ह्यासोबत
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ८
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ९
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १०
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६
- पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १८
पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १४
योगसूत्रे आणि त्यांचे इंग्रजीत अर्थ हे विकीवर सापडतात. त्यांचा कर्ता कोण ते माहीत नाही. मात्र ढोबळ मानाने अर्थ-अन्वय लावण्याकरता कदाचित उपयोगी पडू शकेल. योगसूत्रे ही मुळात संस्कृतमधे लिहीली गेली असल्याने, "प्रसिद्ध दहा-बारा संस्कृत भाष्यकार, प्रा.सुरेंद्रनाथ दासगुप्ता, डॉ.बेहनन, प्रा.वूडस् इत्यादी विद्वानांचे पातंजल योगावरील पाच सहा ग्रंथ आणि योगशास्त्रावर आजपर्यंत मराठीत झालेले सर्व वाङ्मय ह्या सर्वांचे यथामती आलोडन करून हा ग्रंथ लिहिला आहे" असे कोल्हटकर म्हणतात. योगसूत्रांच्या प्रात्यक्षिक प्रयोगांच्या यशस्वीतेसाठी मूळ संस्कृत भाष्ये स्वत: समजून घेण्यास सोपे पर्याय मला दिसत नाहीत. परंतु ज्यांचे तैल बुद्धीस उपलब्ध साधनांवरून मूळ मार्गदर्शनाचे रहस्य जाणून घेण्याची क्षमता असेल त्यांना हे कदाचित साधूही शकेल. तरीही सर्व भाषांतील जाणकारांच्या सर्व भाष्यांचे संदर्भ, साधने म्हणून गोळा करण्याच्या कामाचे मूल्य अबाधित राहतेच. त्याच दृष्टीने ह्या प्रयत्नास अर्थ आहे.
आता योगसूत्रांकडे वळू या.
०३५. सत्त्वपुरुषयोरत्यन्तासंकीर्णयोः प्रत्ययाविशेषो भोगः। परार्थत्वात् स्वार्थसंयमात् पुरुषज्ञानम् ।
सत्त्व म्हणजे अंत:करण आणि पुरूष म्हणजे द्रष्टा आत्मा हे परस्परांहून अत्यंत असंकीर्ण म्हणजे भिन्न आहेत. तथापिही त्यांच्या भिन्नतेचा विशेष प्रत्यय न येणे हाच भोग होय. चित्ताच्या ठिकाणी हा भोग त्याच्या स्वत:करता नसून चित्ताहून पर जो द्रष्टा त्याच्याकरता असल्यामुळे स्वार्थ जो द्रष्टा पुरूष -आत्मा- त्याच्या ठिकाणी संयम केल्याने त्या चित्ताचा द्रष्टा असलेला साक्षी 'मी' असे पुरूषज्ञान होते.
०३६. ततः प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते । तत्संयमाद् अपरान्तज्ञानम्, अरिष्टेभ्यो वा ।
पुरूषज्ञानार्थ केल्या जाणाऱ्या वरील संयमापासून प्रतिभासामर्थ्यामुळे सूक्ष्म, व्यवहित किंवा अति दूर वस्तूंचे ज्ञान होणे आणि दिव्य असलेले शब्द ऐकू येणे (श्रावण), दिव्य स्पर्श कळणे (वेदन), दिव्य रूप दृष्टीस पाणे (आदर्श), दिव्य रसाची गोडी चाखता येणे (आस्वाद) आणि दिव्य गंध समजणे (वार्ता) ह्या सिद्धी उत्पन्न होतात.
०३७. ते समाधाव् उपसर्गा व्युत्थाने सिद्धयः ।
मागील सूत्रांत प्रातिभ, श्रावण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता हे जे सिद्धीविशेष सांगितलेले आहेत ते निर्बीज असंप्रज्ञात समाधीच्या मार्गात उपसर्ग म्हणजे अडथळेच होत. त्या श्रावणादिक अद्भूत शक्ती व्युत्थानकालांत सिद्धी होत.
०३८. बन्धकारणशैथिल्यात् प्रचारसंवेदनाच् च चित्तस्य परशरीरावेशः ।
चित्ताला एकाच शरीरात जणू बांधून ठेवण्यास कारण असलेले जे धर्माधर्मसंस्कार ते शिथील झाल्यामुळे आणि चित्ताचा प्रचार म्हणजे चित्तवहा नाडींच्या द्वारा होणारा चिताचा देहांतील संचार ह्यांचे संवेदन म्हणजे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे त्या चित्ताला परशरीरात प्रवेश करता येतो.
०३९. उदानजयाज्जलपङ्ककण्टकादिष्वसङ्ग उत्क्रान्तिश्च ।
पाच प्राणांपैकी उदानाचा जय केला असता पाणी, चिखल किंवा काटेकुटे ह्यांच्याशी संग न होता त्यावरून चालता येते आणि स्वेच्छेने उत्क्रांती म्हणजे मरण प्राप्त होते.
०४०. समानजयात् प्रज्वलनम् ।
समानाचा जय झाला असता कायाग्नी प्रज्वलित होतो.
०४१. श्रोत्राकाशयोः संबन्धसंयमाद् दिव्यं श्रोत्रम् ।
श्रोत्रेंद्रिये आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता योग्याला दिव्य श्रोत्रेंद्रियाचा लाभ होतो.
०४२. कायाकाशयोः संबन्धसंयमाल् लघुतूलसमापत्तेश्चाकाशगमनम् ।
शरीर आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता आणि कापसासारख्या हलक्या असणार्या पदार्थावर समापत्तिरूप तन्मयता प्राप्त करून घेतल्याने योग्याला 'आकाशगमन' हि सिद्धी प्राप्त होते.
०४३. बहिरकल्पिता वृत्तिर्महाविदेहा ततः प्रकाशावरणक्षयः ।
अकल्पिता, म्हणजे शरीर निरपेक्ष असलेली, जी चित्ताची बहिर्वृत्ती ती महाविदेहा होय. ती प्राप्त झाली असता तिच्या योगाने चित्तातील जो सात्त्विक प्रकाश त्यावर असलेले जे रजस्तमोगुणांचे म्हणजे तत्कार्यभूत क्लेशादिकांचे आवरण त्याचा क्षय होत जाऊन शेवटी पूर्णत्त्वाने नाहीसे होते.
०४४. स्थूलस्वरूपसूक्ष्मान्वयार्थवत्त्वसंयमाद्भूतजयः ।
जागृतावस्थेत घ्राणादी इंद्रियांनी ज्यांचे गंधादी गुण ग्रहण केले जात असतात ती भूतांची स्थूलावस्था. कठीणपणा इत्यादी धर्मांनी ज्ञात होणारी त्या भूतांची निर्व्यापारावस्था ही त्यांची स्वरूपावस्था. त्या त्या भूतांच्या तन्मात्रा ही त्यांची सूक्ष्मावस्था. सत्त्व, रज व तम हे तीन गुण तन्मात्रांत असतात, म्हणजे त्यांचा अन्वय तन्मात्रांत असतो. ही अन्वयावस्था आणि महत्तत्त्वापासून स्थूल भूतांपर्यंतचे सर्व गुण-परिणाम दृश्याच्या ठिकाणी असलेल्या भोगापवर्गार्थतारूप शक्तीमुळे घडून येत असल्याने ही शक्ती हीच अर्थवत्त्वावस्था. अशा स्थूल, स्वरूप, सूक्ष्म, अन्वय व अर्थवत्त्व ह्या पाच अवस्था भूतांच्या ठिकाणी आहेत. त्यांच्यावर क्रमाने संयम करून त्यांचा जय झाला असता भूतजय होतो.