पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ८

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: ८

ह्या भागात अष्टांग योगातील अंगे, यमनियमादी प्रत्यक्ष आचरणात आणावयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा पातंजल योगसूत्रांत केलेला उहापोह आपण बघणार आहोत. कोल्हटकरांनी स्कंदपुराणातील एक श्लोक सत्याचरणाच्या महतीखातर दिलेला आहे. तो असा:

सत्यं ब्रूयात्प्रियं ब्रूयात् न ब्रूयात्सत्यमप्रियम्
प्रियं च नानृतं ब्रुयात् एष धर्म: सनातन: (स्कन्द पुराण ब्रा.ध.मा. ६.८८)

म्हणजे 'सत्य बोलावे, (समोरच्याला) आवडेल असे बोलावे, मात्र नावडते सत्यही बोलू नये आणि आवडते असत्यही बोलू नये हाच खरा सनातन धर्म होय.'

सनातन धर्माची ही समर्पक, योग्य आणि स्पष्ट शिकवण मनाला भिडते.

आता योगसूत्रांकडे वळू या.

०२२. कृतार्थं प्रति नष्टम् अप्यनष्टं तदन्यसाधारणत्वात् ।

कैवल्य साक्षात्कार झालेल्या योग्यापुरते जरी दृश्य नष्ट झालेले असले तरी तदन्य म्हणजे इतर अकृतार्थ जीवांना ते साधारणत्वाने प्रतीत होत असतेच, म्हणून त्यांच्यापुरते ते अनष्टच होय.
 
०२३. स्वस्वामिशक्त्योः स्वरूपोपलब्धिहेतुः संयोगः ।

द्रष्ट्याकरता दृश्य असल्यामुळे द्रष्टा हा स्वामी आणि दृश्य हे त्याचे 'स्व' झाले. ह्या दोहोंच्या उपलब्धीला म्हणजे यथार्थ ज्ञानाला कारण होणारा असा संयोग आहे.

०२४. तस्य हेतुरविद्या ।

त्या संयोगाचे कारण अविद्या होय.
 
०२५. तदभावात्संयोगाभावो हानं तद्दृशेः कैवल्यम् ।

संयोगास कारण असलेल्या अविद्येचा अभाव झाला असता संयोगाचा अभाव होतो. ह्यालाच हान ही संज्ञा आहे. हे हान म्हणजे दृशिस्वरूप जीवाची कैवल्यावस्था होय.
 
०२६. विवेकख्यातिरविप्लवा हानोपायः ।

द्रष्टा मी, दृश्य असलेले चित्त आणि त्याच्या वृत्ती, ह्यांच्याहून वेगळा आहे असा विवेक उदित होणे म्हणजे विवेकोद्भव (विवेकख्याति) होय. संशय, विपर्यय, भ्रम इत्यादी दोष हे विप्लव होत. ह्या दोषांनी युक्त नसलेला तो अविप्लवा विवेकोद्भव (विवेकख्याति) होय. असा अविप्लवा विवेकोद्भव वर सांगितलेल्या हानाचा उपाय होय.
 
०२७. तस्य सप्तधा प्रान्तभूमिः प्रज्ञा ।

मुक्तावस्थेत (हानावस्थेत) चित्तातील प्रज्ञा, सात प्रकारच्या सहजप्रवृत्ती जिच्यामधे प्रकर्षाने अंताला पोहोचलेल्या आहेत अशी (सप्तधा) असते. म्हणजे त्या अवस्थेत, त्या योग्याच्या प्रज्ञेत सात प्रकारच्या सहजप्रवृत्ती विद्यमान असत नाहीत.
 
०२८. योगाङ्गानुष्ठानाद् अशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिरा विवेकख्यातेः ।

योगाची जी यमनियमादी आठ अंगे आहेत त्यांचे अनुष्ठान केल्याने चित्तातील अशुद्धीचा क्षय होत जाऊन ज्ञानशक्ती प्रदीप्त होत जाते आणि तिचे पर्यवसान चित्तात विवेकोद्भव होण्यात होते.
 
०२९. यमनियमासनप्राणायामप्रत्याहारधारणाध्यानसमाधयोऽष्टाव अङ्गानि ।

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही योगाची आठ अंगे होत.
 
०३०. अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः ।

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत.
 
०३१. जातिदेशकालसमयानवच्छिन्नाः सार्वभौमा महाव्रतम् ।

ब्राह्मणादीजाती, तीर्थक्षेत्रादी देश, पवित्र तिथी इत्यादी काल, यज्ञयागादिक समय ह्यांपैकी कोणत्याही कारणामुळे अवच्छेद न घडता जर अहिंसादी व्रतांचे पालन घडेल तर यमांचे पालन महाव्रत ठरेल.
 
०३२. शौचसंतोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः ।

शरीर स्वच्छ ठेवणे आणि मन पवित्र  राखणे हे शौच; प्राप्त परिस्थितीत मनाचे समाधान राखणे हा संतोष; रसनेंद्रियावर नियमन ठेवणे, शीतोष्णादी द्वंद्वे सहन करणे आणि इंद्रिये स्वाधीन ठेवणे हे तप; उपास्यदेवतेच्या मंत्रांचा जप करणे, वेदाध्ययन करणे, बुद्धीला सूक्ष्मता आणि शुद्धी प्राप्त करून देणाऱ्या न्याय, योग, वेदान्त इत्यादी शास्त्रांचे अध्ययन करणे हा स्वाध्याय आणि सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे, हे ईश्वरप्रणिधान असे हे पाच नियम होत.