पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६

मायबोली डॉट कॉम च्या २००६ च्या अंकात आशिष महाबळ ह्यांनी लिहीलेल्या खालील लेखात योगाभ्यासाच्या पार्श्वभूमी विषयी चर्चा केलेली आहे. लेख वाचण्यासारखा आहे.

भारतीय तत्वचिंतनाचा वेध : वेद ते वेड?

पतंजलींच्या महाभाष्याची प्रस्तावना मराठीत आणण्याचा प्रयत्न मिस्टर उपक्रम डॉट ऑर्ग वर धनंजय यांनी केलेला आहे. ती मालिकाही वाचनीय आहे. तिचे शिर्षक आहे:

व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण

आता योगसूत्रांकडे वळू या.

॥ द्वितीयः साधनपादः ॥

दुसरा चतकोर. साधनपाद.

००१. तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः ।

तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान यांद्वारे योग साधतो. चित्तशुद्धी व्हावी एवढ्या एकाच हेतूने काया, वाचा आणि मन ह्यांवर ठेवलेले नियंत्रण म्हणजे तप, ॐ चा जप आणि चित्तशुद्धीकर शास्त्रादिकांचे अध्ययन करणे हा स्वाध्याय आणि आपली कायिक, वाचिक व मानसिक कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे हे ईश्वरप्रणिधान. ह्या तिन्हींचे अनुसरण (अनुष्ठान) करणे म्हणजे क्रियायोग होय. एकाग्र असतांना(समाधितावस्थेत) ईश्वरप्रणिधान कसे करायचे ते समाधीपादातील २८ व्या सूत्रात सांगितलेलेच आहे.
 
००२. समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च ।

समाधी साधण्याकरता आणि क्लेशतनुकरणासाठी असा योग साधावा लागतो. ज्या वस्तूचे ध्यान करून चित्तास तदाकार प्राप्त करून घ्यायचा, त्या वस्तूवर होणारी चित्ताची एकाग्रता ही समाधीभावना होय. पुढील सूत्रांत जे अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश वर्णन करायचे आहेत त्यांची शिथिलता घडवून आणणे हे क्लेशतनूकरण होय.
 
००३. अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः ।

अविद्या, अस्मिता, राग (प्रेम), द्वेष आणि अभिनिवेश हे ते पाच क्लेश आहेत.
 
००४. अविद्या क्षेत्रम् उत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम् ।

अविद्या ही पुढील चारही क्लेशांची प्रसवभूमी असते. हे चार क्लेश, सूप्त (प्रसूप्त), समूर्त (तनु), विच्छिन्न किंवा उदार अशा चार अवस्थांत असतात. मात्र त्यांची प्राथमिक अवस्था अविद्येतच उद्भवते. सूप्त अवस्थेत वासना अभिव्यक्त होत नसतात. समूर्त रूपात वासना राहतात मात्र त्यांचेसाठी कार्यप्रवण होण्याची भावना राहत नाही. विच्छिन्न अवस्थेत वासना दबून राहतात. उदार अवस्थेत मात्र आपल्याला त्या त्या वासना कृतीप्रवृत्त करतात.
 
००५. अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या ।

जगातील यच्चयावत वस्तू अनित्य असून नित्य आहे असा समज (ख्याति) होणे. अपवित्र (अशुचि) असून पवित्र (शुचि) आहेत असा समज होणे. दुःखरूप असून सुखरूप भासणे. अनात्म असून आत्ममय वाटणे. म्हणजे अविद्या.
 
००६. दृग्दर्शनशक्त्योरेकात्मतेवास्मिता ।

दृक्शक्ती म्हणजे द्रष्टा. दर्शनशक्ती म्हणजे जगाचे दर्शन ज्याचे माध्यमातून होते ते मन (चित्त). ही दोन्हीही वस्तुतः भिन्न असूनही ती एकरूपच आहेत असे वाटून 'अस्मि' म्हणजे मी आहे असे जे स्फुरण होते तोच अस्मिता नावाचा क्लेश होय.
 
००७. सुखानुशयी रागः ।

सुखांच्या अनुभवापाठोपाठ सुखाची साधने मला सतत प्राप्त असावित अशी जी लालसा चित्तात उत्पन्न होते तोच 'राग' (लोभ).
 
००८. दुःखानुशयी द्वेषः ।

दुखांच्या अनुभवापाठोपाठ दु:ख आणि त्याची कारणे ह्यांची माझ्याशी कधीही गाठ पडू नये अशी जी लालसा चित्तात उत्पन्न होते तोच 'द्वेष'.
 
००९. स्वरसवाही विदुषोऽपि तथारूढो भिनिवेशः ।

अविद्वानाप्रमाणे विद्वानाच्या ठायीही एखाद्या प्रवाहाप्रमाणे स्वभावतःच नेहमी अनुवृत्त असलेला, शरीररूप जो 'मी', त्या 'मी' कधीही मरू नये, निरंतर असावे, अशा स्वरूपाचा जो दृढ संस्कार होतो तो 'अभिनिवेश' होय.

पाचही क्लेश चित्तात संस्काररूपाने नित्य विद्यमान असतात. ही त्यांची सूक्ष्म अवस्था होय. पण व्यवहारकाली ते व विशेषतः राग, द्वेष आणि अभिनिवेश हे उद्बोधक निमित्ताने वृत्तीरूपाने परिणाम पावलेल्या अवस्थेत येतात. अशा प्रकारच्या क्लेशांच्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन अवस्था असतात. ह्या दोन्हीही अवस्थांतील क्लेश कोणत्या उपायांनी जिंकावेत हे पुढील सूत्रांत सांगितले आहे.