ह्यासोबत
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ८
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ९
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १०
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६
- पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १८
पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११
अनंतशक्तिरैश्वर्यं निष्यन्दाश्चाणिमादय: ।
स्वस्येश्वरत्वे संसिद्धे सिध्यन्ति स्वयमेव हि ॥
पुष्पमानया गन्धो विनेच्छामनुभूतये ।
पूर्णाहम्भावयुक्तेन परिच्छिन्ना विभूतय ॥ - मानसोल्लास:
पुष्प आणत असतांना त्यातील गंध यदृच्छया अनुभूतीला येतो तद्वत्, ज्याचा अहंभाव पूर्णत: नष्ट झालेला आहे अशा, स्वत:मधील ईश्वरत्वाने मोक्ष प्राप्त झालेल्या योग्याला अनंत शक्ती आणि ऐश्वर्य यांचा परिणाम असणार्या अणिमा इत्यादी सिद्धी स्वत:हूनच प्राप्त होतात.
॥ तृतीयो विभूतिपादः ॥
तिसरा चतकोर. विभूतीपाद.
विभूती म्हणजे सिद्धी.
संप्रज्ञात समाधीच्या पाच बहिरंग साधनांचा म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ह्या पाच अंगांचा विचार दुसर्या समाधीपादात झाला. आता ह्या तिसर्या पादात, धारणा, ध्यान आणि समाधी ह्या तीन अंतरंग साधनांचा विचार केला आहे. ह्या पादाला विभूतीपाद असे नाव आहे. ह्याचे कारण असे, की ह्या पादात योगाभ्यासापासून प्राप्त होणार्या अनेक विभूती म्हणजे सिद्धी संयमापासून प्राप्त होत असल्याने प्रथम संयम म्हणजे काय हे सांगण्यासाठी संयमाचे घटक जी धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंगे आहेत, त्यांची लक्षणे पहिल्या तीन सूत्रांत सांगितलेली आहेत.
००१. देशबन्धश्चित्तस्य धारणा ।
चित्ताला कोणत्यातरी देशावर म्हणजे स्थानावर जणू बांधून ठेवल्यासारखे स्थिर करणे ही धारणा होय.
००२. तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम् ।
एका क्षणाला जी भावना चित्तात असेल तीच पुढील अनेक क्षणांत टिकणे ही त्या भावनेची म्हणजे प्रत्ययाची एकतानता होय. धारणा ज्या देशावर केली असेल त्या देशावर ही प्रत्ययैकतानता करणे म्हणजे ध्यान होय.
००३. तद् एवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यम् इव समाधिः ।
भाव्य वस्तूव्यतिरिक्त दुसरा कोणताही अर्थ भासमान न होता केवळ ती वस्तूच भासमान होणे ही त्या वस्तूची अर्थमात्रनिर्भासता होय. चित्ताची भाव्य वस्तूशी इतकी तन्मयता होणे, की अमुक भाव्य वस्तूचे ध्यान मी करत आहे असे स्फुरण न होणे ही त्याची स्वरूपशून्यता होय. ध्येय अशा रीतीने केवळ अर्थरूपानेच तेवढे भासमान होणे आणि त्याच्या स्वरूपाचेही अनुसंधान न होणे हाच समाधी होय.
००४. त्रयम् एकत्र संयमः ।
धारणा, ध्यान आणि समाधी हे तिन्ही एकत्र प्रवृत्त झाले म्हणजे तो संयम होय.
००५. तज्जयात् प्रज्ञाऽऽलोकः ।
प्रकर्षाने म्हणजे विशेष प्रकारे ज्ञान जिला होते ती प्रज्ञा होय. संयमाचा जय झाला म्हणजे अशा प्रकारच्या प्रज्ञेचा आलोक म्हणजे उदय होतो.
००६. तस्य भूमिषु विनियोगः ।
त्या प्रज्ञेच्या उदयाचा विनियोग पुढील भूमीच्या ठिकाणी करावा.
००७. त्रयम् अन्तरङ्गं पूर्वेभ्यः ।
यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ह्या पाच पूर्वीच्या योगांगांच्या अपेक्षेने धारणा, ध्यान आणि समाधी ही तिन्ही सबीज संप्रज्ञात समाधीची अंतरंग साधने होत.
००८. तद् अपि बहिरङ्गं निर्बीजस्य ।
मात्र निर्बीज असंप्रज्ञात समाधीसाठी तीही बहिरंग साधनेच होत.
००९. व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणामः ।
चित्त विषयाकार होणे हे व्युत्थान (purturbation, disturbance, deviation) आणि चित्तात विषयाभिमुख होण्याची जी ओढ असते तो व्युत्थान संस्कार. त्याच्या उलट सर्व वृत्तींचा उपशम करणे हा निरोध आणि ह्या निर्वृत्तिक अवस्थेत होणार्या सत्त्वसंपन्नतेची ओढ हा निरोधसंस्कार. व्युत्थान संस्कारांचा अभिभव होणे म्हणजे ते दुर्बळ होत जाणे आणि निरोध संस्कार प्रकट होत जाणे व निरोधक्षणांत चित्ताचा अन्वय असणे म्हणजे चित्त निरोधावस्थेत काही क्षण टिकणे ह्या अवस्थेला चित्ताचा निरोधपरिणाम म्हणतात.
०१०. तस्य प्रशान्तवाहिता संस्कारात् ।
कसलाही विक्षेप न येता चित्त परिणामावस्थेत टिकून राहणे ही त्या परिणामाची प्रशांतवाहिता होय. मागील सूत्रात सांगितलेल्या निरोधपरिणामाची प्रशांतवाहिता निरोधाच्या संस्कारामुळे होऊ लागते.