लागले हृदयास तेव्हा थांबले नाही कुणी
चांगले आहेत सारे, आपले नाही कुणी
एक ठरला बाक दोघांचा समाजाच्यापुढे
भांडणे झाली हजारो, हालले नाही कुणी
मीच आधी पोचता वाळीत त्यांनी टाकले
काढली मी वाट त्यावर चालले नाही कुणी
वाहवा होणार आहे राख माझी पाहुनी
हे जसे सांगीतले मी, जाळले नाही कुणी
आपला आनंद आनंदात राहो एकटा
होउदे कल्याण, येथे चांगले नाही कुणी
आज ती आली समोरी, चौकशी झाली जरा
वेळही गेलीच होती, ताणले नाही कुणी
धुगधुगी आहे जराशी, लाकडे वाचाळली
चेहरे गंभीर सारे, हासले नाही कुणी
वेगळा मृत्यू कशाला जन्मल्यानंतर इथे?
जन्मले सारे इथे पण जाणले नाही कुणी
वेळ, किंकर्तव्यता, भीती स्वत:ची, पोकळी
का बरे भूषण तुला हे वाटले? 'नाही कुणी'!