तो असं काही बोलेल असं कोणालाचं वाटलं नव्हतं. प्रतिभाही एकदम चमकली. तिनं यश आणि अस्मिकडे पाहिलं, दोघांच्याही चेहऱ्यावर, "सुजयला असं बोलायचा अधिकार कोणी दिला?" अशाच स्वरूपाचे भाव होते. श्री मात्र शांत होता. आजुबाजूचे सगळेच दोन मिनिटं एकदम शांत झाले. तो ज्या पद्धतीनं बोलला ते मात्र कोणालाचं रुचलं नाही. प्रतिभाची आई, मंगलाबाई जेवण बाजूला ठेवून म्हणाल्या,
"हे बघ, इथे कोणी कोणाची जागा वगैरे घेत नाहीये. उतारवयात एकट्यानं राहणं कसं असतं ह्याचा अनुभव मला आहे आणि तुम्हाला नाही आणि तुम्हाला तो येवू नये अशीच देवाजवळ प्रार्थना आहे. पण प्रतिभा आणि श्री दोघांनीही आपल्या साथीदाराचं ‘जाणं’ म्हणजे काय ते अनुभवलेलं आहे, खूप सोसलेलं आहे. आता त्यांनी हा निर्णय घेतलाय तर माझा आणि श्रीच्या आईंचा त्यांना आशीर्वाद आहे. ज्यांचा ह्या लग्नाला पाठिंबा नाही त्यांनी आत्ता इथे नाही थांबलं तरी चालेल."
आईच्या ह्या स्पष्ट उत्तरामुळे प्रतिभाला हायसं वाटलं. सुजय आधीच जरा चिडलेलाच होता, मंगलाताईंचं बोलणं ऐकून तर तो निघूनच गेला. सुप्रियाला काय करावं, काय बोलावं ते सुचेना. "माफ करा हं" एवढंच बोलून तीही गेली. परत क्षणभर शांतता पसरली. तेवढ्यात आतल्या खोलीतून आर्या, श्रीची नात, त्याच्या मुलाची मुलगी, आली, "मी माझ्या नव्या आज्जीसाठी ना, एक ग्रीटींग केलय." असं म्हणून तिनं एक कागद प्रतिभाच्या हातात ठेवला. "आणि मी पण नव्या आजोबासाठी एक पोएम बनवलीय" असं म्हणून प्रतिभाच्या नातवाने, अस्मिच्या मुलाने तो कागद श्रीच्या हातात ठेवला आणि त्याच्या वयाप्रमाणे, समजुतीप्रमाणे नव्या आजोबासाठी बनवलेली ती कविता सगळ्यांना म्हणून दाखवली. दोन्ही चिमुरड्यांचं सगळ्यांना इतकं कौतुक वाटलं, त्यांच्या भेटकार्ड आणि कवितेपेक्षाही, आधी निर्माण झालेला तणाव ज्या निरागसतेनं आणि नकळतपणे त्यांनी संपवला होता, ते मोठ्यांपैकी कोणी काही बोलूनही कदाचित साधलं नसतं.
काही दिवसांनी श्री प्रतिभाचं लग्न झालं. दोघांच्याही मनात थोडंस दडपण होतच. पण हे नवीन नातं यशस्वी होईल अशी श्रीला खात्री होती. थोडे फार मतभेद, खटके उडाले तरी समजून घेऊ, असा प्रतिभालाही विश्वास होता.
दोघांचं पुन्हा नव्यानं सहजीवन सुरू झालं. दोघांचेही संसार अर्ध्यावरच एकटे पडले होते. पण आता दिवसभराची कामं संपवून घरी आल्यावर हवं नको विचारायला, एवढं कशाला, नुसत्या गप्पा मारायलाही हक्काचं आणि फक्त आपलं असं माणूस होतं. जसे दिवस जात होते तसा आपण घेतलेला निर्णय योग्यच होता अशी प्रतिभाची खात्री पटत होती. कधी कधी अभिची आणि श्रीची तुलना केली जायची तिच्या मनात. अभि आत्ता असता तर असं म्हणाला असता, असं केलं असतं, असे विचारही व्हायचे. मग पुढच्याच क्षणी आपण अशी तुलना करणं बरोबर नाही अशीही अपराधी भावना यायची मनात. खूप गोंधळ व्हायचा मनातल्या मनात....एकदा श्रीकडे ती ह्यासंबंधी बोलली.
"अगं, कशाला अपराधी वाटून घेतीयेस? अगदी स्वाभाविक नाहीये का हे? आपण आधीचं नव्हतं का ठरवलं की असं झालं तरी त्रागा आजिबात करायचा नाही म्हणून? आता माझ्यापाशी बोलून तरी मोकळं वाटतयं का जरा?"
तिलाही हे ऐकून बरं वाटलं. वर्षादीडवर्षांनी दोघांनी आपापले कामाचे व्याप कमी केले. संध्याकाळी चालणं, योगाचा क्लास हे तर चालू होतचं, त्याच्याबरोबरीने दोघांच्या आवडीच्या गोष्टी करायला, अगदी सहज म्हणून एकत्र बाहेर जायला वेळ मिळायला लागला. प्रतिभानं श्रीच्या आवडीचा मस्त स्वयंपाक करायचा, मग गाडीनं लांब चक्कर मारायला जायचं किंवा एखद्या नाटकाला जाउन यायचं, आणि मुख्य म्हणजे भरपूर गप्पा मारायच्या. लहानसहान गोष्टी एकमेकांना सांगायच्या... कित्येक वर्ष हरवलेला हा आनंद प्रतिभाला परत मिळत होता. अभिबरोबर असा वेळ फार कधी मिळायचाचं नाही म्हणून तर तिची तगमग व्हायची सारखी......श्रीचीही गेली काही वर्ष आधीच्या पत्नीच्या आजारपणाच्या ताणामध्येच गेली होती. त्यालाही एखादा शनिवार रविवार मस्त मजेत घालवून बरं वाटायचं. जास्त काळजी नाही, आपल्या साथीदारालाही कसलाही त्रास नाही, हे जाणवून हलकं हलकं वाटायचं.
एके दिवशी घरातच प्रतिभा पाय घसरून पडली आणि गुढग्याला लागलं. नेमका पावभाजीचा बेत केलेला होता आणि श्री पाव आणायला गेला होता. येवून बघितलं तर ही चेहरा टाकून पाय चोळत बसलेली.
"काय झालं ग?"
"अरे पडले ना आत्ता....आता काही भाजी बनत नाही माझ्याच्याने..."
"खायला तर आवडेल ना? माझ्याजवळ बस आणि सांग एकेक कसंकसं काय काय बनवायचं ते"
"अरे, आणि अस्मिचा फोन आला होता, ती सेमिनारमध्ये आहे आणि काल इकडे आली होती तेव्हा एक फाईल इकडेच विसरून गेलीय. सेमिनारमध्ये पेपर प्रेसेंट करतीय पण वेंधळेपणा काही गेला नाहीये अजून. आणि आता तिथून निघताही येणार नाही असं म्हणत होती. फाईल आणून देवू शकशील का म्हणून विचारत होती. आता कसली मी जावू शकतीय..."
"ठीके, मी जावून येतो पटकन. आल्यावर करूच मग भाजीवरचे प्रयोग"
पावभाजी पार पडली. त्या दिवशी श्रीनं खूपच काळजी घेतली प्रतिभाची. एकदम प्रतिभाला अभिचं वाक्य आठवलं, "बघ, मी नसलो तरीही तुझी आणि आपल्या मुलांची काळजी घेणारं कोणीतरी आहे !" ग्रीसमधल्या शॉपींगमॉलमधला तो प्रसंग प्रतिभाच्या डोळ्यासमोर आला. अभि असं कधी कधी काही काही बोलायचा ते खरंच होवून जायचं पण त्यावेळचं त्याचं ‘ते’ वाक्य अशा पद्धतीनं कधी खरं होईल असं प्रतिभाला स्वप्नातही वाटलं नव्हतं...
****
"आज्जी, शू लागली. मला दिवा लावून द्यायला चल ना....." आर्या झोपेतून डोळे चोळत उठली. रात्रीचे अडीच तीन वाजले होते. प्रतिभा आर्याबरोबर जावून आली आणि तिला झोपवून हॉलमध्ये आली. श्री पुस्तक वाचत बसला होता.
"काय गं? झोपली नाहीस तू अजून?"
"नाही रे, झोपच नाही लागली. सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या एकेक. तू पण चल ना आता. खूप उशीर झालाय. शिवाय उद्या सकाळी आर्याला टेकडीवर घेवून जावू सांगितलय ना आपण, सकाळी सकाळी उठून बसेल ती आणि नाही नेलं तर हिरमुसेल रे.."
"हो आलोच. हे पुस्तक फारच सुंदर आहे अगं, आता अगदी शेवटच आलाय. आलोच. नाहीतर तू पण तू पण बसतेस का इथे दोन मिनिटं माझ्याबरोबर? मग बरोबरच जावू झोपायला"
प्रतिभा तिथेच सोफ्यावर डोकं टेकून बसली.
"आज्जी, तुझा लाडका राजा कोण?" ह्या आर्याचा प्रश्न आठवला. खरंतर अशी तुलना करणंही जरा अवघडच होतं.
अभिच्या साथीनं प्रतिभानं आयुष्याची उभारणी केली. कॉलेजमधलं ते प्रेम, एकत्र जिंकलेल्या स्पर्धा, लग्नानंतरची नवी नवलाई, दोन मुलांचा जन्म, आर्किटेक्ट आणि इंटिरिअर डिझाईनर म्हणून एकत्र बहराला आलेलं करिअर, मानसन्मान, ऐश्वर्य हे सगळं अभिच्या साथीतच तर अनुभवलं....अचानक तो गेला आणि पुढंच सारी काही निरर्थक बनून जाईल की काय अशा वळणावर आयुष्य येवून थबकलं....मग ‘श्री’च्या सोबतीनं पुन्हा नवी सुरूवात केली. नवख्या माणसाबरोबर बारिकसारिक गोष्टी जमवून घेणं अवघड बनून जातं, असं खरंतर ते वय...पण त्या वयात प्रतिभानं संसाराचा दुसरा डाव मांडला..आणि तो निर्णयही योग्य ठरला..मुलं मार्गी लागली होती, कामाची दगदग कमी करायची होती, निवांतपणाची मजा अनुभवण्याच्या त्या काळात श्री सारख्या समजूतदार माणसाची सोबत मिळाली म्हणून सगळं काही सुखकर झालं..आयुष्य सावरलं.. प्रतिभा आणि श्री दोघांनी एकमेकांची मुलं आणि नातवंडं जणू आपलीच मानली. एकमेकांचे प्रश्न आपले मानले. नक्कीच सोपं नव्हतं ते...नवराबायकोत होतात तशी भांडणही झाली त्यांच्यात....पण समजूतदारपणा दोघांकडेही होता म्हणून हे सारं जमू शकलं....मतभेद, भांडणांच्या ह्या छोट्या छोट्या कारणांपेक्षा, आयुष्यात आपल्या माणसाचं आपल्या बरोबर असणं, हे जास्त महत्त्वाचं हे दोघांनाही पटलेलं होतं....एकमेकांचा आधार बनून गेले होते ते आणि आता तर श्रीशिवाय जगण्याची कल्पनाही अवघड होती प्रतिभासाठी..
अभि आणि श्री आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यांवर भेटलेले जोडीदार....परिस्थिती वेगळी, त्यांचे स्वभाव वेगळे..पण दोघांमुळे ‘जगणं’ खऱ्या अर्थानं एक ‘सुंदर अनुभव’ बनून गेलं....त्या दोघांतला आवडता राजा कोण ह्याचं उत्तर अशक्यच होतं.....
समाप्त