पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६

पातंजल योगसूत्रे व भाष्ये: १६

समाधिननेन समस्तवासना
ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा
स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४

या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्‍या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.

आता योगसूत्रांकडे वळू या.

॥ चतुर्थः कैवल्यपादः ॥

चवथा मोक्ष पाद सुरू होत आहे.

००१. जन्मौषधिमन्त्रतपःसमाधिजाः सिद्धयः ।

विशिष्ट जन्म, दिव्य औषधी, भिन्न देवतांचे मंत्र, तपःसामर्थ्य आणि समाधी अशा पाचांपासून सिद्धी प्रकट होत असतात.
 
००२. जात्यन्तरपरिणामः प्रकृत्यापूरात् ।

जीवांच्या सूक्ष्म देहाच्या आश्रयाने असलेला, एका जातीचा स्थूल देह जाऊन, दुसर्‍या जातीचा देह निर्माण होणे हा जात्यंतर परिणाम होय. हा जात्यंतर परिणाम त्या त्या विकृतींची पूर्णता प्रकृतीकडून केली जाते म्हणून घडून येत असतो.
 
००३. निमित्तम् अप्रयोजकं प्रकृतीनां । वरणभेदस्तु ततः क्षेत्रिकवत् ।

क्षेत्रिक म्हणजे शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या शेताला पाणी पोहोचण्याकरता, मध्यंतरींचे उंचवटे, धोंडे, इत्यादी प्रतिबंध असतील तेवढे दूर करतो - मग अधोमार्गाकडे वाहत जाण्याच्या प्रकृतीधर्मानुसार पाणी आपण होऊनच त्याच्या शेतात जाऊन पोहोचते. त्याचप्रमाणे प्रकृतीच्या परिणाम प्रवाहाला जे वरण म्हणजे जो प्रतिबंध असतो त्याचा भेद म्हणजे नाश धर्माधर्मादिकांमुळे होत असतो, ती निमित्ते प्रकृतीला प्रयोजक नसतात. (त्या निमित्तांनी प्रतिबंध तेवढे दूर होतात आणि प्रकृती आपल्या स्वभावानुसार जात्यंतर परिणाम घडवून आणते.)
 
००४. निर्माणचित्तान्यस्मितामात्रात् ।

योग्याने भोगार्थ निर्माण केलेल्या भिन्न शरीरातील भिन्नपणे निर्माण झालेल्या चित्तांचा आपूर, त्या चित्तरूपी विकृतींची प्रकृती अशी जी योग्याच्या ठिकाणची अस्मिता तिच्यातूनच केवळ घडून येत असतो.
 
००५. प्रवृत्तिभेदे प्रयोजकं चित्तम् एकम् अनेकेषाम् ।

योग्याने निर्माण केलेल्या अनेक शरीरांतील अनेक चित्तांच्या भिन्न भिन्न प्रवृत्तींना प्रयोजक म्हणजे प्रेरक असलेले चित्त एकच असते. (म्हणून त्या प्रेरक चित्ताच्या प्रेरणेला अनुसरून सर्व चित्तांचे व्यापार एकाच अभिप्रायानुसार चालतात आणि योग्यास अपेक्षित भोग घडतात.)

००६. तत्र ध्यानजम् अनाशयम् ।

योग्याने निर्माण केलेल्या ह्या अनेक चित्तांस प्रेरक असलेले जे ध्यानज, म्हणजे ध्यानावस्थेमुळे सत्त्वगुणाने संपन्न झालेले मूळचे चित्त, ते अनाशय असते; म्हणजे इतर चित्तांद्वारा घडणार्‍या भोगरूप कर्मामुळे त्या ध्यानज चित्तावर विपाकास कारणीभूत होणारे कर्मसंस्कार घडत नाहीत असे ते असते.

००७. कर्माशुक्लाकृष्णं योगिनः त्रिविधम् इतरेषाम् ।

काही कर्मांचे स्वरूप शुक्ल म्हणजे शुभ असते. इतर काही कर्मांचे स्वरूप कृष्ण म्हणजे अशुभ असते. तर काही कर्मे शुक्ल-कृष्ण म्हणजे शुभाशुभ अशी मिश्र स्वरूपाची असतात. योग्यांची कर्मे शुक्ल ही नसतात, कृष्ण ही नसतात आणि शुक्ल-कृष्ण ही नसतात. योगी जनांहून इतर प्राकृत जनांची कर्मे मात्र वरील तिन्ही प्रकारची असतात.
 
००८. ततस्तद्विपाकानुगुणानाम् एवाभिव्यक्तिर्वासनानाम् ।

त्या कर्मांच्या योगाने जाती, आयुष्य आणि भोग असा जो विपाक निर्माण होतो त्याच्याशी जेवढ्या वासना अनुगुण असतील तेवढ्यांचीच अभिव्यक्ती होत असते. (म्हणजे तेवढ्या वासना प्रकट होतात आणि इतर वासना चित्तांत तशाच प्रसुप्त अवस्थेत राहतात.)

००९. जातिदेशकालव्यवहितानाम् अप्यानन्तर्यं । स्मृतिसंस्कारयोः एकरूपत्वात् ।

सांप्रतच्या विपाकाला अनुगुण असलेल्या आणि व्यक्त होणार्‍या वासना आणि त्यांचे मूळचे संस्कार ह्या दोहोंच्या मध्ये अनेक देशांत आणि कालांत प्राप्त झालेल्या अनेक जन्मांचे व्यवधान असूनही नंतर त्या वासना प्रकट होतात. वासनांचे संस्कारच स्मृतीरूपाने उदित होत असतात, म्हणजे स्मृती आणि संस्कार ह्यांच्यात एकरूपता असते हे ते संस्कार स्मृतीरूपाने चित्तांत उदित होण्याला कारण असते.

०१०. तासाम् अनादित्वं चाशिषो नित्यत्वात् ।
देहरूप जो मी त्याला मरण येऊ नये असे जे जीवमात्राला वाटत असते तोच महामोहरूपी आशी: होय. हा आशी: सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी नित्याचाच आहे म्हणजे तो अनादी आहे. इतर सर्व वासना त्याच्यावरच अवलंबून असल्याने त्याही अर्थात् त्याच्यासारख्या अनादी होत.

०११. हेतुफलाश्रयालम्बनैः संगृहीतत्वाद् एषाम् अभावे तदभावः ।

अविद्यादी पाच क्लेश वासनांचे हेतू होत; जाती, आयुष्य आणि भोग ही त्या वासनांची फले होत; चित्त त्यांचे आश्रयस्थान होय आणि शब्दादिक विषय त्यांची आलंबने होत. ह्या चारांपासूनच वासनांचा संग्रह होत असतो म्हणून ह्या चारांचा अभाव होताच वासनांचाही अभाव सिद्ध होतो.
 
०१२. अतीतानागतं स्वरूपतोऽस्त्यध्वभेदाद् धर्माणाम् ।
 
धर्माच्या ठिकाणी अतीत धर्म म्हणजे कार्य संपल्यामुळे जे उपशांत झाले आहेत असे धर्म, अनागत म्हणजे जे उद्बोधक सामग्री मिळताच व्यक्तावस्थेला येणार आहेत असे धर्म आणि उद्बोधक सामग्री मिळाल्यामुळे व्यक्त दशेस येऊन ज्यांची कार्ये चालू झाली आहेत ते वर्तमान धर्म, अशा रीतीचा अध्वभेद आहे, म्हणून मागील सूत्रांत सांगितलेल्या वासनांचा वर्तमान धर्माच्या दृष्टीने जरी अभाव असला तरी त्या अतीत व अनागत अशा अवस्थांत स्वरूपतः असतातच.