माणूस नावाचा बेटा-२

स्वतः शाळेत असता इंजिनियर होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा दत्तू, कुणा गणागणपाची पोरे, शालिनी मानेचे वितळत असलेल्या हिऱ्याप्रमाणे डोळे, बर्मिंगहॅमचे कारखाने, भिंतीवर मध्येच चुकचुकणारी पाल, आणि वर्गात मागून घेतलेल्या भूगोलाच्या पुस्तकातील मोराचे पीस - या साऱ्यात काय दुवा आहे कुणास ठाऊक, पण त्या चार भिंतींच्या बादलीत त्यांचा एक ढिगारा जमला होता खरा. ती समोरची अशक्त, फिकट ( आणि हातावर केस किती!) आणि मांजरपाटी चेहऱ्याची, इयररिंग्ज सतत हालवणारी शांता दीक्षीत. अक्षर अतिशय घाणेरडे व तिला इंग्रजी विषयात कधी चारपाचापेक्षा जास्त मार्क पडले नाहीत. पण सिनेमांतील गाणी ओल्या वेलीसारख्या आवाजाने ती म्हणायची. तिच्याकडे पाहताच दत्तू अस्वस्थ झाला फार. त्याच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. तिची थोरली बहीण सुलभा पाचसहा वर्षंपूर्वी त्याच शाळेतून मॅट्रीक झाली. रिझल्टनंतर तिने एका रंगीबेरंगी रुमालातून पेढे आणून सर्वांना वाटले. पेढे दत्तूला सर्वात शेवटी, पण त्या हातरुमालासह. लालभडक, उडत्या पदराचे पातळ नेसून तिने आत डौलदार पाऊल टाकले की सारी शाळा जागी होत असे, तिच्यासारखीच रंगीत वाटे. दोन महिन्यांपूर्वी त्या सुलभेने आत्महत्या केली. का कुणास ठाऊक. लोक नाना गोष्टी सांगत. जीवनाचा थेंब न थेंब उचलण्याच्या उत्साहाने भरलेल्या त्या रसरशीत मुलीने तेच जीवन का फेकून दिले असेल? अगदी शेवटच्या क्षणी तिच्या मनात कोणत्या भावनांचा वणवा पेटला असेल? तिचे राहू दे, सध्या दोन्ही तळव्यांवर हनुवटी ठेवून व्यग्र स्वप्नाळू बसलेल्या या शांताच्या मनात तरी का क्षणी काय चालले आहे? इतर पोरांच्या मनात? कुणास ठाऊक. सारेच जण आपल्या मनाच्या कोठडीतील कैदी. वरवर ती पोरे बर्मिंगहॅमचे नाव ऐकतात, आपण ते नाव बडबडतो आणि चुकचुकणारी पाल ऐकत मनात एकटेच भटकत राहतो... सुमन मुजुमदारच्या केसात निशिगंधाची वेणी आहे. कित्येकदा मधूनच मंद गंध येतो. कितीतरी वर्षांपूर्वी दत्तू कॉलेजमध्ये शिकवीत असता रेखानेदेखील त्याला संक्रांतीला हलवा व मूठभर निशिगंधाचीच फुले दिली होती, व हळूच खालच्या मानेने विचारले होते, "मी तुमच्या आयुष्यात येऊ शकेन का?" दत्तूने कॉलेजमध्ये एक वर्ष तत्त्वज्ञान शिकवले होते. नंतर बहीण आजारी म्हणून तो परत आला- व राहिला. प्लेटोच्या चिरंतन 'वर्ल्ड ऑफ आयडियाज' शी त्याचा परिचय होता. त्याने क्रोचे, कांट, रसेल यांचे ग्रंथ वाचले होते. आयुष्याच्या जिन्यावर रेखेची निशीगंधी पावले ऐकली होती. शेवटी ते सारे ओघळून गेले आणि आले काय वाट्याला? तर ही घामट पोरे, बर्मिंगहॅम, चुकचुकणारी पाल, जत्रेत तात्पुरत्या थाटलेल्या दुकानाप्रमाणे चारचौघांसारखा सरळ, सफळ संसार.
अद्यापही घंटा झाली नाही म्हणताच दत्तू उगाचच चिडला. समोरील पोरांकडे पाहून संताप आला.त्या प्रत्येकाचा हातावर, आपला हात दुखेपर्यंत ओलसर वेताने छड्या माराव्यात, असे त्याला वाटले! सारी एकजात इब्लीस डँबीस कार्टी! ते कोपऱ्यातील गोबरेल्या चेहऱ्याचे  कार्टे- दिवेकर! कुठलीही मिरवणूक, फंड, संप असो, आगाऊपणा करीत उगाच धडपडत असे; ज्याचे शुद्धलेखनही त्याला बापजन्मी जमणार नाही, अशा घोषणा बोंबलत हिंडत असे. ही कारटी पुढे मोठी होणार, आपल्याच सारखी पोरे जगावर सोडणार, मग त्यांना दरडोई एक मत मिळणार, आणि त्या आधारावर हा जनताजनार्दन 'आम्हाला समजेल असं वाङमय द्या हो! आम्हाला कळेल असं संगीत द्या हो!' असे ओरडत हिंडणार. हरामखोर लेकाचे. त्यापैकी बहुतेकांना चेहऱ्यावरील काळ्या टिकल्यांप्रमाणे नखाने टचाटचा चिरडून टाकले पाहिजे.
अखेर एकदाची घंटा झाली. दत्तूला शाळेचे सुतक संपल्यासारखे वाटले व जरा बरे वाटले.आणखी एक सही रजिस्टरवर पडली, आणि एक दिवस निकालात निघाला. तसे पाहिले तर आजचा दिवस खराबच गेला. कोणत्याच पोराने फी आणून दिली नाही, त्यामुळे खिशात द्रव्य नाही. आज दहावीच्या वर्गाला मराठीच्या तासाला बालकवींची 'औदुंबर' कविता शिकवायची होती, व दत्तूने त्यासाठी सकाळपासून तयारी केली होती. जुन्या आवडत्या कविता पुन्हा वाचून काढल्या होत्या.एकच धडकी, एकच अंतिम बोल त्याने पुन्हा ऐकला. शून्य मनाच्या घुमटात पारवा घुमला. जीवाला दुखवून मायेचा हिरवा रावा दूर उडाला. खाली पाण्याचा डोह आहे. त्यावर तलम नाजूक वस्त्र पसरल्याप्रमाणे गोड काळिमा आहे.इथवर चित्र कसे छान आहे. खडी काढलेल्या नायलॉनप्रमाणे. पण नंतर अंग थरारते.फुले तुडवीत तुडवीत भान न रहाता खूप पुढे जावे, व वळताच विशाल शिखरांच्या पार्श्वभूमीवर शुभ्र दाढीचा भव्य योगी तपश्चर्येत मग्न असलेला दिसावा, त्याप्रमाणे मन दबते, पावले थांबतात, व मनावर झर्रदिशी काटा चमकून जातो.त्या डोहात, पालथ्या  घातलेल्या आभाळाखाली पाय सोडून औदुंबर बसला आहे! भव्य, गंभीर, विचारमग्न! आजूबाजूला पाखरे, कीटक उडतात,-मरतात. ऐलपैल तटावरील हिरवळी खाऊन पोसलेली गुरे, मेंढ्या चार घरांच्या गावात कापली जातात. पण हे सारे स्वीकारून, पचवून औदुंबर मग्न बसला आहे.महाबोधी वृक्षालाच बुद्धाचे ज्ञान झाल्याप्रमाणे तो शांत आहे... हे सारे सांगत असताना राम सुंठणकर, शामा रेगे, नानू जाधव यांना तरी ते आवडेल, फार आवडेल. खरे म्हणजे साऱ्या वर्गात शिकवण्याजोग्या याच तीन व्यक्ती. बाकी सारे काढेचिराईत...फक्त देशाचे आधारस्तंभ. कोणत्याही सत्त्याग्रहाचे फुकटे वैरण. एकदम भारताचे वैभव व शिल्पकार. गाव, प्रांत वगैरे चिल्लर गोष्टी खिजगणतीत नाहीत. त्यांचा सारा हिशेब देशाच्या मापावर!मोठी ऐपतदार कार्टी. फक्त आज ती काखा खाजवतात. बिनाका गीतमाला निष्ठेने ऐकतात. आणि परीक्षेत दादाभाई नौरोजी ही महात्मा गांधींची पत्नी म्हणून लिहीतात इतकेच.
पण हे सारे राहूनच गेले पूर्वी कलाल की दलाल असलेला, पंधरा लाखाची मालमत्ता करून त्यागी जीवन काढणारा एक महान पुढारी मेला. दत्तूला तर तो अद्याप जिवंत होता हेच माहीत नव्हते. मराठीचा तास गेला, त्या तासाला हेडमास्तरांनी दुखवट्याची सभा घेतली. जगातल्या साऱ्या सद्गुणांच्या पाकळ्या उधळल्या गेल्यानंतर दोन मिनिट स्तब्ध राहून सगळ्यांनी आपल्या दाटून आलेल्या भावना दाखवाव्यात असे ठरले.दोन मिनिटे निव्वळ गप्प उभे रहाणेही किती कठीण आहे याची दत्तूला कल्पना आली. त्याची सारखी चुळबुळ सुरु झाली. त्याने अस्वस्थपणे आजूबाजूला पाहिले. सगळ्याच चेहऱ्यांवर ती अस्वस्थता होती. त्याचा हात हळूच सिगारेटच्या खिशाकडे गेला, त्याला गरम चहाची आठवण झाली, उकाडा वाटू लागला. पण मध्ये खाली मान घालून उभ्या असलेल्या हेडमास्तरात काहीच हालचाल दिसेना. असाच थोडा वेळ गेला तर खुद्द त्यांचीच दुखवट्याची सभा घ्यावी लागणार अशी त्याला भीती वाटली.पण असे काही घडले नाही. प्रथम त्यांच्या वहाणा हलल्या. तेथून सजीवता पसरत वर चेहऱ्यावर आली व त्यांनी मान हलवली. सगळे एकदम बाहेर आले. तेथे तंबाखू चघळत निरुपद्रवी बसलेल्या गड्याला त्यांनी गरम गरम चहाची ऑर्डर देऊन पिटाळले.
अशा रीतीने शब्दांनी सजवून ठेवलेल्या तासाचा खुर्दा झाला. त्यानंतर आठवड्याच्या परीक्षेचे पेपर वेळेवर दिले नाहीत म्हणून खुळ्या कोंबडीचा चेहरा असलेला सुपरवायझर इंगळे उगाचच गुरगुरला. आपला चेहरा जणू उकिरडा आहे व तो त्यावर टचाटचा टोच मारत आहे अशा तऱ्हेची दहा मिनिटे तो बोलत होता. अरे जा रे जा भुक्कडबालाजी! साधा थर्डक्लास बी.ए. आणि तोही इकॉनॉमिक्ससारख्या किराणाभुसारी विषयाचा! सासरा गव्हर्निंग बॉडीवर आहे म्हणून नोकरी तर मिळाली, आणि ऐट काय आणतो तर सी ड़ी. देशमुखांची! उद्याच्या उद्या तुझे पेपर आणून तुझ्या बोडक्यात असे आदळतो की दातच खुळखुळले पाहिजेत. वास्तविक दत्तूने आपल्या धाकट्या भावाला ते तपासून ठेवायला कालच सांगितले होते. पण तो गेला मॅटिनीला आणि त्याच्या या बेजबाबदार वागणुकीने सुपरवायझर आपल्यावर तुटून पडला.
"ह्य: ह्य:," लाचार हसून दत्तू म्हणाला."हो हो, उद्या नक्की आणून देतो. बरं काही चहा घेता? हो, विचारायला विसरलो. तुमचा खोकला कसा आहे? ही हवा असली चमत्कारिक हो."
पण काही का होईना, असे आचके खात दिवस तरी संपला. दत्तू कॉमन रूममध्ये आला. त्याने पुस्तके, डस्टर वगैरे कपाटात फेकून दिले, व समाधानाने खिशातून चार मिनार सिगारेट काढली. दत्तूने सुरुवात केली होती ती काकांच्या खिशातून पिवळा हत्ती घेऊन. पण एकदा चार मिनार घेतल्यावर तिच्यातील कैफ दुसऱ्या कशातच येणार नाही. राग, निराशा, विषण्णता या कोणत्याही वेळी चालणारी एकच सिगारेट म्हणजे बस्स, चार मिनार! चांगले जेवण झाल्यावर (जेवण म्हणजे अर्थात कोंबडीचे. नाही तर बाकीचे जेवण काय, आहे आपले यज्ञकर्म!) फ्लेअर्सला एक उत्कट भावोत्कट गंध असतो. मन स्वप्नाळू होते. पण सुपरवायझर उगाचच मिशा फरफरू लागला ही जेहत्ते त्याचे तेथे काम नाही. तेथे चार मिनारच पाहिजे. एखाद्या वडारणीच्या आडदांड आलिंगनाप्रमाणे रासवट उग्र दर्पाने सारे मन ब्रश मारल्याप्रमाणे होते. साऱ्या विषयांवर निगरगट्टपणे वापरता येणारी चार मिनार हे सिगारेटमधील सुनीत आहे!
पण कुठे तीनचार झुरके घेतो न घेतो तोच तो तो अगदी पाण्यात घातलेल्या देशी कापडाप्रमाणे आकसला. एकंदरीत आजचा सारा दिवसच असा जायचा होता. कारण शाळेचे तीन लाइफमेंबर एका मागोमाग आत आले. कुठल्याही विषयावर रीतसर मीटींग घ्यायची त्यांची तयारी असे. पुस्तकांच्या कपाटातील झुरळे मारावीत की नाही यावर त्यांची मीटींग दोन तास चाले. घुत्त चेहऱ्याचा, आताच केस पांढरे झालेला मदलूर तर शाळेल्या झालेल्या गुल्मासारखा होता. त्याला काहीही आवडीनिवडी नाहीत, खाजगी जीवन नाही. सदोदित तो छपराचे कौले मोजीत शाळेत पडलेला असतो, व इतरांनीही आपल्यासारखेच वागावे अशी त्याची अपेक्षा असते. त्यानंतर सी. राजगोपालाचारी व टकल्या मानेचे गिधाड यांच्या संयोगातून निर्माण झाल्याप्रमाणे दिसणारा कट्टी मास्तर , व काळा कुळकुळीत, ज्याला पोरे शाळीग्राम म्हणत, ते सोलापुरे गुरुजी (मास्तरबिस्तर सारे बाटगे. एकदम गुरुजी. दोन रुपयाला घरी येऊन सारे विषय शिकवणारा गुरुजी!) ही सारी मंडळी इतक्या गंभीरपणे आत आली की एखाद्याला वाटावे की ते खांद्यावरील प्रेत बाहेर ठेऊन आत काही तरी न्यायला आले आहेत. सदा गंभीर, जबाबदारीच्या ओझ्याने वाकलेली ही मंडळी, त्यांचे कपडेदेखील तसेच जळके, सुरकुतलेले! जणू आपल्या संस्कृतीत नीटनेटकेपणा कुठे बसतच नाही, कोणत्याही कार्याची सुरुवात करायची ती स्वच्छ चेहऱ्यांनी, कपड्यांनी नाहीच. मग सिनेमा नटी व थोर कार्यकर्ता यात फरक तो काय? आपल्या कपड्यांनी लोकांच्या पोटात ढवळून आले पाहिजे, वाढलेली दाढी दुसऱ्याच्या नाकाकानात शिरली पाहिजे, तर ते खरे समाजकार्य!  
आज मीटींग आहे, तिला आपण हजर रहायला पाहिजे हे आत्ता कुठे दत्तूच्या ध्यानात संध्याकाळी आले. कुठे तरी दीडदोन तास निवांतपणे घालवण्याचे त्याचे स्वप्न जागच्या जागी ठार झाले. काहीतरी निमित्त शोधण्यासाठी त्याने मेंदूला पराण्या टोचायला सुरुवात केली. आपली मावसबहीण मेलने पुण्याला जाणार आहे... पण ही सबब फार वेळा वापरली गेली होती. त्याच्या सांगण्याप्रमाणे दर खेपेस एक मावसबहीण पुण्याला गेली असती तर एव्हाना पुण्याची निम्मी वस्ती त्यांचीच झाली असती. आता फ्लूही संपला शेवटी त्याने आपल्या सासूबाईंचे डोळे तपासून आणण्याचे ठरवले.
"बरं का जोशी," किंचित खाकरत मदलूर म्हणाले. पण इतरांना विचारल्याशिवाय ते स्वतः कोणताच निर्णय घेत नसत. त्यानी कट्टींकडे पाहिले. कट्टींनी सोलापुरेंकडे पहाताच त्यांनी होकारार्थी मान हलवली. मग कट्टींनी मदलूरांचा कटाक्ष डॉज बॉलप्रमाणे परत केला, व मदलूरांना आत्मविश्वास आला.
"बरं का जोशी, गॅदरिंगसाठी आम्ही मीटींग बोलावली होती, पण काही कारणामुळे ती पुढे ढकलली आहे..."
एक अवघड कार्य तडीस नेल्याचे समाधान त्या तिघांच्याही चेहऱ्यावर होते. त्यांचा चेहरा जर इतका ओल्या मडक्यासारखा नसता तर दत्तूने त्यांना कुरवाळायला देखील कमी केले नसते. लललल करत त्याने त्यांच्याबरोबर वॉल्झची एक गिरकीदेखील घेतली असती.


(अपूर्ण)