१६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत

द्वैताचं मूळ कारण बोध नसणं आहे पण रोजच्या जगण्यात त्याची तीन रुपं आहेत : अध्यात्मिक, शरिरीक आणि मानसिक.

अध्यात्मिक जगात आकार आणि निराकार यातला भेद हे प्रार्थमिक द्वैत आहे. या भेदामुळे साऱ्या जगात दोन प्रकारचे धर्म निर्माण झाले आहेत आणि त्यात संपूर्ण मानवता विभागली गेली आहे. इस्लाम हा एकमेव निराकावादी धर्म असून बाकी सर्व धर्म आकारवादी आहेत. या आकार आणि निराकारवाद्यात संपूर्ण परस्पर विरोध आहे. अध्यात्म काहीही न समजलेल्या लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी मानवतेत ही दुफळी कायम ठेवण्याचे काम जोमानी केले आहे. वास्तविक धार्मिक विभाजनाचं काहीही कारण नाही पण आकार आणि निराकार या द्वैतामुळे मानवता केंव्हातरी एक होईल ही शक्यता शून्य झाली आहे

आणखी पुढे जाऊन अध्यात्मात संसार (किंवा प्रकट जग) आणि सत्य (किंवा निराकार) हे परस्पर विरोधी मानले गेले आहेत, त्यामुळे सामान्य  माणूस नेहेमी अडचणीत आहे. अस्तित्वाची एकरूपता न कळलेल्या लोकांनी केलेली निरुपणं आणि निर्माण केलेलं साहित्य हे  या अध्यात्मिक द्वैताच्या गैरसमजांचा आधार आहेत. वास्तविक आकार आणि निराकार यात भेद नाही, आकार हे निराकाराचं प्रकट रूप आहे आणि निराकार हे आकाराचं विश्रामस्थल आहे.

अध्यात्मिक द्वैताचा आणखी एक कारण गुरु-शिष्य परंपरेत आहे. निराकाराचा बोध नसल्यानी प्रत्येक व्यक्ती ही स्वास्थ्याचा काही ना काही उपाय शोधत असतेच आणि तिला कुणीतरी अस्तित्वाची एकरुपता सांगायला हवी असते. पण गुरु-शिष्य परंपरेत खुद्द गुरुच या परंपरेतून आलेला असल्यामुळे त्याला त्याच्या गुरुची थोरवी सांगायला लागते आणि शिष्यही आपण आत्ता कुठे सुरुवात केलीयं असं समजतात त्यामुळे बोधासाठी 'वेळ' ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य असते. आता वस्तुस्थिती अशी आहे की गुरू आणि शिष्य यात वेळेचा फरक नसतो तर शिष्याच्या गैरसमजामुळे (की आपण फक्त आकार आहोत) केवळ भासमान फरक असतो. स्वतःलाच कल्पना नसल्यामुळे गुरू शिष्याला ही वस्तुस्थिती सांगू शकत नाही आणि जोपर्यंत गुरू आहे तोपर्यंत शिष्य केवळ केंव्हातरी बोध होईल (आणि आपण गुरू होऊ) अशी वाट पाहत रहातो. अनुग्रहामुळे शिष्याला गुरू बदलताही येत नाही आणि त्याचा पेचही सुटत नाही, अशा प्रकारे शिष्य नेहेमी दुय्यम राहतो आणि गुरु-शिष्य हे श्रेणी द्वैत कायम रहाते.

अध्यात्मिक द्वैतात आणखी मोठा वाटा अध्यात्म म्हणजे फार अनाकलनीय आणि गूढ आहे अशा सर्वमान्य गैरसमजाचा आहे. त्यात अध्यात्मिक अनुभवांचा (कुंडलिनी, पुनर्जन्म, अमक्याला तमका दिसला, तमक्याला प्रकाश दिसला, फलाण्याला पारलौकिक सुगंध आला वगैरे) फार बोलबाला आहे. वास्तविक व्यक्तीगत अनुभवांच्या अधारावर अस्तित्वाची एकरुपता अवलंबून नसून अस्तित्व एक आहे हाच अनुभव आहे आणि तुम्हाला तो नसला तरी आत्ता या क्षणी तुम्ही अस्तित्वाशी एकरुप आहात.

आता यात आणखी एक मजा आहे, मी तुम्हाला अध्यात्म सोपं आहे आणि तुम्हाला ही ते सहज समजू शकतं असं पहिल्या लेखाच्या पहिल्या वाक्यापासून सांगितलं तरी तुमच्या पैकी कुणीही ते सहजासहजी मान्य करणार नाही तर उलट मलाच कसं समजलं नाही हे होता होईल तो दाखवून कुणाला उलगडा होत असेल तर त्याला देखील सगळं किती अवघड आहे हे पटवून द्याल. अध्यात्म अवघड नाही पण तुम्ही स्वतःलाच नाकारायला लागलात तर तुम्हाला तुमच्या अस्तित्वगत एकरुपतेचा बोध कसा होईल? 

यात आणखी एक खुमारी आणता येते, मी फार मोठा आहे, माझं पूर्वजन्मीचं सुकृत आहे आणि तुमची तेवढी तयारी नाही असा पवित्रा घेऊन  (मी तसं अजिबात म्हणत नसताना), पुन्हा द्वैत कायम ठेवता येते! किंवा अमका किती मोठा होता, तमका कसा थोर होता, हा ग्रंथ काय सांगतो, ते उपनिषद काय सांगतं असं वेगळंच वळण घेऊन आणि विषय भलतीकडे नेऊन पुन्हा आत्मस्मरणाची संधी घालवता येते.  

शारिरीक द्वैत हे स्वतःला केवळ देह समजण्यामुळे निर्माण होते. या विषयी मी 'स्त्री आणि पुरुष' या लेखात सगळं लिहीलं आहे. वास्तविक स्त्री देह आणि पुरुष देह या निसर्गनिर्मीत वस्तुस्थितीचा उपयोग आनंदी सहजीवन, सहज-सुलभ कार्यविभागणी, जगणं शेवटपर्यंत सोपं व्हावं अशी कुटुंब व्यवस्था आणि पर्यायानी स्वस्थ समाज असा करता येतो. पण स्त्री विरुद्ध पुरुष असे द्वंद्व उभे राहिल्यामुळे यथावकाश कुटुंब व्यवस्था संपणे, अनौरस मुलांचे प्रश्न आणि पर्यायानी दुर्धर जीवन अशी (पाश्चिमात्य देशांसारखी) वाटचाल सुरू होते. आपण देह आणि विदेह दोन्ही एकाच वेळी आहोत या बोधानी हे द्वैत संपूर्णपणे निरर्थक होऊ शकते.

मानसिक द्वैताचा सर्व आधार भाषा आहे. संवादासाठी माणसाला भाषा अनिवार्य आहे पण एकदा शब्द उच्चारला की बोलणाऱ्याचे आणि एकणाऱ्याचे लक्ष शब्दाकडे वेधले जाते आणि एकरुपतेचे (किंवा शांततेचे) विस्मरण होते. शांतता नेहेमी अविच्छिन्न आहे पण शब्दामुळे (किंवा ध्वनीमुळे) ती भंगल्याचा भास होतो.

यात आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कोणतीही जाणिव झाली की काही कळायच्या आत मन तीचे शब्दात रुपांतर करते, शब्द स्मृतीजन्य असल्यामुळे लागोलाग स्मृती सक्रिय होते आणि व्यक्तीमत्व अनेक स्मृतींचा एकत्रीत परिणाम असल्याने ते ही सक्रिय होते आणि निराकाराला (किंवा तुम्हाला) आपण व्यक्ती आहोत असं वाटायला लागतं. एकदा आपण व्यक्ती झालो की मग आकारातली अनेकता अस्तित्वगत एकरुपता झाकोळून टाकते.

शांततेचे भान ठेवून बोलणे, शांततेचे भान ठेवून एकणे आणि स्मृतीचा वापर करताना व्यक्तीमत्व सक्रिय न होऊ देणे हा या द्वैतातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे.

संजय