पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १८

चित्त पूर्ण अंतर्मुख झाले म्हणजे त्या चित्तात आत्म्याचा विशेषपणे साक्षात्कार कसा होतो हे वरील बावीस आणि तेवीस ह्या सूत्रांत स्पष्ट झाले. आता आत्म्याचे अशा प्रकारे विशेष दर्शन झाले म्हणजे चित्ताच्या ठिकाणी कोणत्या अवस्था प्रकट होत असतात त्याचे पुढील सूत्रांतून वर्णन केलेले असून शेवटच्या म्हणजे चौतिसाव्या सूत्रात कैवल्याचे स्वरूप सांगितलेले आहे.

०२५. विशेषदर्शिन आत्मभावभावनाविनिवृत्तिः ।

मी पुरूष सत्-चित्-आनंदरूप असून चित्ताहून वेगळा आहे अशा प्रकारचे वृत्त्यात्मक अनुसंधान राखणे ही आत्मभावभावना होय. ज्याला वरील प्रकारचे आत्म्याचे विशेष दर्शन झालेले असते त्याच्या ठिकाणची आत्मभावना नाहीशी होते, म्हणजे तशा प्रकारची भावना न करताही त्याच्या ठिकाणी आत्मस्फुरण सहजपणे होऊ लागते.

०२६. तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम् ।

आत्म्याचे विशेष दर्शन झाल्यामुळे  आत्मभावभावना निवृत्त झाली असता त्या योग्याच्या चित्ताचा प्रवाह कैवल्यरूपी उंच प्रदेशाकडून विवेकरूपी निम्न म्हणजे सखल प्रदेशाकडे वाहत राहतो.

०२७. तच्छिद्रेषु प्रत्ययान्तराणि संस्कारेभ्यः ।

आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्याच्या चित्ताच्या सात्त्विकवृत्तीप्रवाहात मधून मधून खंड पडतो, हीच छिद्रे होत. ह्या छिद्ररूप अंतरालात मधून मधून पूर्वसंस्कारांमुळे भिन्न प्रत्ययही निर्माण होतात.

०२८. हानम् एषां क्लेशवदुक्तम् ।

मागील सूत्रात सांगितलेले प्रत्यय आणि त्यांचे संस्कार चित्तांतून नाहीसे होणे हे त्यांचे हान होय. हे हान साधण्यासाठी मागे क्लेशांच्या निवृत्तीसाठी जे उपाय सांगितलेले आहेत तेच ह्या ठिकाणी उक्त आहेत.

०२९. प्रसंख्यानेऽप्यकुसीदस्य सर्वथाविवेकख्यातेर्धर्ममेघः समाधिः ।

यथाक्रम व्यवस्थित असलेल्या तत्त्वांहून चेतन आणि द्रष्ट्टरूप असलेला आत्मा म्हणजे आपण अत्यंत विलक्षण आहोत असे नि:संदेह ज्ञान होणे हे प्रसंख्यान होय. ह्या प्रसंख्यानाविषयीही जो योगी अकुसीद म्हणजे सावकारी न करणारा म्हणजे विरक्त होतो अशा योग्याच्या ठिकाणी प्रत्ययांतररहित अशी विवेकख्यातीरूप आत्मसाक्षात्कारवस्था प्रकट होते आणि मग ह्या विवेकख्यातीमुळे धर्मामृतधारांचा वर्षाव करणारा जणू मेघच असलेला समाधी सिद्ध होतो.

०३०. ततः क्लेशकर्मनिवृत्तिः ।

धर्ममेघ समाधी सिद्ध झाला असता अविद्यादी पाच क्लेश आणि शुभ, अशुभ व मिश्र अशी त्रिविध कर्मे ह्यांची पूर्णत्त्वाने निवृत्ती होते.

०३१. तदा सर्वावरणमलापेतस्य ज्ञानस्याऽनन्त्याज्ज्ञेयम् अल्पम् ।

धर्ममेघ समाधीमुळे चित्तातील ज्ञानाला आवरक असलेले जे क्लेशकर्मरूप मल, त्यांपासून मुक्त झालेल्या ज्ञानाला आनन्त्य प्राप्त होत असते आणि त्याच्या अपेक्षेने ज्ञेय अगदी अल्प उरते.

०३२. ततः कृतार्थानां परिणामक्रमपरिसमाप्तिर्गुणानाम् ।

मागील सूत्रात सांगितल्याप्रमाणे योग्याच्या चित्तांतील ज्ञानाच्या ठिकाणी आनन्त्य आणि ज्ञेयाच्या ठिकाणी अल्पता आल्याने प्रकृतीचे घटक असलेले सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण कृतार्थ होतात आणि म्हणून त्या योग्याच्या चितांतील सूक्ष्म अस्मितेपासून स्थूलदेहापर्यंतचा जो त्रिगुणांचा परिणामक्रम, तो समाप्त होतो.

०३३. क्षणप्रतियोगी परिणामापरान्तनिग्रार्ह्यः क्रमः ।

हा परिणामक्रम क्षणप्रतियोगी असतो, म्हणजे एका क्षणाहून तो विलक्षण आणि अनेक क्षणांच्या प्रचयाच्या आश्रयाने राहणारा असा असतो. हेच त्याचे क्षणप्रतियोगित्व होय. त्याचप्रमाणे तो विशिष्ट-परिणाम-प्रवाहाच्या अपरान्तापर्यंत म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत नि:शेषत्वाने ग्रहण केला जातो.

०३४. पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं, स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरेति ।

जीवाला भोग आणि अपवर्ग ही प्राप्त करून दिल्यामुळे त्रिगुणांना आता साधावयाचा असा कोणताच अर्थ राहिलेला नसतो, ही त्यांची पुरूषार्थशून्यता होय. अशा रीतीने पुरूषार्थशून्य झालेले गुण प्रयोजनाभावी आपापल्या उपादान करणात विलीन होतात. हा त्यांचा प्रतिप्रसव होय. हीच कैवल्यावस्था होय, किंवा चितिशक्ती म्हणजे चेतनपुरूष अविद्येच्या नाशामुळे वृत्तीशी सारुप्य पावत नाही आणि अशा प्रकारे तो आपल्या नित्यसिद्ध स्वरूपाने प्रतिष्ठित असतो हीच कैवल्यावस्था होय.

॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे चतुर्थः कैवल्यपादः ॥

'इति' हे पद शास्त्र समाप्त झाल्याचे निदर्शक म्हणून योजले आहे.

अशाप्रकारे हा प्रकल्प यथानियोजित संपूर्ण होत आहे.