वचन जे दिले ते - लागे जपावे

=========================
भाग १
=========================

नायक :
वचन जे दिले ते - लागे जपावे
अडवो जगाने तुज की - अडवो प्रभूने - तुजला लागेल यावे
वचन जे दिले ते - लागे जपावे... लागे जपावे ।ध्रु १।

झुरत्या कटाक्षांनी - दिली हाक आहे
प्रीतिपूर्ण श्वासांनी - दिली हाक आहे
लाजऱ्या प्रिये गं --- गोजिऱ्या प्रिये गं सोडुन झुरणे तुजला लागेल यावे ।१।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

नायिका :
कळे मज, जगाला - लागे मुकावे
परी जाण हे की तुझिया - बोलावण्याने मजला लागेल यावे ।ध्रु २।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

लागो न माझ्या - निष्ठेस लांच्छन
तुला अर्पिले मन - तुला प्राण अर्पण
घडे प्रीतिचा हा --- व्यवहार मग आता काय भिणे? तुजला लागेल यावे ।२।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

दोघे :
नभी चंद्र तारे - चमकतील जोवर
शपथ आपली ही - न भंगेल तोवर
तुला मी, मला तू --- बोलावताच पिसाटपणे अपुल्याला लागेल यावे ।३।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

===========================
भाग २ (हा भाग कुणाच्या तोंडी आहे ते कळले नाही. )
===========================

किती जीव जगती - रमवू बघे मी
वृथा किति समय हा - गमवू बघे मी
तुझ्यापासुनी मन --- विलगल्यावरी मग कसले रमणे? तुजला लागेल यावे ।४।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

===========================
भाग ३
===========================

नायक :
जगातील जनता - वदे आपल्याला
निवर्तून कोणी - न परतून आला
दिपवण्या जगाला --- जरा आज निष्ठेच्या विभवाने तुजला लागेल यावे ।५।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

नायिका :
कळे मज, जगाला - लागे मुकावे
परी जाण हे की तुझिया - बोलावण्याने मजला लागेल यावे
 ।ध्रु २।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

असू येत आधी - पुढे येत राहू
शपथ प्रीतिची ही - पुरी करत राहू
तुझी हाक येता --- प्राणप्रिया काय दुजे सुचणे? मजला लागेल यावे ।६।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

===============================
भाग ४
===============================

नायिका :
वचन जे दिले ते - लागे जपावे
अडवो जगाने तुज की - अडवो प्रभूने - तुजला लागेल यावे ।ध्रु १।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

नायक :
कळे मज, जगाला - लागे मुकावे
परी जाण हे की तुझिया - बोलावण्याने मजला लागेल यावे।ध्रु २।
वचन जे दिले ते - लागे जपावे...

नायिका :
कथा ही तुझी रे - नि माझी कहाणी
सदा सर्वदा ही - कथिल लोकवाणी
छळ घडो कि शासन --- असे व्हायचे अपुले येणे, अपुल्याला लागेल यावे ।७।
वचन जे दिले ते - लागे जपावे...


विविध पर्याय :

१ छळ घडो कि शासन --- सुनिश्चित असे अपुले येणे अपुल्याला गागाल गागा
१ छळ घडो कि शासन --- असे व्हायचे अपुले येणे अपुल्याला गागाल गागा
१ छळ घडो कि शासन --- असे आपले अविचल येणे अपुल्याला गागाल गागा
१ शिक्षा घडो की --- छळ आपले आहे येणे अपुल्याला गागाल गागा

टीपा :

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

लगागा लगागा - लगागा लगागा (भुजंगप्रयात) अशीच मुळात साधारण वृत्तरचना आहे. पण वृत्त सैलपणे वापरलेले आहे. लगागा ऐवजी गालगा किंवा गाऽगा किंवा लगागा-लगागा-गागा- गागा-लगागा ... असे अनेक फरक आहेत तरी चालीत गायला काही फरक पडत नाही. भाषांतरातही अशी मुभा जागोजाग घेतलेली आहे. दर कडव्याची शेवटची ओळ साधारणपणे लगागा लगागा .... लगागा लगागा गागा गागा गागा - गागाल गागा अशी आहे.

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे. ह्या गाण्याला दोन ध्रुवपदे आहेत. ध्रु१ आणि ध्रु२ ती कधी नायकाच्या तर कधी नायिकेच्या तोंडी आहेत.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदांचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...    ने/णे मजला/तुजला/अपुल्याला गागाल गागा!   असे जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहे.