कोमल गंधार (भाग - अंतिम)

सकाळी कर्तव्य जाणीवेनंच ठरल्या वेळी प्रज्ञा उठली. खरं तर चैतन्यही आज तिच्याबरोबर जंगलात जाणार होता. पण आदल्या रात्रीच्या स्मरणधुंदीत स्वतःच्या झोपेला आवर घालणं त्याला अशक्य झालं. पटापट आवरून आणि बरोबर येणाऱ्या बाईला सोबत घेऊन प्रज्ञा तिच्या कामासाठी जंगलात निघून गेली. नऊच्या सुमारास आळोखे पिळोखे देत चैतन्य उठला. आंघोळ वगैरे उरकून त्याने पुन्हा आपलं लेखनाचं स्थान ग्रहण केलं.  पण आज कामात लक्षच लागत नव्हतं.  पेन हातात धरवतच नव्हतं. रात्रीच्या आठवणींनी सारं अंग रोमांचित होत होतं. लिखाणाचं सारं साहित्य समोर घेऊन शून्यात नजर लावून तो बसला होता. जेवणाच्या सुमारास प्रज्ञा आली तेव्हाही तो तसाच बसलेला होता.  प्रज्ञाला थोडसं हसू आलं.  तिचीही अवस्था थोड्याफार फरकानं तशीच होती. पण तिनं सकाळीच बाहेर पडून स्वतःला कामात गुंतवून ठेवायचा प्रयत्न केला होता. 

"काय रे लिखाण करतोयस की टाईम पास? " जणू तिच्याकडे सगळं कसं आलबेल आहे असं दर्शवत प्रज्ञानं विचारलं.    

"छेः, आज एक कणाचंही काम झालं नाही. " चैतन्य हसत हसत बोलला. त्या हसण्याचा अर्थ त्या दोघांनाच फक्त माहिती होता.

"हुं... " प्रज्ञानं हुंकारानं उत्तर दिलं.

जेवणाच्या टेबलवरही दोघे फक्त 'हवं-नको' पुरतंच बोलत होते. जेवणानंतर प्रज्ञाला पुन्हा जंगलात जायचं होतं.    

"अरे सकाळच्यातली काही ऑब्जर्वेशन्स बाकी आहेत. म्हणून मी परत आत्ता जाऊन ती सगळी कंप्लीट करावी म्हणतीये. "

"चल मग मी पण येतो तुझ्याबरोबर.  इथे एकट्याला अगदी कंटाळा आलाय मला. "

"नाही... नको चैतन्य. " प्रज्ञानं स्पष्ट शब्दात नकार दिला.

"का? काय प्रॉब्लेम आहे? इन फॅक्ट तू सकाळपासूनच अशी गप्प गप्प आहेस... माझ्याशी फारसं बोलतही नाहीयेस... काय झालंय प्रज्ञा? "

"नाही... तसं काहीच नाही चैतन्य... पण.. " चैतन्यची नजर चुकवत प्रज्ञानं उत्तर दिलं.

"हे बघ प्रज्ञा माझ्या येण्यानं तुला काही प्रॉब्लेम होणार असेल तर तसं स्पष्ट सांग... " चैतन्य थोडासा कातावला होता.

"छे छे, अरे असं काय बोलतोयस चैतन्य तू... म्हणजे तू आलास तर मला आनंदच होईल... अगदी नक्की... पण... "

"पण काय प्रज्ञा?"

"... अं काही नाही... बरं चल, ठीक आहे... चल जाऊ आपण... " काहीशा नाखुशीनंच प्रज्ञा तयार झाली. 

जंगलाच्या ज्या भागात जायचं होतं तो भाग काल आज जाऊन आल्यामुळे प्रज्ञाच्या बऱ्यापैकी माहितीचा झाला होता. चैतन्य प्रज्ञाच्या पाठोपाठ नुसताच भटकत होता. प्रज्ञा कुठे थांबत होती, कुठे भिंगातून अळ्यांचं, रेशमी किड्यांचं, फुलपाखरांचं अगदी जवळून निरिक्षण करत होती, कुठे त्यांचे फोटो काढत होती, कुठे तिच्या वहीत नोंदी करत होती.

"ओह वॉव... " बराच वेळ त्यांच्या दोघांच्यात असलेल्या शांततेला तडा देत प्रज्ञा कुजबुजली "चैतन्य लवकर इकडे ये... आवाज करू नकोस... " प्रज्ञा एका अतिशय सुंदर फुलपाखराचं निरिक्षण करत होती. तिनं चैतन्यला ते फुलपाखरू दाखवलं, "हे बघ किती सुंदर आहे... माझं सगळ्यात आवडतं फुलपाखरू".

"ओहोहो... वा वा... फारच छान. काय म्हणतात याला? " चैतन्यनं फुलपाखरावरची नजर न काढताच विचारलं.

"याचं शास्त्रीय नाव आहे वनेसा कार्डुई. पण याला रुढ भाषेत पेंटेड लेडी म्हणतात. "

"पेंटेड लेडी? वाह... " चैतन्य.

"हं.  बघ कित्ती वेगवेगळ्या रंगांचे ठिपके आहेत त्याच्यावर... सो ब्राईट... सो ब्यूटिफूल... वॉव... ओहोहो... उडालं बघ बघ... काय सुरेख फ्लाईट आहे त्याची... " प्रज्ञाचा आनंद ओसंडून वाहत होता.

"आय ऍम लुकींग ऍट माय पेंटड लेडी... " चैतन्य हसत हसत प्रज्ञाकडे बघत उदगारला. प्रज्ञाच्या चेहेऱ्यावर मंद स्मित पसरलं. तिनं चैतन्यकडे बघायचं टाळलं. दोनच मिनिटात पेंटेड लेडी दुसऱ्या एका फांदीवर जाऊन विसावलं.  प्रज्ञानं त्याच्यावरची नजर अजिबात विचलीत होऊ दिली नाही.    

"ही फुलपाखरं अशी इकडून तिकडे का उडत असतात प्रज्ञा? " चैतन्यनं विचारलं.    

"अरे, हे पेंटेड लेडी खरं तर मायग्रेटरी बटरफ्लाय आहे. त्यामुळे ते सतत प्रवासातच असतं. पण अर्थात आत्ता ते उडालं ते केवळ आपल्या हालचालींमुळे दचकून.  पण नाहीतर आता ते त्या फांदीवर बसलंय ना... आता बघ त्याची मादी त्याला भेटेपर्यंत ते तिथनं अजिबात हलायचं नाही.  आणि इतर पक्षी प्राणी जसे मेटींग कॉल्स देतात नं तसेच हे त्यांच्या शरीरातून फेरोमॉन्स सोडतात आणि यांची मादी या भागात आली की ती या फेरोमॉन्सच्या वासानं आकर्षित होते आणि मग यांचं तिच्या भोवती प्रेमनृत्य चालू होतं. अगदी बघण्यासारखं असतं ते... " प्रज्ञा अभ्यासकाच्या तन्मयतेनं चैतन्यला समजावून सांगत होती "आणि मग या प्रेमनृत्यानं भारावून जाऊन प्रेयसी स्वतःला थांबवूच शकत नाही... अं... " प्रज्ञानं चोरट्या नजरेनं हळूच चैतन्यकडे पाहिलं "अं... म्हणजे... तिचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं... आणि... आणि ती... शी जस्ट सरेंडरस... तिच्या मित्राला ती आपलं सर्वस्व अर्पण करते... " फुलपाखरावरची नजर न काढताच कुजबुजत्या आवाजात प्रज्ञा बोलली.

एक दोन मिनिटं स्तब्धतेत गेली. कुणीच कुणाशी काही बोललं नाही... अन दोन पावलं पुढं होऊन प्रज्ञाच्या खांद्याला धरून चैतन्यनं तिला स्वतःकडे वळवलं... क्षणभर नजरानजर झाली आणि आवेगानं प्रज्ञा चैतन्यच्या मिठीत शिरली. पलिकडच्या फांदीवर पेंटेड लेडीची मादी येऊन उतरली होती आणि त्या दोघांचं एकमेकांभोवती प्रेमनृत्य सुरू झालं होतं...

भावनेचा पहिला आवेग ओसरल्यानंतर प्रज्ञानं स्वतःला सावरलं. चैतन्यच्या मिठीतून तिनं स्वतःला सोडवून घेतलं अन त्याच्यापासून थोडीशी दूर झाली. "नको... चैतन्य... " प्रज्ञा कसंबसं म्हणाली.

"का?... काय झालं प्रज्ञा अचानक...? "

"काही नाही चैतन्य. पण आय थिंक वुई शुड कंट्रोल अवरसेल्वज... " प्रज्ञा थोडसं तुटकपणे म्हणाली.

"म्हणजे? काय झालं प्रज्ञा...? नीट सांग ना... "

"चैतन्य... हे बघ वुई शुड नॉट फरगेट मी एक लग्न झालेली स्त्री आहे... आणि आपण... हे असं... "

"आपण... हे असं म्हणजे? मला नाही वाटत आपण काही गैर करतोय... पण तुला काय म्हणायचंय ते आधी नीट सांग... "

"हं... आय रिअली डोंट नो चैतन्य... मला काय म्हणायचंय मलाच नीटसं माहिती नाहीये... " प्रज्ञा बुचकळ्यात पडल्यासारखं बोलत होती.

"प्रज्ञा मला माहिती आहे आणि मी बघूही शकतोय की आज सकाळपासून तुझ्या डोक्यात विचारांची आवर्तनं चालू आहेत.. तुझं आतल्या आत काय द्वंद्व चालू असेल याचा मला अंदाज आहे प्रज्ञा. आपण एकमेकांना तेवढं चांगलं नक्कीच ओळखतो. पण मला माहिती असलं तरीही तू ते बोलणं आवश्यक आहे. प्लीज टॉक इट आऊट प्रज्ञा... आपण आता कॉलेजात नाही आहोत. आपण दोघेही आता मॅच्युअरड, समजूतदार, विचारी आहोत. त्यामुळे आपण दोघांनीही बोलणं आवश्यक आहे... " 

"तू म्हणतोयस ते खरंय चैतन्य... मी जबरदस्त गोंधळात पडलीये... मला खरंच कळत नाहीये काय योग्य आणि काय अयोग्य... आज सकाळपासून माझ्या मनात अक्षरशः वादळ उभं राहिलंय... आणि याचा मला खूप त्रास होतोय रे... मी काय करू... "

"स्पीक इट आऊट प्रज्ञा.... " चैतन्यनं तिच्या पाठीवर हलकेच थोपटलं.   जंगलातच थोड्याश्या मोकळ्या जागेत एक स्वच्छ मोठा खडक होता.   चैतन्य अन प्रज्ञा त्याच्यावर जाऊन बसले.  

"चैतन्य तुला कसं सांगू... पण आज सकाळपासूनच माझ्या डोक्यात प्रचंड गोंधळ उडालाय... मला... मला खरंच कळत नाहीये की आपण हे असे इतके जवळ आलोय ते योग्य का अयोग्य... " गवताच्या काडीशी चाळा करत प्रज्ञा बोलली.

"म्हणजे काल जे काही घडलं ती चूक होती किंवा घडायला नको होतं असं तुला आता वाटतंय का? " चैतन्य.

"छे, छे. आय हॅव नो रिग्रेटस. उलट त्याच्याबद्दल तर मी खूप आनंदी आहे. मला ते अगदी छान वाटतंय.  पण माझा गोंधळ काहीतरी वेगळाच आहे आणि खरं तर मला स्वतःलाच माझा नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कळत नाहीये. कदाचित आपल्या या नात्याच्या भवितव्याची मला भीती वाटत असेल. आय डोंट नो... "

"भवितव्याचा विचार कशाला करतीयेस प्रज्ञा? आपण एकमेकांना आवडतो हे तर सत्य आहेच.  हे तर तू नाकारू शकत नाहीस?   मग माझं मत असं आहे की या आवडीतून, एकमेकांबद्दल असलेल्या सुप्त आकर्षणातून आणि आपल्यातल्या पंचवीस वर्षांच्या निरमय मैत्रीतूनच आपल्यातल्या या प्रेमानं जन्म घेतलाय आणि या प्रेमाला असा सुंदर नैसर्गिक महौल, अशी सुंदर संध्याकाळ, अशा सुंदर गप्पा, अशी आनंदी चित्तवृती, असं सुंदर पार्श्वसंगीत या सगळ्याची जोड मिळाल्यावर काल जे घडलं ते अगदी नैसर्गिकच होतं. हे निसर्ग नियमाला अनुसरूनच आहे. त्यामुळे यावर फार विचार करून आणि काय योग्य काय अयोग्य वगैरे अशा गोंधळात तू पडू नयेस असं मला वाटतं.. डोंट वरी प्रज्ञा... " चैतन्यनं समजावण्याचा प्रयत्न केला.  

एक सुंदर छोटसं पिवळ्या बदामी रंगाचं, त्यावर छोटे छोटे काळे ठिपके असलेलं फुलपाखरू प्रज्ञाच्या समोर इकडून तिकडे छोट्या छोट्या भराऱ्या घेत होतं. नजर त्याच्यावरून न हलवता प्रज्ञा म्हणाली " नाही चैतन्य, हे एवढं सरळ सोपं नाहीये. याला अजून एक महत्त्वाचा अँगल आहे... आणि मला वाटतं... माझा मानसिक गोंधळ त्याच्यामुळेच आहे... तुला ते कसं सांगायचं मला कळत नाहीये... " दोन एक मिनिटं पुन्हा स्तब्धतेत गेली. पिवळं छोटसं फुलपाखरू आता अलगद येऊन प्रज्ञाच्या पायावर बसलं होतं.

"... चैतन्य तुला माहिती नाहीये पण... अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला तू अगदी कॉलेजपासूनच खूप आवडतोस... आणि आवडतोस म्हणजे नॉट ओन्ली ऍज अ फ्रेंड... पण त्याहीपेक्षा खूप जास्त... म्हणजे... म्हणजे... यू नो व्हॉट आय मीन... " प्रज्ञाला चैतन्यकडे बघायचा धीर होत नव्हता.

"हं... " चैतन्य लक्षपूर्वक ऐकत होता.

"तू इतका रुबाबदार देखणा दिसायचास... म्हणजे अजूनही दिसतोस.. " चैतन्यकडे चोरटी नजर टाकत प्रज्ञा बोलली "... की मला तुझं बोलणं सतत ऐकत राहवसं वाटायचं... सतत तुझ्या सान्निध्यात राहण्यासाठी मी प्रयत्न करत रहायची... माझ्याशी तू तास न तास गप्पा मारत राहाव्यास... मला कधी प्रेमानं जवळ घ्यावंस असं मला वाटायचं... "

"माय गॉड... प्रज्ञा... मला हे म्हणजे खरंच... मी कायमच समजायचो की... "चैतन्य स्तिमित झाला होता.

"माझं एक मन कायम स्वप्न बघायचं की एक दिवस येऊन तू मला मागणी घालशील... पण दुसरीकडे मला हेही कळत होतं की मी काही दिसायला फार सुंदर वगैरे नव्हते आणि तुझ्या अवती भवती तर... त्या सगळ्या आवडत्या, नावडत्या सगळ्या असायच्या... मी रोज हिरमुसली व्हायचे... " प्रज्ञाचे डोळे पाण्यानं डबडबले होते.

"पण प्रज्ञा, तुझं स्थान माझ्या मनात अगदी वेगळं होतं.  तू माझी जीवश्च कंठश्च मैत्रीण होतीस.  हे खरं आहे की मी कधी तुझ्याबद्दल माझी भावी बायको म्हणून विचार केला नाही.  पण तुझ्या डोक्यात होतं तर मला बोलली का नाहीस? "

"बऱ्याच वेळा वाटायचं की बोलावं... पण... कधी जीभ रेटलीच नाही... कायम भीती वाटायची... "

"भीती? माझी भीती? " चैतन्यनं हसत हसत विचारलं.

"तुझी भीती नाही रे... "

"मग? "

"कसली भीती कुणास ठाऊक... कदाचित रिजेक्शनची भीती असेल... आय डोंट नो... "

"अगं बोलायचंस गं... तुझं म्हणणं बरोबर आहे माझ्या अवती भवती अगदी सुंदर सुंदर मुली असायच्या... पण...तुझं स्थानच निराळं होतं प्रज्ञा... तुझा माझ्यावर अधिकार होता... तिथं सौंदर्य वगैरे हा मुद्दाच किरकोळ होता... "

"आय डोंट नो चैतन्य... मला चांगलं आठवतंय माझी त्यावेळची मनस्थिती एवढी वाईट होती... "

"आय अंडरस्टँड प्रज्ञा... आय अंडरस्टँड... " चैतन्यनं हलकेच प्रज्ञाला जवळ घेऊन थोपटलं.  अश्रूंची लागलेली धार थांबण्याचा प्रज्ञानं कुठलाही प्रयत्न केला नाही.  चैतन्यच्या खांद्यावर डोकं टेकून बराच वेळ प्रज्ञा शांत बसून राहिली. अन चैतन्य तिच्या डोक्यावर हलकेच थोपटत राहिला.  

"प्रज्ञा... " चैतन्यनं पुन्हा हळुवारपणे बोलायला सुरवात केली "पण मग कन्फ्यूजन कुठे आहे?  तुझ्या मनात एवढा गोंधळ का उडालाय? म्हणजे... खरं तर तुला आनंदी असायला हवं.  कारण एका अर्थानं पंचवीस वर्षांनंतर तुझ्या तपश्चर्येला फळ मिळालं... "

"हो, बरोबर आहे चैतन्य". प्रज्ञानं एक दीर्घ निश्वास टाकला"...आणि म्हणूनच मी म्हटलं ना की काल जे झालं त्याबद्दल मी खरं तर आनंदी आहे.  आज पंचवीस वर्षानी का होईना पण एका अर्थानं माझं प्रेम सफल झालं... " 

"हं... मग? " चैतन्य. 

"पण हे सगळं अगदी अनपेक्षितरित्या झालं.  कॉलेजमध्ये असताना मी एवढी नाउमेद झाले होते की माझ्या मनानं अगदी नक्की ठरवूनच टाकलं की चैतन्य आपल्याला कधीच मिळणार नाही.  आणि आई बाबांनी जे पहिलं स्थळ आणलं त्याला होकार देऊन मी लग्न करून टाकलं... पण मी तुला सांगते चैतन्य... आय वॉज एक्सट्रीमली लकी.  मला अतिशय चांगलं सासर मिळालं.  मी अगदी खरं सांगते पण नाव ठेवण्यासारखी माझ्या सासरी अक्षरशः एकही गोष्ट नाही. अविला तर तू ओळखतोसच.  ही इज अ जेम ऑफ अ पर्सन.  मी या घरात पूर्ण सुखी, पूर्ण समाधानी आहे.  माझा नवरा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, मीही त्याच्यावर तेवढंच प्रेम करते.  माझ्या दोन्ही मुली... ममा म्हणजे त्यांचं सगळं विश्व आहे... मटेरिअलिस्टिकलीही आमच्या कडे सगळं आहे... गाडी, बंगला, ड्रायव्हर, बँक बॅंलन्स... सगळं काही" प्रज्ञा अखंड बोलत होती.

"हं... पण मग प्रॉब्लेम कुठे आहे?"

"हाच तर प्रॉब्लेम आहे चैतन्य.  एवढं सगळं चांगलं असताना काल जे झालं ते होउ देण्याची गरजच काय होती?  दैवानं सगळं काही उदारपणे मला दिलंय तरीही माझ्या त्या जुन्या प्रेमाला मी कवटाळून बसायला हवं होतं का?  मला हेच तर कळत नाहीये.  प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस चैतन्य... मला तू आजही तेवढाच आवडतोस... पण आता मी कॉलेजात नाही हे मी लक्षात ठेवायला हवं होतं... "

चैतन्य लक्षपूर्वक ऐकत होता.  

"माझं एक मन मला आता खातंय... अपराधीपणाची भावना येतीये... योग्य-अयोग्य, नीती-अनीती असा खूप गोंधळ उडालाय माझा....  चैतन्य, प्लीज हेल्प मी टू रिजोल्ह धिस कॉन्फ्लिक्ट... " 

"हुं ... " चैतन्य विचारात खोल बुडाला होता.  

उन्हं कलली होती.  जंगलाच्या दैनंदिन चक्रातल्या संध्याकाळच्या घडामोडी सुरू झाल्या होत्या.  एकमेकांशी एकही शब्द न बोलता हातात हात घालून चैतन्य अन प्रज्ञा बंगल्यावर परत आले.  

रामभाऊंनी आजही बाहेरच्या हिरवळीवर टेबल, खुर्च्या लावल्या होत्या. संध्याकाळ सरली.  अंधार पडायला लागला.  आज पौर्णिमा होती पण आकाशात थोडे ढग होते त्यामुळे चांदणं टिपूर नव्हतं.  चंद्रोदय व्हायला तर अजून बराच अवकाश होता.  चैतन्य अन प्रज्ञा ताजे तवाने होऊन पुन्हा गप्पा मारायला बाहेर येऊन बसले.  अर्थात आजचा मूड जरासा गंभीर होता.  वातावरण हलकं करण्यासाठी चैतन्यनं पुन्हा एकदा छानसं संगीत लावलं.  इकडच्या तिकडच्या उत्तेजनार्थ गप्पा झाल्यानंतर बोलणं पुन्हा एकदा मूळ विषयावर आलं.

"चैतन्य खरं सांगायचं तर तुझ्याशी दुपारी बोलल्यानंतर आता मला बरंच बरं वाटतंय.  माझ्या प्रश्नाला अर्थातच अजून उत्तर सापडलं नाहीये पण निदान प्रश्न काय आहे एवढं तरी मला नक्की लक्षात आलंय.  त्यानंच बराच गोंधळ निवालाय." प्रज्ञा शांतपणे बोलत होती.

"हं. डोक्यात गोंधळ असताना उत्तर मिळणं अशक्यच. प्रश्नाचं आधी नीट आकलनही तेवढंच महत्त्वाचं असतं... " चैतन्य.

"हे बघ प्रश्न असा आहे चैतन्य, की एका बाजूला माझा जीवलग मित्र आहे, ज्याच्याबरोबर मी आयुष्यातला सोनेरी काळ घालवला, ज्याच्याबरोबर सुखदु:खाच्या अनंत आठवणी आहेत... आणि ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करते... पण हे प्रेम कधी सफलच होणार नाही असं गृहीतच धरून मी दुसऱ्या व्यक्तिशी लग्न केलं, संसार केला आणि आता अचानक हे पहिलं प्रेम परत आलंय आणि हे असं सफल होतंय...  आता प्रश्न असा आहे चैतन्य की हे प्रेम सफल करणं म्हणजे माझ्या विवाह बंधनाशी, माझ्या नवऱ्याशी, माझ्या कुटुंबाशी प्रतारणा आहे का? मी त्यांना फसवतीये का? असे संबंध मी ठेवायचेच का?"

काही क्षण चैतन्य विचारमग्न झाला.  नीट शांतपणे मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करून मग त्यानं बोलायला सुरवात केली.  "हे बघ प्रज्ञा नीती अनीती, धर्म अधर्म वगैरे असला तात्त्विक शब्द जंजाळ जरा बाजूला ठेवू आणि सरळ साध्या पद्धतीनं या प्रश्नाकडे बघू.  दोन गोष्टींचा स्वतंत्रपणे विचार करू.  पहिली गोष्ट म्हणजे तुझं हे प्रेम.  यात अनैसर्गिक, चूक असं काहीच नाही.  तुला तुझ्या तरुण वयात एक मित्र भेटला ज्याच्यावर तू मनापासून प्रेम केलंस, त्याच्याशी सुंदर मैत्री केलीस आणि अशी मैत्री वाढत वाढत जाऊन त्याची परिणिती एकमेकांकडे आकृष्ट होण्यात आणि अत्युच्च बिंदूला पोहोचण्यात निश्चितच गैर काही नाही.  हे पूर्णपणे निसर्ग नियमाला अनुसरूनच आहे.  आता दुसरा मुद्दा असा आहे आणि तो पहिल्याच्या थोडासा तिरक्या चालीत पण आहे, की मध्यंतरीच्या काळात तुझं दुसऱ्या कुणाशीतरी लग्न झालंय आणि त्या संसारातही तू स्वतःला संपूर्ण समर्पित केलंय आणि पूर्ण सुखीही झालीयेस.  पण म्हणून जे पहिलं प्रेम होतं किंवा ते ज्या पद्धतीनं पूर्णत्वाला गेलं यातही वावगं काहीच नाही. " चैतन्य गंभीरपणे बोलत होता.

"तू म्हणतोयस ते बरोबर आहे रे.  पण सामाजिक दृष्ट्या... "

"इथे समाजाचा प्रश्नच येत नाही.  हा तुझा प्रश्न आहे.  हा आपला प्रश्न आहे.  तुझा नवरा, तुझं कुटुंब, तुझा संसार यांचा मीही तितकाच आदर करतो. मी तुला असं कुठही म्हणत नाहीये की आता त्यांना सोडून तू माझ्याशी लग्न कर."

"हो... पण... "

"थांब जरा प्रज्ञा... मला बोलू दे... तुझं कुटुंब ही तुझी फर्स्ट प्रायॉरिटी आहेच आणि रहायलाच पाहिजे.  आणि ही प्रायॉरिटी सांभाळून प्रज्ञा आता आपल्या उर्वरित आयुष्यात आपण दोघे असे एक्सक्लुझिवली आणखी किती वेळा भेटू शकू?  मी पुण्यात, तू बंगलोरमध्ये, तुझी माझी वेगवेगळी व्यावसायिक सांसारिक बंधनं... कदाचित उद्या माझंही लग्न होईल... माझाही संसार असेल... कदाचित तुम्ही परदेशात स्थायिक व्हाल... काहीही होऊ शकतं.  या सगळ्या जंजाळातून, आपण आज जसे इकडे मस्त दोघेच जण येऊ शकलो... असं एक्सक्लुझिवली मला वाटतं आता उर्वरित आयुष्यात म्हणजे पुढच्या वीस-पंचवीस वर्षात आणखी जास्तीत जास्त एकदा किंवा फार तर फार दोनदा आपण असे भेटू शकू.  तेही नक्की नाहीच.  आणि मग या एक दोन वेळा आपण आपल्यातलं प्रेम असं व्यक्त केलं तर त्यात काय वावगं?  आपण एकमेकांवर प्रेम केलं म्हणून तुझ्या नवऱ्यावर करायला तुझ्याकडे प्रेम शिल्लक राहणार नाहीये का? तुझ्या मुलींवरची तुझी माया आटणार आहे का? तुझ्या कर्माधिष्ठित जबाबदाऱ्या तू टाळणार आहेस का?... नीट विचार कर प्रज्ञा... " चैतन्य फुटफुटून बोलत होता.  प्रज्ञा खोल विचारत बुडून गेली होती.

"नाही चैतन्य, अविवरचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही.  मुलींच्या बाबतीत तर प्रश्नच उदभवत नाही.  ते माझं सर्वस्व आहे.  आणि मी स्वतःहून ठरवून या संसारात पडल्ये आहे. त्यामुळे कर्माधिष्ठित जबाबदाऱ्यांमध्ये मी कधीच काहीच कमी पडू देणार नाही."

"ठीक आणि हे उत्तम.  मनात याबाबत कुठचाही संदेह नसेल तर आपल्या प्रेमाच्या क्वचित होणाऱ्या अशा उद्रेकाबद्दल आणि परिणितीबद्दल तू फार काळजी करू नयेस असंच मला वाटतं. " चैतन्य आश्वासक शब्दात बोलला. 

पाच दहा मिनिटं पुन्हा शांततेत गेली. प्रज्ञा गहन विचार करत होती "चैतन्य तुझ्या अशा बोलण्यांवरच मी निरुत्तर होते.. "मंद स्मित करत प्रज्ञा बोलली. " तू म्हणतोयस ते मला पटतंय रे.  पण कळतंय पण वळत नाही म्हणतात ना तशातली स्थिती आहे. "

"चल तुला एक सुंदर गाणं म्हणून दाखवतो. हे पण बंगाली आहे...रबिंद्रनाथांचं..." दोन एक मिनिटांच्या शांततेनंतर चैतन्य पुन्हा बोलला.  प्रज्ञा अजूनही विचारमग्नच होती. "पौर्णिमेच्या रात्री, आपल्या होऊ घातलेल्या नवऱ्याकडे जाऊ की आपल्या गतस्मृतींना, आपल्या प्रेमाला स्वतःला समर्पित करू या द्विधेत सापडलेल्या नायिकेचं हे गाणं आहे... "

"क्या बात है... " प्रज्ञानं पसंती दर्शवली. 

"ऋत्विक घटकच्या कोमल गंधार मधलं हे गाणं आहे. पदमा नदीच्या काठी पौर्णिमेच्या रात्री... "

"वाह.  म्हण की आणि कालच्या सारखा अर्थ पण सांग... खूप छान वाटतं" 

दोन मिनिटं शांततेत गेली आणि चैतन्यनं सुरवात केली

"आssज ज्योत्सना राते... शबई गेईच्छे... आssज... " चैतन्य तन्मयतेनं गात होता.  त्याचा आवाज छान होता आणि मध्ये मध्ये थांबून तो तिला अर्थही समजावून सांगत होता.  "आज ज्योत्स्ना राते... म्हणजे आज पौर्णिमेची रात्र आहे ... ज्योत्स्ना म्हणजे चंद्र...  आज पौर्णिमेची रात्र आहे आणि मी इथे या जंगलात एकटीच... आssज ज्योत्सना राते, बोशोंतेरी माताल शोमीराने आssज... "

आणि अचानक गाता गाता काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखा चैतन्य गायचा थांबला "कोमल गंधार... कोमल गंधार... प्रज्ञा कोमल गंधारची कथा तुला माहिती आहे? तू ऐकलीच पाहिजेस... "  प्रज्ञा अवाक होऊन चैतन्यकडे बघत राहिली.

"तू कोमल गंधार बघितलायस?  बंगाली...ऋत्विक घटकचा. "

"नाही पण ऐकलंय थोडसं त्याच्याबद्दल" प्रज्ञा.

"हा संपूर्ण सिनेमाच आणि याची कथा सेपरेशनवर आहे.  दोन प्रदेशांची फाळणी, दोन देशांची फाळणी, दोन संस्थांची फाळणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन व्यक्तिंची फाळणी..."

"ओह... " प्रज्ञा कान देऊन ऐकत होती.  

"कोमल गंधार या शब्दांचा अर्थ तुला माहितीच आहे.  या सिनेमाच्या इंग्रजी सब टायटल्समध्ये याचं भाषांतर दिलंय सॉफ्ट नोट ऑन अ शार्प स्केल.  शब्दशः हा अर्थ अगदी काही फार योग्य नाही पण कॉंटेक्स्ट मध्ये मात्र अगदी चपखल बसतो.  टागोरांच्याच एका कवितेवरून हे नाव घेतलंय... "

"हं... " 

"बंगालच्या फळणीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा उभा राहिलाय.  एकातून दोन विभक्त झालेले दोन स्वतंत्र प्रतिस्पर्धी थिएटर ग्रुप.  भृगू आणि अनुसूया हे दोन या दोन स्वतंत्र ग्रुपमधले मुख्य कलाकार.  यांचं एकमेकांवर प्रेम जडतं. अनुसूयाचं लग्न फ्रान्स मध्ये राहणाऱ्या एका विद्वान गृहस्थाबरोबर आधीच ठरलेलं असतं आणि मग उभं राहतं मानसिक द्वंद्व.  एकीकडे अनुसूयाचा भूतकाळ, तिच्या सुवर्ण स्मृती आणि भृगूचं प्रेम तर दुसरीकडे विद्वान श्रीमंती नवरा आणि फ्रान्समधलं वैभवी राहणीमान.  अनुसूयाचं मन या दोन परस्पर विरोधी घटकांमध्ये इकडून तिकडे फरफटलं जातं.  तुझ्यासारखंच तिच्याही मनात हे प्रचंड मोठं वादळ उभं राहतं... "

"ओहो.. " प्रज्ञा एकचित्तानं ऐकत होती.

"या सिनेमाचा विषय फाळणी किंवा सेपरेशन असला तरीही या कथेचा उद्देश्य अतिशय पॉझिटीव्ह आहे... पुनर्मिलनाचा आहे... आणि हे मीलन होण्याचा मार्ग म्हणजे प्रेम.  हा आतून येणारा आवाज... अतिशय कोमल...कोमल गंधारातला... अनुसूया तिच्या हृदयातून येणारी हीच कोमल, तरल, नाजूक हाक ऐकते... हा कोमल गंधार ऐकते... आणि स्वतःला स्वतःच्या प्रेमाला समर्पित करून टाकते.  हा आतला आवाज... ही हृदयाची हाक... हा कोमल गंधार...ही तरल भावना... हे प्रेम... हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन... हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रज्ञा... " चैतन्य भारावून जाऊन बोलत होता.  प्रज्ञानं डोळे मिटून घेतले होते. तिच्या चेहेऱ्यावर आत्मिक समाधान पसरलं होतं. 

बराच वेळ पूर्ण शांतता होती.  आकाश आता निरभ्र झालं होतं. चांदणं पून्हा एकदा टिपूर झालं होतं.  पौर्णिमेचा पूर्ण वाटोळा चंद्र आता चांगलाच वर आला होता. स्वच्छ चंद्रप्रकाशामुळे रात्रीच्या अंधारातही सारं काही स्पष्ट दिसत होतं.  अन चैतन्यनं पुन्हा एकदा गायला सुरुवात केली " आssज ज्योत्स्ना राते... शबई गेईच्छे..आssज... " प्रज्ञा मंत्रमुग्ध झाली होती.  तिनं हळुवारपणे आपल्या दोन्ही हातात चैतन्यचे हात घेऊन त्यांचं चुंबन घेतलं... चैतन्य पूर्ण तन्मयतेनं गात राहिला...

-समाप्त.