थांबा की बाई - काय अशी घाई

थांबा की बाई
काय अशी घाई
विरहाग्नीने
सर्वांगाची होइल लाही  ।ध्रु।

सांज न ढळली तोच उठूनी जाऽता गडे
अकडुन ना जा आण तुम्हाला माऽझी जडे
छळ का असा
करता राजसा?
कोमल मी  फार जणू काय जुई-जाई ।१।
काय अशी घाई ...

खूप मला सांगायाचे, द्या सांऽगू तरी
प्रेमळ हृदयी जे साचे, द्या सांऽगू तरी
थांबा प्रिया
मजला संवरुद्या
आल्यापासून तुम्ही मज भानच नाही ।२।
काय अशी घाई ...

हेच मिळे फळ प्रीतिस का जरा आऽणा मनी
मी मरते ठावे न तुम्हा जरा आऽणा मनी
जाऊ नका
मन मोडू नका
कोणाला वाटेल किती ही दुष्टाई ।३।
काय अशी घाई ...

टीपाः
०. खालची एकही टीप वाचली नाही तरी गाण्याचा अर्थ लागण्यात चालीचा आनंद घेण्यात कसलीही अडचण येत नाही
१. अकडणे : तोऱ्यात, ताठ्यात वागणे (ह्या पानावर पाहा) पर्याय : तोऱ्यात न जा आण तुम्हाला .... किंवा ताठ्यात न जा आण तुम्हाला ....
२. मूळ गाण्यात येथे वेगळी वनस्पती आहे पण मराठीत कोमलतेसाठी त्या वनस्पतीपेक्षा जुईजाई जास्त योग्य वाटली (शिवाय यमकही जबरी जमले )
३. संवरणे : सावरणे  (ह्या पानावर पाहा) पर्याय : मला उजरु द्या ... (उजरणे : सावरणे (ह्या पानावर पाहा))
४. पर्याय : आल्यापासून तुम्ही मम चित्त न ठायी ... (उडत्या चालीच्या हलक्या फुलक्या गाण्यात येथे नायिकेच्या तोंडी 'मम' हा शब्द नको म्हणून यी च्या यमकाचा मोह आवरला.)
५. ह्याचा उच्चार चटकन जर् ... असा काहीसा करावा. मूळ गाण्यात तसाच आहे. (तसे नको असेल तर '..... हे आणा मनी' असे म्हणावे)
६.दुष्टाई : दुष्टपणा (ह्या पानावर पाहा)
७. शब्दशः भाषांतर  :  अंगाला विरहाची मेली टोचेल सुई


हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

ध्रुवपद :
गागागागागा - गागागागागा
गागागागागा - गागागागागा
गागागागा गागागागा गागागागा
कडवी :
गाललगागा गाललगागा* गाऽगालगा
गाललगागा गाललगागा* गाऽगालगा
गागालगा
गालगागालगा**
गागागा गागागागा गागागागा
*भाषांतरात दोन ठिकाणी गागागागा असे आहे - चालीत फरक नाही
** भाषांतरात सगळीकडे ललगागालगा असे आहे - चालीत फरक नाही.
(चाल उडती असल्याने अनेक गुर्वक्षरे चटकन म्हणून लघ्वक्षरांच्या वजनानेच आलेली आहेत.)

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक  ...  आई/आयी/आही असे काहीसे जमवा. यमकाची जागा ठळक केलेली आहेच.