पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२

पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२

मनोगती नामी_विलास ह्यांनी योगसूत्रांच्या ह्या स्वाध्यायास शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी संदर्भासाठी आणखीही एक पुस्तक सुचवलेले आहे.

३. "पातंजल योगप्रदीप", डॉ.पु.पां. जाखलेकर, अनमोल प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती: २००१, किंमत: रू.१००/- फक्त, पृष्ठे १४५.

आता योगसूत्रांकडे वळू या.

०११. सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयौ चित्तस्य समाधिपरिणामः ।

चित्त सर्व अर्थाकडे म्हणजे विषयांकडे धावत असणे ही सर्वार्थता आणि ते एकाच आधारावर स्थिर राहणे ही एकाग्रता होय. सर्वार्थतेचा क्षय आणि एकाग्रतेचा उदय म्हणजे समाधी परिणाम होय.

०१२.ततः पुनः शान्तोदितौ तुल्यप्रत्ययौ चित्तस्यैकाग्रतापरिणामः ।

पूर्व क्षणांतील प्रत्यय शांत होताच पुन्हा तत्सदृश प्रत्यय पुढील क्षणांत उदित झाला तर हे दोन्हीही तुल्यप्रत्यय झाले. अशाप्रकारे पूर्वोत्तर क्षणांत एकसारखाच प्रत्यय राहणे म्हणजे एकाग्रता होय.

०१३. एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्थापरिणामा व्याख्याताः ।

अशाप्रकारे, भूते आणि त्यांची इंद्रिये ह्यांच्या ठिकाणी निर्माण होणारे धर्म, लक्षण आणि अवस्था ह्या तीन परिणामांची व्याख्या झाली.
 
०१४. शान्तोदिताव्यपदेश्यधर्मानुपाती धर्मी ।

ज्यांचा व्यापार संपला आहे ते शांत धर्म होत. ज्यांचा व्यापार सुरू झाला आहे ते उदित धर्म आणि भावी काळात उत्पन्न होणारे, मात्र तोपर्यंत केवळ शक्तीरूपाने असलेले व म्हणूनच ज्यांचे ज्ञान होऊ शकत नाही ते अव्यपदेश्य धर्म होत. ह्या तिन्ही विशेष धर्मात अन्वयित्वाने राहतो तो धर्मी होय.
 
०१५.  क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः ।

धर्म, लक्षण आणि अवस्था ह्या तीन परिणामांतून परिणाम शांत होऊन दुसरा परिणाम उदित होतो हे परिणामान्यत्व होय. प्रतिक्षणी होणाऱ्या परिणाम क्रमात अन्यत्व निर्माण होते म्हणून परिणामान्यत्व घडून येते.
 
०१६. परिणामत्रयसंयमाद् अतीतानागतज्ञानम् ।

धर्म, लक्षण आणि अवस्था तीन मागील सूत्रात सांगितलेले परिणामत्रय त्यावर संयम केल्याने अतीत म्हणजे मागे होऊन गेलेल्या आणि अनागत म्हणजे आज अव्यपदेश्य असलेल्या पण पुढे घडून येणाऱ्या अशा गोष्टींचे ज्ञान होते.
 
०१७. शब्दार्थप्रत्ययानाम् इतरेतराध्यासात् संकरः । तत्प्रविभागसंयमात् सर्वभूतरुतज्ञानम् ।

कोणत्याही पदार्थाला उद्देशून उच्चारला जाणारा शब्द, ज्याला उद्देशून तो शब्द उच्चारला जातो तो त्या शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दावरून त्या अर्थाचा जो बोध होतो तो प्रत्यय,  ह्या तिन्ही गोष्टी परस्परांहून देशत:, कालत: व वस्तुत: अत्यंत भिन्न असूनही त्यांचा एकमेकांवर अध्यास होतो व त्यामुळे तिन्हींचा संकर झालेला असतो. ह्या संकराचे शब्द, अर्थ व प्रत्यय हे जे प्रविभाग त्यांवर संयम केला असता सर्व भूतांचे रुत म्हणजे बोलणे त्याचे ज्ञान होते.
 
०१८. संस्कारसाक्षत्करणात् पूर्वजातिज्ञानम् ।

चितामधे अनंत जन्मार्जित वासनांचे संस्कार असतात. ह्या संस्कारांवर संयम केल्याने त्यांचा साक्षात्कार होतो. असा साक्षात्कार झाल्यावर त्यामुळे त्या योग्याला कोणत्याही पूर्वजन्माचे ज्ञान होते.
 
०१९. प्रत्ययस्य परचित्तज्ञानम् ।

पर म्हणजे दुसरा मनुष्य. त्याच्या चित्ताचे ज्ञान, त्याच्या चित्तातील प्रत्ययाच्या साक्षात्काराने होते. 
 
०२०. न च तत् सालम्बनं,तस्याविषयीभूतत्वात् ।

हे ज्ञान त्या प्रत्ययाला जो आधार असतो त्यासह होत नाही. कारण तो आधार साक्षात्करणाचा विषय झालेला नसतो.