मजेशीर पाहुणचार आणि जाळीदार डोसा

प्रोजेक्ट निमीताने अमेरीकेत पिटसबर्ग मधे सहकुटुंब पोचलो. पहील्याच आठवड्यात एका मराठी कुटुंबाशी ओळख झाली. आग्रहाचे निमंत्रण स्विकारून चहापानास गेलो.

पहील्याच १० मिनीटात कुठला व्हिसा, किती दिवस रहाणार याची चौकशी...त्यात मी पुण्याचा आहे असे कळल्या बरोबर "पुणेकर म्हणजे तुम्हाला सांगतो" असे म्हणत लोकांचे ऐकीव किस्से उगाच ऐकावे लागतात. पगार वगैरे पण विचारून झाला. (जसे बायकांना वय विचारु नये तसेच पुरुषांना पगार विचारु नये अशी नवी म्हण असावी का ?)  मग त्यांच्या बद्दल सांगून स्वतःची कंपनी कशी टुकार आहे हे पुराण ही ऐकून झाले.

सरतेशेवटी मी न राहवून त्याला माझी ओळख दिली. त्याच्याच कंपनीत मी त्याचा साहेब म्हणून कामावर हजर झालोय हे कळल्यावर मात्र चित्र बदलले.

स्वयंपाक घरातून चक्क "बरे झाले तुम्ही अगदी वेळेवर आलात, आजच डोसे भिजवले आहेत, पटकन होतील". काही मिनीटातच बशीतून "जाळीचा बनीयन फ़ाडून "वाढल्यासारखे डोसे हातात ठेवण्यात आले. आजही जाळीचा बनीयन चे डोसे अशी आठवण आली की मनमुराद हसू येते.

बाकी पुणेकरांबद्दल मात्र लोकांना विशेष चर्चा करायला आवडते.

विनम्र