ह्यासोबत
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: २
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ६
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ८
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ९
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १०
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ११
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६
- पातंजल योगसूत्र व भाष्ये: १२
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १३
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १४
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १५
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १७
- पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १८
पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १०
स्वर्गारोहण डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर मला पहिल्याप्रथम योगसूत्रे पाहायला मिळाली होती. अर्थात मराठी विकीवरही ती उपलब्ध आहेत. पण स्वर्गारोहण डॉट कॉम स्वतःला गुजराती भाषेतील अध्यात्मविषयक सुपरसाईट म्हणवते. मला गुजराती येत नाही. पण ते संकेतस्थळ विपुल आध्यात्मिक साहित्यांनी भरलेले दिसून येते. गुजराती जाणणारे कदाचित यथोचित मूल्यमापन करू शकतील.
आता योगसूत्रांकडे वळू या.
०४६. स्थिरसुखम् आसनम् ।
शरीर ज्या स्थितीत राहीले असता मन आणि शरीर ह्या दोहोंस सुख वाटेल आणि स्थिरता प्राप्त होईल ते आसन होय.
०४७. प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् ।
शारीरिक हालचाली करण्याविषयीच्या सहजप्रवृत्तीस 'प्रयत्न' म्हणतात. ह्या प्रयत्नांत सहजता (शैथिल्य) संपादन करणे आणि अनंताच्या ठिकाणी समापत्ती म्हणते तन्मयता साधणे ह्या दोन उपायांनी आसन स्थिर आणि सुखावह होते.
०४८. ततो द्वन्द्वानभिघातः ।
आसन स्थिर झाले असता राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांचा अनभिघात म्हणजे उपद्रव न होण्याची सिद्धी प्राप्त होते.
०४९. तस्मिन् सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ।
आसन साध्य झाल्यावर श्वास आणि प्रश्वास ह्यांच्या स्वाभाविक गतीचे नियंत्रण (विच्छेद) करणे म्हणजे प्राणायाम होय.
०५०. बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिः देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः ।
प्राणायाम तीन प्रकारचा असतो. बाहेर सोडला जाणारा प्रश्वासरूप रेचक, आत घेतला जाणारा श्वासरूप पूरक आणि दरम्यान काही काळची स्तब्धता म्हणजे कुंभक. तो, देश (आत किंवा बाहेर), काल (प्रलंबन काल) आणि संख्या (आवृत्ती) ह्यांच्या योगाने दीर्घ आणि सूक्ष्म असा उपलक्षित होतो.
०५१. बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः ।
आत किंवा बाहेर अशा कोणत्याही देशाची अपेक्षा न ठेवता केवळ स्तंभवृत्तीने केला जाणारा चौथा केवल कुंभक होय.
०५२. ततः क्षीयते प्रकाशावरणम् ।
प्राणायामामुळे चित्तातील प्रकाशस्वरूप सत्त्वगुणावर आवरण घालणाऱ्या रजस्तमोदोषांचा क्षय होतो.
०५३. धारणासु च योग्यता मनसः ।
पुढील योगांग जी धारणा, तिचा अभ्यास करण्याची योग्यता त्यामुळे मनास प्राप्त होते.
०५४. स्वस्वविषयासंप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इवेन्द्रियाणां प्रत्याहारः ।
नेत्र, कर्ण, रसना, नाक आणि त्वचा इत्यादी ज्ञानेंद्रियांद्वारे होणाऱ्या रूप, शब्द, रस, गंध आणि स्पर्श ह्या संवेदनांचा परस्परांशी संबंध येणे म्हणजे त्यांचा संप्रयोग. असा संप्रयोग होऊ दिला नाही म्हणजे ती इंद्रिये चित्ताच्या स्वरूपाचे जणू अनुकरण करणारी होतात. ह्या त्यांच्या स्थितीला प्रत्याहार म्हणतात.
०५५. ततः परमा वश्यतेन्द्रियाणाम् ।
ह्या प्रत्याहाराच्या अभ्यासाने इंद्रियांची स्वाधीनता पूर्णत्वाने होते.
॥ इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे द्वितीयः साधनपादः ॥
अशाप्रकारे पतंजली विरचित योगसूत्रांचा दुसरा चतकोर, साधनपाद संपूर्ण होत आहे.