ऐल सुखावे, पैल खुणावे...

ऐल सुखावे, पैल खुणावे...

(सदर लेखन ईसकाळ या संकेतस्थळावरुन उतरवलेले आहे)

आपण जिथं आहोत तिथंच असायला हवं होतं,
की जिथून आलो तिथं परत जायला हवं...

तसं मिंग्लिश येत नाही, पण तुम्ही हा महत्त्वाचा विषय मांडलात आणि म्हणूनच, मी पहिल्यांदा माझे मत लिहीतो आहे.
अमेरिकेत येऊन दोन वर्ष होत आली, त्यामानाने मी अजून कच्चा खिलाडीच आहे पण हळूहळू इथे स्थायिक होण्याचा विचार करत आहे. मनात भारताबद्दल खूप ओढ आहे, पण व्यवहार जेव्हा भावनांवर मात करतो, तेव्हा अमेरिका सोडवत नाही.
आता चोवीस वर्षांचा आहे. बौद्धिक कुवत असतानाही मला भारतात शिकण्यासाठी खूप कष्ट करावे लागले कारण मी श्रीमंत नव्हतो किंवा जातीने आरक्षित नव्हतो. त्यामुळे मला प्रत्येक वेळी तडजोड करावी लागली. माझ्या पुढच्या पिढीने अशा बुरसटलेल्या समाजात पहिला श्‍वासघ्यावा अशी इच्छा होत नाही. अमेरिकेत कोणाची आर्थिककुवत किती आहे किंवा तो कोणत्या जातीचा आहे, किंवा तोकोणा बड्या हस्तीचा मुलगा आहे हे न बघता तुमची बौद्धिककुवत आणि दुर्दम्य महत्त्वाकांक्षा यावर प्रगती होते. प्रत्येक ठिकाणी व्यवहाराच्या कागदपत्रांवर हे नमूद केलेले असते की हा व्यवहार जाती, वर्ण, आर्थिक परिस्थिती, लिंग, यापैकी कोणत्याही निकषांवर नसून समान नागरी हक्कांन्वये होत आहे. जेव्हा मी असे ऍग्रीमेंट वाचतो तेव्हा मला अमेरिकन नागरिक नसल्याचे दुःख होते. भारतात समान नागरी कायदा माझ्या हयातीत तरी होईल याची शाश्‍वती नाही.
अमेरिकेत मी अजून एक महत्त्वाची गोष्ट पाहिली ती ही की प्रत्येक जण, ज्या गोष्टींवर मानवाचे नियंत्रण असू शकत नाही अशा गोष्टींबाबत अतिशय आदर ठेवतो. उदाहरणार्थ निसर्ग, वेळ, वयोवृद्ध व्यक्ती आणि लहान मुले. भारतात या गोष्टींचे हसे होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून रोज तुम्ही याचा अनुभव घ्याल.
    बऱ्याच गोष्टी मिस करतो. पावसात चिंब भिजत खाल्लेली भजी, वडापाव विथ कट चहा, गणपती विसर्जनाच्या दिवशी बेधुंद होऊन केलेला नाच आणि रस्त्याच्या गाड्यावर खाल्लेली भेळ आणि पाणीपुरी. आजारी असताना डोक्‍यावर फिरणारा आईचा प्रेमाचा हात. जेव्हा हे आठवते, तेव्हा सगळी सुखे सोडून घरी जावेसे वाटते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना सोन्याची लंका नाही आवडली तेव्हा तुमच्या आमच्यासारख्यांची काय कथा. आता चिंता आहे ती फक्त नवीन पिढीची, ती पिढी हा जातीयवाद, गलिच्छ राजकारण आणि तडजोड करण्याची वृत्ती शिकेल की नाही किंवा या सगळ्याचा उद्रेक होऊन एक मोठी क्रांती होईल आणि नवीन, उज्ज्वल भारत उदयाला येईल.

- ओंकार बक्षी