चंदा - फक्त एक शरीर

बाप आई न होते कुणी राहिले
लेक मामाकडे एकटी वाढली
आणि मामासही ना कुणी आपले
त्यामुळे त्यास भाचीच ती लाडली

नाव चंदा तिचे, वागणे गोडसे
ती वयाने असावी विशीची तशी
झोपडी सारवे, जेवणाचे बघे
ना अपेक्षा तिला दौलतीची तशी

पाटलाच्या घरी काम मामा करे
राबता राबता जीव गेला तरी
सांज होता घरी यायचा आपल्या
आणि चंदा चुलीशी करे भाकरी

एकदा ताप मामास आला जरा
तो म्हणे आज कामास तू जा मुली
रोजगारावरी आपली भाकरी
घाम गाळून पेटायच्या या चुली

आणि चंदा जशी पोचली त्यातिथे
पाटलाने तिला पाहिले, भाळला
कोण, तू कोठली, माहिती काढली
बोलताना तिचा देह न्याहाळला

रेशमी केस, गोरे तिचे अंग ते
चेहरा गोलसा, गंध पुष्पापरी
यौवनाची नशा रंध्ररंध्रातुनी
अंग अंगात जादू गुलाबापरी

लाजरी लोचने, ओठ संकोचले
अंगठा दाबुनी घेत मातीमधे
ओढणी राहिली ओसरीच्या तिथे
झाकती हात लज्जेस छातीमधे

ती उभारी तिची, ती जवानी तिची
धुंद तारुण्य ते कावरेबावरे
देह घाटातल्या गोल वळणांपरी
पाटलाला न आता नशा आवरे

ये म्हणाला तिला, काम काही नसे
झाडणे सर्व वाडा जरूरी नसे
फक्त माझीच खोली जरा झाड तू
आणि चंदास हेतूच ध्यानी नसे

घेत खोलीत चंदास पाटील तो
दार लावून जबरी करू लागला
उम्र पन्नास त्या राक्षसाची असे
कोवळ्या यौवनाला धरू लागला

एक तासात चंदा कितीदा तरी
भोग भोगून उद्ध्वस्त झाली असे
झोपडी गाठता कोसळे शेवटी
जाण मामासही सर्व आली असे

पाटलाच्या घरी जात मामा म्हणे
काय केलेत हे राक्षसासारखे?
पाप फेडा अता, लग्न लावा म्हणे
वागुनी दाखवा पाटलासारखे

ऐकुनी पाटलाने असा मारला
हाड मोडून मामा घरी येतसे
कर क्षमा बोलला आज चंदास तो
झोपडीतून अश्रू-नदी येतसे

जाणुनी सर्व ते, गाव बोलायचे
पाटलाच्या पुढे गप्प वागायचे
पाटलाच्यामुळे गर्भही राहिला
दुःख ऐकून हे शापही द्यायचे

लाज ना पाटलाला तरीही कधी
त्यातही तो तिला बोलवे सारखे
गप्प राही बिचारी नशीबापुढे
आणि भोगायची भोग ते सारखे

पोरगा जन्मला, ठेवले नावही
बारश्याला न कोणीच गावातले
काय जे भोगले, देत सोडून ते
लाड चंदा करे, बाळ आनंदले

तीन वर्षे पुरी जाहली, आजही
पाटलाला सुखे देत चंदा जगे
त्यामधे एकदा घोळ वाड्यातला
पोरगा पाटलाचा  स्वतःही बघे

बाप तैसाच तो, तेच तोही करी
आणि चंदा गुपीते न फोडायची
आळिपाळीमधे बापपोरापुढे
सजवुनी ती स्वतः पेशही व्हायची

अन्न देते धडे सर्व भोगायचे
वृद्ध मामा म्हणे राम आता तिचा
पोरग्याच्याचसाठी बिचारी जगे
त्याचसाठी गळे घाम आता तिचा

ती घरी येत स्वैपाक शिजवायची
पोरगा येत शाळेतुनी खायचा
फी असे द्यायची त्यास शाळेतली
काळज्या सर्व चंदास सांगायचा

पाटलाला तशी देत नैवेद्य ती
सर्व सोसायची, फी मुला द्यायची
वीस वर्षे कहाणीस झाली अता
वेळ झाली अता सूनही यायची

सून आली तशी पोरगा बोलला
माय संसार दोघांतला होउदे
तू इथे राहणे चांगले ना तसे
आज संसार हा वेगळा होउदे

काय धक्का बिचारीस लागे अता
सून बोले तुम्ही फार बदनाम हो
वेगळी एक जागा बघा वा तुम्ही
आजच्या आज बोला तरी राम हो

गाळली आसवे, काढले मागचे
'मी कसे सर्व केले' कथा वाचली
ऐकुनी राग आला मुलाला तिचे
लाथ पोटात जोरामधे घातली

तेवढ्याने कुठे थांबला पोरगा
आणखी मारले माउलीला किती
सून घाले शिव्या, ओरडे पोरगा
आवरावे तिने वेदनेला किती?

शेवटी पाटलाच्या घरी पोचली
ठेवता का मला याइथे बोलली
बोलला तो तिला हा न बाजार गे
मी घरंदाज, तू वेसवा कोठली

पोरगा पाटलाचा म्हणे हासुनी
तू स्वतःच्या घरी का न जातेस गे?
कामवालीच साधी, इथे येउनी
का अभद्रापरी दुःख गातेस गे?

आज चंदा भिकारी असे गावची
मारती पोरटी हासुनीया खडे
ती न माणूस, केवळ असे देह तो
भोगतो भोग, निर्जीव होता, पडे