'डुक्करा..'

माझ्या मित्रा, किती वर्षे लोटली, तुझी हाक ऐकली नाही.
काट्यावरच्या गंभीर चर्चांमध्ये माझे विचार ऐकून किती वेळा,
तू मला कळवळून, 'डुक्करा..' असे म्हटले असशील...
आणि कधी लाडाने, आणि जिव्हाळ्याने ही...

तू मला 'डुक्करा' असे हाकारावेस आणि मी ओ द्यावी..
खरे पाहता त्या शब्दाचा लौकिक अर्थ कधीच गळून पडला आहे.
आता तो शब्द बनला आहे आपल्या मैत्रीचा, माझ्यावरील तुझ्या अनुरागाचा..
एक सांकेतिक उच्चार....

वर्षांनुवर्षे चालू असलेल्या स्वप्न मालिकेला काळाच्या ओघात,
मिळालेले घाट.. त्यामधून धावणारे...आणि..
गूढनिळ्या अबोध जाणीवेमध्ये लडबडल्याने आकार हरवलेले..
चिद्घन ऊर्मींतून उमटत आहेत असे भासणारे हुंकार...

युगायुगाचे सांस्कृतिक ओझे वागवीत,
स्वतःची ओळख हरवलेले शब्द,
आणि त्यांतून निर्माण झालेले समज..यांची भीड न बाळगता..
तू मारलेली हाक...

माझ्या मित्रा, तीच हाक तू आजही मारशील का ?
हजारो वर्षांचा शब्दांचा प्रवास आणि त्यांचे आजचे आयाम,
तू झुगारशील का ?
माझे कान आसुसले आहेत.. ऐकायला तू केलेले बंड..
शब्दांचाच वापर करून शब्दांविरुद्धचे.

तू साद घालशील तेंव्हा चार लोक आश्चर्याने पाहतील,
काही कुत्सित हसतील, काही आपल्यालाच मारलेली हाक तर नाही ?,
असे वाटून तोंड लपवून भरभर निघूनही जातील, पण..
क्षितिजांच्या रेषा कापत तुझी हाक माझ्यापर्यंत येईल.
आकाशात मुक्त भ्रमण करणाऱ्या मला पुन्हा कान फुटतील ,
आणि तो सांकेतिक शब्द सांगेल मला परतीचे ठिकाण. 

तुझाच,
--लिखाळ