इंग्रजी शाळांत जाऊन मराठीचा जागर करा - रामदास फुटाणे ह्यांचे विचार

आजच्या ई सकाळात ही बातमी वाचायला मिळाली. सर्वांना समजावी आणि तिच्यावर ऊहापोह करता यावा ह्या उद्देशाने ती येथे उद्धृत करून ठेवत आहे.

ईसकाळातली मूळ बातमी : इंग्रजी शाळांत जाऊन मराठीचा जागर करा - रामदास फुटाणे

पुणे, ता. २६ - व्यावहारिक दृष्टिकोनातून इंग्रजी भाषेचा वापर अपरिहार्य झाला असला, तरी मराठी भाषेला मरण नाही, असे सांगून ""मराठीची आवड निर्माण करण्यासाठी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये जाऊन तेथील मुलांमध्ये मराठीचा जागर केला पाहिजे,'' असे मत कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या युवा विभागातर्फे २७ फेब्रुवारीला साजऱ्या करण्यात येणाऱ्या "मराठी दिना'निमित्त "मराठी भाषा-मराठी अस्मिता' या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. यामध्ये युवा विभागाचे प्रसाद शिरगावकर, नचिकेत जोशी, संदीप बर्वे आणि नम्रता ठोसर सहभागी झाले. प्रा. गणेश राऊत परिसंवादाचे अध्यक्ष होते. परिसंवादापूर्वी परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या एकांकिका, दीर्घ एकांकिका, आणि कथा लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण फुटाणे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. माधवी वैद्य या वेळी उपस्थित होत्या.

फुटाणे यांनी प्राध्यापकांमध्ये मराठीबद्दल असलेल्या निराशेबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ""मराठी वाचविण्यासाठी पैसा ही दुय्यम बाब आहे. किती तीव्रतेने तुम्ही प्रयत्न करता, याला महत्त्व आहे. इंग्रजी भाषा आता काळाची गरज आहे, त्यामुळे ती शिकणे आवश्‍यक आहे, पण ती शिकताना विद्यार्थी मराठीला विसरणार नाहीत, याची काळजी प्राध्यापकांनी घ्यावी.''

शिरगावकर म्हणाले, ""एकीकडे महाराष्ट्रात मराठीचा वापर कमी होत असताना परदेशात मात्र मराठी जपणारी अनेक मंडळी कार्यरत आहेत. काही वर्षांनी या मंडळींनाच तेथे राहून "महाराष्ट्रातील मराठी कशी वाचवायची' यावर चर्चा करण्याची वेळ येणार आहे, अशी शंका वाटते. तरुण वर्ग इंटरनेटच्या माध्यमातून मराठीचा वापर करीत आहे, हा एक आशेचा किरण दिसतो.''


'इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये जाऊन तेथील मुलांमध्ये मराठीचा जागर केला पाहिजे' हा विचार तुम्हाला पटतो का?

तो व्यवहार्य आहे की नाही असे आपल्याला वाटते?

आपल्यापैकी कुणी ह्या कार्यक्रमाला गेला होता का? (आपले मनोगती सदस्य 'प्रसाद शिरगावकर' हे व्यासपीठावरच असल्याने त्यांनीही ह्या कार्यक्रमाबद्दल येथे विस्ताराने लिहावे असे वाटते.)

मराठीचा जागर करायचा म्हणजे कशा स्वरूपाचा कार्यक्रम असायला हवा ह्याविषयी श्री. फुटाणे काही बोलले का?

प्राध्यापकांमध्ये खरोखरच मराठीबद्दल इतकी निराशा आहे का?

'मराठी वाचविण्यासाठी पैसा ही दुय्यम बाब आहे. किती तीव्रतेने तुम्ही प्रयत्न करता, याला महत्त्व आहे.' हे पटण्यासारखे आहे का?

''परदेशात मात्र मराठी जपणारी अनेक मंडळी कार्यरत आहेत.'... असे प्रसाद शिरगावकर म्हणतात. ह्या मंडळींच्या मराठी जपण्याच्या कार्यक्रमाचा काही तपशील मिळू शकेल काय?