पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २

"तपस्वी, ज्ञानी आणि कर्मी यांहूनही माझ्या मते योगी श्रेष्ठ असतो. म्हणून हे अर्जुना तू योगी हो." असे भगवान कृष्णानेच गीतेत सांगून ठेवलेले असल्याने योगशिक्षण किती महत्वाचे आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही.

तपस्विभ्यो अधिको योगी, ज्ञानिभ्यो अपि मतो अधिक |
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन || गीता ६.४१

मात्र ह्याबाबतीत माझी भावना अशी आहे की:

समर्थ गुरू योगसूत्रे, मार्गदर्शक ती खरी ।
सूत्रेच प्रश्न देतील, तीच देतील उत्तरे ॥

तरीही खालील दोन भाष्यांच्या आधारे मी माझे आकलन मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते सशक्त होईल.

दुवा क्र. १

१. भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर,आदित्य प्रतिष्ठान प्रकाशन, दूरध्वनी: २५४४५१७१, विरोप पत्ता: aparna.shankar05.gmail.com, संकेतस्थळः दुवा क्र. २, प्रथमावृत्तीः १८-०२-२००४, प्रस्तुत तृतियावृत्ती: १४-०१-२००७, देणगी मूल्य केवळ रु.५००/-.

२. पातंजल योगदर्शन, डॉ. शरद्चंद्र कोपर्डेकर, एम्.कॉम्.बी.ए.पी.एच. डी., इंद्रायणी साहित्य प्रकाशन, प्रथमावृत्ती: १९९४, मूल्य रु.१६०/- फक्त.

आता वळूया सूत्रांकडे.

००७. प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि ।
      जे आपण आपल्या ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने संवेदू शकतो ते "प्रत्यक्ष" प्रमाण.
      जे अनुमानाने ओळखतो (जसे की रेडिओ ऐकून लता गाते आहे) ते "अनुमान" प्रमाण. आणि
      जे आपल्या पूर्वसुरींनी आपल्या मनात रुजवले आहे (जसे की कधीही साप न पाहिलेल्याचे सापाला घाबरणे)
      त्या पुराव्याने सिद्ध होणारे असे जे ते "आगम" प्रमाणित.
 
००८. विपर्ययो मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् ।
      अंधारात झाडाच्या बुंध्यालाच पुरूष समजणे, अशा प्रकारच्या मिथ्या ज्ञानास "विपर्यय" म्हणतात.

००९. शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः ।
      अस्तित्वातच नसलेल्या वस्तूचे भान येणे म्हणजे "विकल्प".
 
०१०. अभावप्रत्ययालम्बना वृत्तिर्निद्रा ।
      संवेदन होतच नसले तर ती "निद्रा".
 
०११. अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः ।
      भूतकाळात रममाण होत असणे म्हणजे "स्मृती".
 
०१२. अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः ।
      ह्या साऱ्या वृत्तींचा निरोध "अभ्यास" आणि "वैराग्य" ह्यांचे आधारे साध्य होतो.
      मनात केवळ वरील पाच वृत्तीच राहू शकतात. एका वेळी फक्त एक. एक वृत्ती अस्तमान झाल्यावरच दुसरी उदय पावते. एक वृत्ती संपून दुसरी प्रकट होण्यापूर्वीचा काळ वाढवत नेणे म्हणजेच वृत्तींचा निरोध. ह्यालाच "अभ्यास" म्हणतात. तर वरील पाच वृत्तींप्रतीची आसक्ती कमी करत नेणे म्हणजे "वैराग्य". अभ्यास व वैराग्याने योग (चित्तवृत्तीनिरोध) साधतो. [float=font:kishor;place:top;]योगाने काय साधते? तर मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. मन त्याला आनंद वाटेल तेथेच रमत असते. म्हणून तर वृत्तींची आसक्ती असते.[/float] मग निवृत्तीतील आनंदाची ओळख आपण मनास करून दिली तर मन तेथेच रमू लागते.

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १