ह्यासोबत
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ८
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ९
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १०
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६
- पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १८
पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ७
साधनपादाच्या सुरूवातीस विवेकचूडामणी मधल्या ३६० व्या श्लोकाचा संदर्भ कोल्हटकरांनी दिला आहे.
क्रियान्तरासक्तिमपास्य कीटकोध्यायन्यथालिं ह्यालिभावमृच्छति ।
तथैव योगी परमात्मतत्त्वं ध्यात्वा समायाति तदेकनिष्ठया ॥
म्हणजे ज्याप्रमाणे कीटक इतर सर्व क्रिया टाकून देऊन भ्रमराचेच ध्यान करत राहिल्यामुळे स्वत:च भ्रमर होतो, त्याप्रमाणे योगी एकनिष्ठ राहून परमात्मतत्त्वाचे ध्यान करत असता स्वत: परमात्माच बनतो.
आता योगसूत्रांकडे वळू या.
०१०. ते प्रतिप्रसवहेयाः सूक्ष्माः ।
कार्याचा कारणात विलय होणे हा प्रतिप्रसव होय. प्रतिप्रसवाने सूक्ष्म क्लेश जिकता येण्यासारखे असतात.
०११. ध्यानहेयास्तद्वृत्तयः ।
तेच क्लेश जेव्हा वृत्तीरूपात परिणत झालेले असतात तेव्हा ते ध्यानाभ्यासाने नाहीसे करण्यायोग्य (हेय) असतात.
०१२. क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्टजन्मवेदनीयः ।
कर्माचा चित्तावर होणारा धर्माधर्मरूप संस्कार हा कर्माशय होय. ह्या कर्माशयाला मूळ कारण क्लेश असल्यामुळे तो क्लेशमूल असतो. वर्तमानातील जन्म हा दृष्ट जन्म होय. भविष्यात प्राप्त होणारे जन्म अदृष्ट होत. ह्या दृष्टादृष्ट जन्मांच्या रूपाने वरील कर्माशय वेदनीय म्हणजे अनुभवण्यायोग्य होत असतो.
०१३. सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगाः ।
क्लेश जोपर्यंत चित्तात नांदत असतील तोपर्यंत कर्माशयाचे फल (विपाक) विशिष्ट जन्म, विशिष्ट आयुष्य आणि सुखदु:खात्मक भोग ह्या रूपाने त्या त्या क्लेशानुरूप अवश्यमेव घडून येतो.
०१४. ते ह्लादपरितापफलाः पुण्यापुण्यहेतुत्वात् ।
ह्या जात्यायुर्भोगरूपी फलप्राप्तीचे कारण पूर्वसुकृत वा पूर्वदुष्कृत असते म्हणून त्यानुरूप आल्हाद वा परिताप देणार्या भोगात त्यांचे पर्यवसान होते.
०१५. परिणामतापसंस्कारदुःखैर्गुणवृत्तिविरोधाच् च दुःखम् एव सर्वं विवेकिनः ।
विषयोपभोगामुळे चित्तावर होणारे विपरित परिणाम, विषयोपभोगादरम्यान सोसावे लागणारे ताप आणि विषयोपभोगामुळे चित्तावर होणारे संस्कार ह्या तिन्हींमुळे होणारे दु:ख आणि सत्त्व रज व तम ह्या गुणांच्या अंतर्विरोधामुळे होणारे दु:ख ह्यांच्यामुळे विवेकी पुरूषांस सुखकारक जन्म, आयुष्य आणि भोगही दु:खरूपच भासतात.
०१६. हेयं दुःखम् अनागतम् ।
भविष्यात भोगावे लागू शकणारे दु:ख निवारण करण्यायोग्य असते.
०१७. द्रष्टृदृश्ययोः संयोगो हेयहेतुः ।
चित्ताला जाणणारा हा द्रष्टा. त्याचेकडून जाणले जाणारे चित्त आणि चित्ताच्या पाचही वृत्ती दृश्य. म्हणजे जाणून घेण्याचा विषय असतात. ह्या दोहोंचा संगमच भविष्यातील दु:खाचे कारण असते.
०१८. प्रकाशक्रियास्थितिशीलं भूतेन्द्रियात्मकं भोगापवर्गार्थं दृश्यम् ।
दृश्याच्या ठिकाणी सत्त्वगुणामुळे प्रकाश, रजोगुणामुळे क्रिया आणि तमोगुणामुळे स्थिती हे धर्म त्रिगुणांच्या तारतम्यानुसार प्रकट होत असतात म्हणून दृश्य हे प्रकाशक्रियास्थितीशील असते. स्थूल-सूक्ष्म भूते, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि अंत:करण हे दृश्याचे व्यवहार्य स्वरूप असल्यामुळे त्याला भूतेंद्रियात्मक म्हटलेले आहे. जीवाला सुखदु:खांचे भोग घडवून अंती त्याला अपवर्गाची म्हणजे मुक्तीची प्राप्ती करून देणारे हे दृश्य असल्यामुळे ते भोगापवर्गार्थ होय. हे दृश्याचे प्रयोजन होय.
०१९. विशेषाविशेषलिङ्गमात्रालिङ्गानि गुणपर्वाणि ।
सत्त्व, रज आणि तम ह्या त्रिगुणांच्या चार अवस्था असतात. विशेष, अविषेश, लिंगमात्र आणि अलिंग. पाच महाभूते, पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये आणि अंत:करण ही सोळा तत्त्वे त्रिगुणांची विशेष अवस्था होय. ह्या सोळांची प्रकृती असलेल्या पाच तन्मात्रा आणि त्यांची प्रकृती असलेली अस्मिता ही सहा तत्त्वे ही त्रिगुणांची दुसरी अवस्था -अविशेष. ह्या सहा तत्त्वांची प्रकृती असलेले महत्तत्त्व ही त्रिगुणांची लिंगमात्र अवस्था होय. आणि ज्याचा लय दुसर्या कशातही होत नाही असे जे मूलप्रकृतीभूत अव्यक्त ती त्रिगुणांची अलिंगावस्था होय.
०२०. द्रष्टा दृशिमात्रः शुद्धोऽपि प्रत्ययानुपश्यः ।
द्रष्टा म्हणजे पुरूष हा दृशिमात्र म्हणजे चेतनामात्र असा आहे. तो शुद्ध म्हणजे बुद्धीप्रमाणे परिणाम न पावणारा असा आहे. तरीही सुद्धा अविद्येमुळे, बुद्धीशी जणू तादात्म्य पावून बुद्धीचे जे प्रत्यय म्हणजे अनुभव, ते जणू स्वत:च घेणारा असा स्वत:स समजू लागतो.
०२१. तदर्थ एव दृश्यस्यात्मा ।
दृश्याचा आत्मा म्हणजे त्याचे स्वरूप हे तदर्थच, म्हणजे मागील सूत्रात सांगितलेल्या द्रष्ट्याकरताच आहे.