!
तुझी वेदना अबोल आहे...
तिचाच होतो जाच मला!

हे सारे का असेच आहे -
कुठवर हे राहील असे?
पुन्हा पुन्हा का पडतो आहे
प्रश्न नेमका हाच मला!

माझ्यामधल्या तुझेपणाचा
कळेल नक्की अर्थ तुला...
मिटून डोळे कधीतरी तू
नीट एकदा वाच मला!

काय बोललो; मला स्मरेना...!
काय समजले तुला; कळेना!
होत राहतो हाय सारखा
त्रास मात्र असलाच मला!

तुला आठवण माझी नक्की
कधीतरी येईल पुन्हा
दुसरे काही नको; दिलासा -
हवा आज इतकाच मला!

- प्रदीप कुलकर्णी

.........................
रचनाकाल ः १७ मार्च १९९८
.........................