प्रेम का सजवू तुझे...?

..........................................
प्रेम का सजवू तुझे...?
..........................................

लावला नाही कधी मुद्दा तुझा उडवून मी!
बोलताना रोखले नाही तुला नडवून मी!

प्रश्न सुरुवातीस मज पडला भविष्याचा जरी...
शेवटी गेलोच ना इतिहास पण घडवून मी?

'मी तुझ्या वाटेतला धोंडा... 'तुझा आरोप हा...
सिद्ध कर की! ठेवले कोठे तुला अडवून मी? 

वांड पोरासारखा हट्टीपणा याचा किती...
कैकदा माझ्या मनाला काढतो बडवून मी!

ऐकवावी मी कशासाठी तुला माझी कथा?
सांग आनंदा, तुला का जायचे रडवून मी?

आसवे प्रत्येक वेळी लपवता आली कुठे?
आसवांची कारणे पण ठेवली दडवून मी!

प्रेम का सजवू तुझे मी फावल्या वेळातले...?
व्यर्थ खोळंबू , तुझ्यावर जीव का जडवून मी?

- प्रदीप कुलकर्णी

..........................................
रचनाकाल ः ७ जानेवारी २००९
..........................................