पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १

पातंजली ऋषींनी मनोकायिक मनुष्यव्यवहारांचा सखोल अभ्यास करून, सर्वप्राणीमात्रांच्या हितास पोषक मानवी व्यवहार कोणता (मनुष्याने कसे वागावे) हे सूत्रबद्ध रीतीने वर्णन केलेले आहे. तीच १९५ सूत्रे पातंजल योगसूत्रे म्हणून ओळखली जातात. ती चार भागांत विभागलेली आहेत. समाधीपाद(५१), साधनपाद(५५), विभुतीपाद(५५) आणि कैवल्यपाद(३४). ज्या काळात हे घडून आले, तेव्हा ज्ञानसंकलन आणि प्रसाराचे काम पारंपारिक मौखिक पाठांतराद्वारेच होत असे. ह्याकरता कमीत कमी शब्दात, पण व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण आणि निस्संदिग्ध ज्ञानाच्या अभिव्यक्तीस सूत्र म्हटले जाई. मात्र, सूत्राच्या मनुष्यजीवनातील वापराप्रसंगी त्याचा अर्थ समजून घेण्याकरता, त्यामुळेच स्पष्टीकरणांची गरज पडे. व्यासादिकांसकट पातंजलींनंतरच्या कित्येक विद्याव्यासंगी व्यक्तींनी तत्कालीन सामान्य लोकांना सूत्रांचे आकलन आणि वापर वैयक्तिक जीवनात सहजपणे करता यावा ह्याकरता त्यावर सुरस भाष्ये लिहीली. ज्याप्रकारे ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) गीतेचा अर्थ सामान्यांस सुलभ करते, त्याच प्रकारे योगसूत्रे सर्वसामान्यांच्यासाठी ही भाष्ये उपलब्ध करून देतात. भाष्ये आकाराने, प्रकाराने आणि वैविध्याने भरलेली असली तरी ती मूळ योगसूत्रेच निसांदिग्धपणे सांगत असतात. पातंजली ऋषींच्या पूर्वी योग नव्हता काय? ह्याचे उत्तर आहे की होता. भारतीय संस्कृतीत जीवनसिद्धांतांचे परिशीलन हजारो सालांपासून सातत्याने होतच आलेले आहे. त्यांचेपूर्वीच्या सर्व अभ्यासाचे सार पातंजलींनी अत्यंत समर्पक आणि निस्संदिग्ध शब्दांत सूत्रबद्ध केले. भारतीय मानसाची बैठक गीता व योगसूत्रे यांचे आधारेच परिपूर्ण होते. असे असले तरीही योगसूत्रे गीतेच्या तुलनेत कमी प्रसिद्ध आहेत. काळाच्या ओघात मला योगसूत्रे जाणून घेण्याची निकड जाणवली. तेव्हा ती सहज उपलब्ध झाली नाहीत. सुरूवातीला ती भाष्यांविना समजूनही घेता येत नाहीत. भाष्येही सहजी उपलब्ध नाहीत. मला वाटली तशी योगसूत्रे जाणून घ्यायची निकड सुहृदांतही उदयमान व्हावी. त्या जिज्ञासेची परिपूर्तता व्हावी. आणि आपल्या सांस्कृतिक संपत्तीचा वारसा आपण उमजून घ्यावा ह्याकरता हा खटाटोप. हे एक प्रकट चिंतनच आहे. इथे चर्चाही करता येईल. माझ्या, तुमच्या समजा, गैरसमजांना अभिव्यक्तही करता येईल. आपल्या पूर्वापार सांस्कृतिक संपत्तीस आत्मसात करता येईल.

००१. अथ योगानुशासनम् ।
      योगव्यवहार असा आहे.

००२. योगः चित्तवृत्तिनिरोधः ।
      योग म्हणजे चित्तवृतींचा निरोध.

००३. तदा द्रष्टुं स्वरूपे अवस्थितान् ।
      (एकाग्रता साधेल) तेव्हा आत्मा स्वरूपात नांदतो.

००४. वृत्तिसारूप्यम् इतरत्र ।
      (एरव्ही) आत्मा इतरत्र गुंततो.
 
००५. वृत्तयः पञ्चतय्यः क्लिष्टा अक्लिष्टाः ।
      मनुष्यवृत्ती पाच प्रकारच्या असतात. क्लेशकारक आणि क्लेशविहीन.
 
००६. प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः ।
      आसमंताची यथातथ्य प्रतिमा जेव्हा आपण मनात साकारतो तेव्हा आपली वृत्ती "प्रमाण" असते. समोरची वस्तू यथातथ्य न समजून घेता ती वेगळीच कुठली असल्याचा समज आपण करून घेतो तेव्हा आपण "विपर्यय" करत असतो. सत्याला पर्याय शोधत असतो. कधीकधी अस्तित्वात नसलेल्या गोष्टी आपण सभोवताल पाहतो (भूतासारखे आभास) तेव्हा तो "विकल्प" असतो. जेव्हा आपण आसमंताचे आकलनच करत नसतो तेव्हा आपण "निद्रावृत्तीत" असतो. तर आठवणीत रमतो तेव्हा आपण "स्मृती"वृत्तीत असतो.