डोळ्यांतल्या दिव्यांची का तेलवात झाली ?
दोघांतल्या गुजाची जाहीर बात झाली
मी डाव टाकला की तू फेकलेस जाळे ?
खेळात उभयतांची जिंकून मात झाली
आयुष्यरखरखाटा आच्छादलेस ऐसे
मध्यान्हिच्या१ उन्हाची पौर्णीम रात झाली
खुलली सुवर्णकांती अजुनी मदालसेची
हळदीत नाहली अन् सिंदूरस्नात झाली
जाता जवळ जरासा, रोमांचली नवोढा
धडधड अधीर, नूतन नवख्या उरात झाली
हाकी अरूण निर्दय वेगात रथ असा का
आरूढ ज्यावरी ही अरसिक प्रभात झाली ?
फुलुनी खुणावणारी होती फुलंही दोषी
अपकीर्ति पण अलीची रानावनात झाली
करता मिलिंद गुंजन अलगद मधास लुटतो
कुजबुज अशी फुलांची आपापसात झाली
१ : 'मध्यान्ह' या शब्दाचे 'मध्यान्हिच्या' हे रूप बरोबर आहे की 'माध्यान्हिच्या' याविषयी व्याकरणाच्या जाणकारांनी खुलासा/मार्गदर्शन करावे. वृत्ताच्या गरजेमुळे 'न्हि' हृस्व केलेला आहे. मूळ शब्द 'मध्यान्ह' असाच घेतला आहे, 'माध्यान्ह' नाही याची खुलासा करताना कृपया नोंद घ्यावी.