शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीत

नुकतेच श्रीमती किशोरी आमोणकर यांचे श्री. दत्ता मारुलकरलिखित चरित्र "गानसरस्वती " वाचायला मिळाले. त्यातील किशोरीताईनी नाट्यसंगीताबद्दल व्यक्त केलेले विचार असे आहेत,

" नाट्यसंगीताचा जास्त प्रभाव जर पडला तर शास्त्रीय संगीताची जी शान आहे, त्यात स्वरांच्या ज्या श्रुतिव्यवस्था आहेत त्याला जो दर्जा आहे तो खलास होईल असे माझे मत आहे. " त्या पुढे म्हणतात "तेच नाट्यसंगीत आमच्या गोव्यावर प्रभाव पाडून राहिलेलं आहे! मला या गोष्टीचं अतिशय दु:ख आहे. ---- नाट्यपदं नसती तर हेच शास्त्रीय संगीत अजून वाढीला लागलं असतं. महाराष्ट्रातील संगीतही खऱ्या अर्थानं मोठं झालं असतं. "  श्री. मारुलकरांनी " नाट्यसंगीताबाबत त्यांचे विचार काहीसे टोकाचे आहेत " असे म्हणून त्या मताचे खंडण किंवा मंडण करण्याचे टाळले आहे.

श्री. विनय हर्डीकर यांनी या पुस्तकास लिहिलेल्या पंचवीस पृष्ठांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेत मात्र किशोरीताईंपेक्षाही कडक शब्दात  नाट्यसंगीताची हजेरी घेतली आहे. ते म्हणतात, "विसाव्या शतकात विष्णू दिगंबर पलुस्करांच्या भजनातून आणि महाराष्ट्रात नाट्यसंगीतामधून शास्त्रीय संगीत लोकांपर्यंत जाऊ लागले आहे हे खरे आहे:पण आपल्याकडे भजनांना गर्दी जमत होती, जमत आहे व जमत राहणार आहे त्यात शास्त्रीय संगीताला फार मोठे श्रेयही देता येणार नाही व लाभही होणार नाही. नाट्यसंगीताने मात्र नाट्य व संगीत या दोन्हींची (शिवाय काव्याचीही ) वाट लावली "

श्री. विनय हर्डीकर यांनी प्रस्तावनेत असेही म्हटले आहे "गेल्या पन्नास वर्षातल्या कंठसंगीतामधल्या नायक (गायक नव्हे)कलाकारांची नावे द्यायला एका हाताचीच बोटे पुरेत. श्रीयुत मल्लिकार्जुन मन्सूर, उस्ताद अमीर खां, पंडित कुमार गंधर्व, श्रीमती किशोरी आमोणकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी एवढी नावे घेतल्यावर बाकी सगळी नावे सहाव्या बोटावर येतात. " त्यात त्यांना भारतरत्न भीमसेनजींचाही उल्लेख करावा वाटला नाही याचे कारण कदाचित भजनसदृश्य अभंगवाणीसारख्या कार्यक्रमाची लोकप्रियता त्यांनी वाढवली हे असावे. श्री. हर्डीकर यांच्या मते नायक कलाकार म्हणजे "शिस्त मोडायची नाही पण नावीन्य आणि वैचित्र्य यांची मागणी पुरवून शिवाय संगीतामध्येही भर घालायची" हे करणारे कलाकार.

या दोन्ही मतांचा एकत्रपणे विचार केल्यास ज्या पं. कुमार गंधर्व आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचा हाताच्या पाच बोटात हर्डीकर समावेश करतात त्याच कुमारांनी बालगंधर्वांच्या गायकीचा " मला उमजलेले बालगंधर्व " कार्यक्रम सादर करून नाट्यसंगीताचा व ते गाणारे बालगंधर्व या दोन्हींचाही गौरव केलेला आहे असे दिसते तर पं. जितेंद्रजीनीही नाट्यसंगीताला आगळा साज चढवला आणि ते स्वत:ही मैफिलीत आवडीने नाट्यगीते सादर करीत.

स्वतः उच्च दर्जाच्या गायिका असणाऱ्या किशोरीताई, समीक्षक श्री. हर्डीकर व सामान्य जनता यांच्या समजुतीमध्ये इतका टोकाचा विरोध पाहून माझ्यासारख्या शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीत दोन्हीवर सारखेच प्रेम करणाऱ्या रसिकाचा गोंधळ उडाल्याशिवाय राहत नाही. संगीत रसिक मनोगतींनीही आपले या विषयावरील (श्री विनय हर्डीकर किंवा किशोरीताईंविषयी नको ) विचार मांडावे असे वाटते.