सलाम मुंबई !!!

आज १२ मार्च, मुंबईच्या त्या काळ्याकुट्ट दिवसाला आज पंधरा वर्षे झाली.

पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस आजही अगदी आठवणीत आहे. दुपारी दोनचा सुमार होता. मी त्यावेळच्या माझ्या वरळी येथील टि व्ही औद्योगिक संकुलातल्या कार्यालयातून नुकताच बाहेर पडलो होतो. दुपारी तीन वाजता कफ परेड येथे आय डी बी आय च्या काही वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचे होते, तशी वेळ ठरली होती. मी इमारतीतुन बाहेर पडलो आणी समोरच उभ्या असलेल्या टॅक्सीत शिरणार इतक्यात एक दणद्णीत स्फोटाचा आवाज आला. मी आत शिरताना थबकलो आणि प्रतिक्षिप्त क्रिया घडल्यागत आपोआप बाहेर आलो. उजवीकडे र्‍होन पॉलेंक च्या पलिकडे म्हणजे पारपत्र कार्यालय/ सत्यम-सचिनम च्या मागच्या झोपडपट्टीतुन आवाज आला असावा असे वाटले. आता मुंबईच्या दाटीवाटीच्या अश्या वस्त्यांमध्ये अनेक बेकायदेशीर कारखाने असतात; अगदी सुटे भाग बनविणार्‍या कारखान्यांपासून ते रसायनांपर्यंत. अशाच एखाद्या कारखान्यात स्फोट झाला असावा असे मला वाटले. मी आणि तो टॅक्सीवाला दोघेही उत्सुकतेने जरा पुढे गेलो तर त्या दिशेने आकाशात उठलेले वरवर जाणारे दाट पिवळे वलय मला दिसले. मी चक्रावलो. अर्थात बाँबस्फोट वगरे ध्यानीमनीही नव्हते, पण वायुगळती वगैरे ऐकुन होतो आणि बहुधा कसल्याश्या रसयनाच्या टाकीचा स्फोट झाला असावा असा माझा समज झाला. मी ताबडतोब त्या टॅक्सीवाल्याला गाडी हाणून लवकरात लवकर दूर जायचा आदेश दिला.

आम्ही डावीकडुन निघालो आणि उजवे वळण घेत पांडुरंग बुधकर मार्गावर आलो आणि ग्लॅक्सोला वळसा घेउन ऍनी बेजंट मार्गाला लागणार तोच कर्कश्शा कर्णे वाजवत आणि 'जाउद्या आम्हाला' असे आतल्या माणसांचे हात हालत असणार्‍या अनेक टॅक्सी सुसाट वेगाने पार झाल्या. काहींमध्ये अगदी पुढेच रक्ताने माखलेली माणसे दिसली, एका टॅक्सीच्या पुढच्या काचेचा चक्काचूर झालेला दिसला. बहुधा ते सगळे अगदी जवळच असलेल्या पोदार रुग्णालयाकडे दौडत असावेत. एकुण स्फोट फारच गंभीर स्वरुपाचा असावा. पाठोपाठ आम्हीही निघालो. अडीच वाजले होते, मला तीन च्या आय डी बी आय ला जागतिक व्यापार केंद्रापाशी जायचे होते. वरळी नाका पार झाला. हाजीअलीचे रिंगण गेले. ताडदेव चे गंगा जमुना मागे पडले, नाना चौक ओलांडला, एकीकडे मी आणि टॅक्सीवाला काय झाले असावे यावर गप्पा मारत होतो. आता आम्ही विल्सन महाविद्यालय डाव्या अंगाला टाकत चौपाटीवर आलो आणि मरीन ड्राईव्ह वरून निघालो होतो. अचानक मला समोर एअर ईंडिया इमारतीत्च्या दिशेने धूराचे लोट दिसले. अरेच्चा! आग लागली वाटते? जरा पुढे येतो तो काय? हुतात्मा चौकाच्या दिशेनेही धूर! म्हटले आज अग्निशमन दलाला एका दिवसात वर्षाचे काम करावे लागणार असे दिसते!

असो. आपण आपल्या कामाला लागलेले बरे! आम्ही कफ परेडच्या दिशेने सुसाट निघालो होतो. रोज ठायी ठायी अडवणारी मुंबापुरी आज अगदी शहाण्यासारखी दिसली. वाहतुक म्हणतात ती अजिबात दिसली नाही. असे रस्ते रोजच मोकळे मिळाले तर? असा विचार मनात आला. चर्चगेट, बेर्बोर्न क्रिडागार जवळ आले आणि अचानक माणसांचे लोंढे दिसु लागले. सगळी गर्दी चर्चगेट स्थानकाच्या दिशेने हालत होती. जरा पुढे जातो तो काय? रस्ता बंदचा फलक आणि शिट्टी वाजवुन माघारी फिरा असे सांगणारे वाहतुक पोलिस दिसले. विचारल्या प्रश्नाचे कसलेही उत्तर न देता 'रस्ता बंद केला आहे' एवढे मोघम वाक्य ऐकवुन ते आपल्या कामाला लागले. 'अहो, मला काम आहे, तातडीने नरिमन पॉईंटला जायचे आहे' असे मी संगताच चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहत हवालदार उत्तरला - 'मग चालत जा'. नाईलाज होता. खरेतर नरिमन पॉईंट ते कफ परेड हे अंतर बरेच होते, चालत जाण्यासारखे नक्कीच नव्हते. मी टॅक्सीचे पैसे चुकते केले आणि पुढे दुसरी टॅक्सी पकडायच्या ईराद्याने पुढे निघालो. जरा पुढे येतो तो काय? रस्ते बंद केलेले, सर्वत्र कोलाहल आणि पोलिस दिसत होते. मी मार्ग बदलुन नरिमन पॉईंटच्या दिशेने निघालो. काही क्षणातच लक्षात आले की सगळी दुनिया उलट प्रवास करत आहे, मी एकटाच नरिमन पॉईंटच्या दिशेने चालत होतो.

अखेर मंत्रालय, शिपिंग कॉर्पोरेशन, मित्तल असे करीत करीत मी आमच्या नरिमन पॉईंट कचेरीच्या इमारतीच्या जवळ येउन पोचलो. रस्त्यावर एकही टॅक्सी दिसत नव्हती. लोक बसला लोंबत होते, नाही ते लगबगीने पायी निघाले होते. मला समजेचना की काय प्रकार आहे. आज या मुंबईला झालय तरी काय? लोक का पळताहेत? सगळ्या कचेर्‍या लवकर का बरे सोडल्या असाव्यात? मी विचार करत करत आमच्या कचेरीत दाखल झालो. इथेही शुकशुकटच होता! नाही म्हणायला रवी भेटला. रविंद्रन नायर, त्याला सगळे रवी म्हणत. 'काय यार रवी, काय लोचा आहे? मला खरेतर तीनला आय डी बी आय ला पोचायचे होते, पण पोपट झाला. काय प्रकार काय आहे?" असे म्हणताच रवीने मला एखाद्या पिशाच्चाला पाहावे तसा चेहरा करत मला निरखुन बघत म्हणाला, 'म्हणजे? तुम्हाला माहित नाही? अहो मुंबईत बाँब स्फोट सुरु झाले आहेत!" आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आधी वरळी, मग हुतात्मा चौक, मग एअर इंडिया इमारत.. आता सगळी मालिका जुळत होती, रस्त्याला वाहने का नव्हती, लोक स्थानकाच्या दिशेने का धावत होते, सगळा उलगडा होउ लागला. रवी मला जवळच्या एका कचेरीत घेउन गेला, तिथेले लोक आमच्या अर्थातच परिच्याचे होते. त्यांच्या कचेरीत दुरचित्रवाणीसंच सुरु होता. बातम्या ऐकताच अक्षरशः धक्का बसला. प्रथम घरी दूरध्वनी केला आणि कळवले की सुखरुप आहे, काळजी नको! ती सेवा खंडीत होण्याआधी ते केलेले बरे. त्याकाळी दूरध्वनी प्रतिक्षेनंतर मिळत असे, भ्रमणध्वनी दूरच राहिला.

अफवांचे पीक तेजीत होते. कुणी म्हणे पाकिस्तानचे हेर विध्वंसक अस्त्रे घेउन आत शिरले आहेत. कुणी म्हणे हे हल्ले असेच सुरु राहणार आहेत, हल्लेखोरांची ताकद किती हे कुणालाच माहित नव्हते म्हणे. आणखी एक अफवा निघाली ती म्हणजे हाज समितीची रुळालगतची इमारत म्हणे कोसळली होती आणि त्यामुळे लोहमार्गाचे अनेक चाकोरे बंद झाले होते. कुणी काही तर कुणी काही. आम्ही दिघे घरी जावे हे बरे असे म्हणत निघालो खरे. पण सरळ घरी गेलो तर मुंबैकर कसला? अशा गोष्टी काय पुन्हा पुन्हा घडतात काय? आलोच आहोत तर बघून जाउ म्हणत आम्ही एअर इंडियाच्या दिशेने निघालो. तसा मी ८४ च्या दंगलीत देखिल भटकलो होतो. अशा प्रसंगी वातावरण काही वेगळेच असते. रस्त्यात भेटेल तो आपला दोस्त! मात्र इथे आमची निराशा झाली. पोलिसांनी प्रेमळ भाषेत परत फिरायला सांगितले आणि त्यांचा प्रेमळ आग्रह मोडणे शक्यच नव्हते त्यामुळे धुमसणारी आग, धूराचे लोट, मधेच येणारे दबके स्फोटाचे आवाज, सर्वत्र पसरलेली राह, उडणारी कागदपत्रे, रस्त्यावरच्या दगड-विटा, धावणार्‍या रुग्णवाहिका हे सगळे बघत आम्ही परत फिरलो. पायी चालत जाताना दलाल मार्गवरचे समभाग विनिमय कार्यालय भक्ष्यस्थानी पडल्याचे ऐकुन तेही पाहायचा प्रयत्न केला मात्र लोकांना दुरुनच हाकलले जात होते, बरोबरच आहे म्हणा. उगाच रिकामटेकडे आणि गावाला उपद्रव असे लोक अशा ठिकाणी कशाला?

रात्री घरी येताच दूरदर्शनच्या बातम्या आणि मित्रांना दूरध्वनी करुन आपापले अनुभव सांगणे, आपण काय पाहिले, कसे आलो, कसे पोचलो याच गप्पा. जे घरी आले नव्हते त्यांच्या घरी प्रचंड चिंतेचे वातावरण, धीर देणारे शेजारी, सर्वत्र संपर्काचा सपाटा. रात्री सगळे मित्र बाहेर पडलो आणि तळ्यावर जमलो. प्रत्येक जण तावातावाने बोलत होता. एव्हाना सगळी माहिती समजत होती. दिडच्या सुमारास पहिला स्फोट झाला होता आणि अनेक तास ती दुष्ट मालिका सुरुच होती. समभाग बाजार, एअर इंडिया इमारत, जवेरी बाजार, सेंचुरी बाजार, पारपत्र कार्यालय, सेना भवन, प्लाझा, विमानतळाचे सेंटॉर हॉटेल, जुहु सेंटॉर हॉटेल, वांद्र्याचे सी रॉक हॉटेल, सहार विमानतळ परिसर असे स्फोट घडले होते. सरकारी आकडा आला नसला तरी शेकडो बळी गेले आणि हजारो जखमी झाले आणि एकुणच अत्यंत भीष्ण घटना घडल्याचे सर्वत्र जाणवत होते. लोक संतापले होते. जे कुणी यामागे असतील त्यांना खेचुन फासावर दिले पाहिजे असे घरोघर बोलले जात होते. गेले ते सर्वच निष्पाप जीव होते यावर सर्वांचे एकमत होते आणि म्हणुनच सगळेजण पोटतिडकीने शिव्याशाप देत होते. पुढे सगले सत्य उघडकीस आले. ड कंपनीचे परक्रम जगजाहीर झाले कुणी व का व कसे केले ते सार्‍या जगाला समजले. तपासाची आठ लाख कागदपत्रे तयार झाली. हजारो आरोपी, हजारो साक्षिदार. कुणी परके आरोपी तर कुणी घरचे! आपल्याच सरकारी अधिकर्‍यांनी - पोलिस/ सीमाशुल्क अधिकार्‍यांनी गलथानपणा व भ्रष्टाचार यापायी स्फोटके आत आणुन दिली हे ऐकताच मन विषण्ण झाले होते. रेंगाललेले खटले. काही अपराधी निजधामास गेलेले काही गलितगात्र झालेले.

मात्र या सगळ्यात लक्षात राहिले ते मुंबईचे वेगळेपण. दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईचे चकरमाने व चाकरमान्या पुन्हा एकदा जीवावर उदार होऊन फलाटावर उभे होते, आपली कचेरी गाठण्यासाठी! अवघ्या काही तासांपूर्वी असंख्य माणसे मृत्युमुखी पडली असतानाही जणु काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुंबैकर ताठ उभे होते. कुठुन आले हे धैर्य? शिवरायांकडुन? राणी लक्ष्मीबाईकडून? नाही. बहुधा ते आले होते मध्यमवर्गाच्या भूकेतून! कशासाठी? - पोटासाठी! कुणाला दोन घासाची भूक, कुणाला डोक्यावरच्या छपराची भूक, कुणाला चाळीतून 'फ्लॅट' मध्ये जायची तर कुणाला पोरबाळांच्या शिक्षणाची भूक. आणि या भूकेवर मात करायच्या दुर्दम्य इच्छाशक्तिच्या जोरावर मुंबैकरांनी मृत्युच्या छायेवर मात केली होती. वर्तमानपत्र घेतलेला चाकरमान्या आणि पदर खोचलेली चाकरमानी 'आज गाडीला गर्दी कमी असेल' असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सज्ज झाली होती. दुसर्‍या महायुद्धात जर्मन विमानांच्या हल्ल्यानंतर धीराने चर्चिलला पाठिंबा द्यायला येणार्‍या ईंग्रज जनतेच्या गोष्टी ऐकल्या होत्या पण ते सगळे इथे खुजे ठरले होते जणू!

काही दिवसातच मुंबईत प्रत्येक मोक्याच्या जागी भव्य जाहिरात फलक झळकले होते:

दि. १२ मार्च - मुंबईत भीषण स्फोटांची मालिका, मृत्युचे थैमान
दि. १३ मार्च - मुंबईतील कचेर्‍यांमध्ये ९७% उपस्थिती

सलाम मुंबई!!