महाभारत कथा
महाभारत फक्त एक घटना नाही तर अनेक घटनांची मालिका किंवा साखळी आहे ज्याचे पर्यवसान कुरुक्षेत्रावरील युद्धामध्ये होते. एका सामान कालखंडात, वेगवेगळ्या स्थळी घटना घडतात ज्या भविष्यातील आणखी काही घटना घडण्यासाठी कारणीभूत ठरतात. महाभारतात विविध गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा व्यक्तिरेखा आहेत. महाभारत केवळ आदर्शाच्याच कथा सांगत नाही तर खलप्रवृतींबद्दल सुद्धा भाष्य करते. महाभारतात काही सज्जन तर काही दुर्जन आहेत आणि त्यांचे एकमेकांशी ऋणानुबंध देखील आहेत. राज्यासाठी एकमेकांशी लढणाऱ्या एकाच राजघराण्यातील राजपुत्राची ही कथा नाही तर त्यात संपूर्ण भारतवर्षातील राजघराणी अनेक कारणाने जोडली गेलेली आहेत, त्यामुळेच ती संपूर्ण भारताची कथा आहे. महाभारतामध्ये सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही प्रवृत्तींचा समावेश आहे. निष्ठा, न्यायबुद्धीची आणि नीतिमत्तेची कसोटी लागलेली पाहायला मिळते. द्वेष, असूया, क्रौर्य, सत्ता आणि संपत्तीची लालसा असे सारे काही यात दिसते.
पितामह भीष्म हे महाभारतातील एक अलौकिक व्यक्तिमत्त्वं आहे. त्यांचे काही निर्णय इतिहासाची दिशा बदलणारे होते हे सत्य आहे. पंडूराजाच्या निधनानंतर पाच पुत्रांसह रानावनात राहणाऱ्या कुंतीला त्यांनी हस्तिनापुरामध्ये आमंत्रित केले आणि तिच्या पाचही पुत्रांचा पांडव म्हणून स्वीकार केला. या घटनेने धृतराष्ट्र आणि गांधारी यांना सावध केले कारण तोवर त्यांचा पुत्र दुर्योधन हाच राज्याचा वारस असणार होता. आता परिस्थिती अनिश्चित झाली होती, युधिष्ठिर ज्येष्ठ भ्राता होता आणि सिंहासनावर त्याचा प्रथम अधिकार होता जे धृतराष्ट्र आणि गांधारीला मान्य नव्हते.
धृतराष्ट्राच्या दरबारात आणखी एक व्यक्ती आहे, कदाचित त्याचे अस्तित्व महाभारत युद्ध घडण्यास कारणीभूत ठरले असावे असे समजण्यास प्रत्यवाय नाही. तो आहे गांधार देशाचा राजपुत्र शकुनी, जो महाराणी गांधारीचा बंधू आहे. शकुनीमामा महाभारत कथेतील खलनायक आहे, त्यानेच कौरवांना चुकीचा मार्ग स्वीकारायला उद्युक्त केले होते. लबाडी आणि कारस्थानी वृत्ती हे त्याचे मुख्य गुण. त्याव्यतिरिक्त द्यूतक्रीडेमधील त्याचे नैपुण्य वादातीत होते ... विशेषतः कपटाद्यूतामधील. कुरुसभेतील राजकारण धुरंधरांना आणि स्वतः पितामह भीष्मांना त्याच्या कारवाया, त्याची कट-कारस्थाने माहिती असणारच. असे असूनही कुरुदरबारामध्ये त्याचे स्थान अबाधित कसे राहिले असावे? त्याची पाठवणी त्याच्या राज्यात म्हणजे गांधार देशी का केली गेली नसेल? हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. सत्य हे आहे की शकुनीमामाच्या सल्ल्यांनी कुरू साम्राज्याचा सर्वनाश झाला होता.
शकुनीमामाला राजदरबारी महत्त्वाचे स्थान का होते? हे समजण्याकरता धृतराष्ट्रपत्नी गांधारीची कथा माहिती असणे आवश्यक आहे. गांधारीने तिला लाभलेले भाग्य, सौभाग्य म्हणून स्वीकारले. कधी कसली तक्रार न करता, कुणालाही दोष न देता. गांधारी कुरुसाम्राज्याची महाराणी होती पण महत्त्वाच्या प्रसंगी तिने कर्तव्य दृष्टीआड केले .. पुत्रप्रेमासाठी. धृतराष्ट्रानेही स्वपुत्रावर आंधळी माया केली. त्याचे अन्याय, दुराचार दुर्लक्षित केले. द्रौपदीचा भर सभेत अपमान होत असताना त्यांनी विरोध केला नाहीच पण अनाचार करणाऱ्या पुत्राची पाठराखणी केली होती.
महाभारत घडण्याचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकेल.
कुंतीदेवी पाच पुत्रांसह हस्तिनापुरामध्ये दाखल झाली होती. पितामह भीष्मांनी पांडवांच्या पालन, पोषण आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. शंभर कौरव आणि पाच पांडव यांच्या शिक्षणासाठी आचार्य द्रोण यांची राजगुरू पदावर नियुक्ती केली होती. आचार्य द्रोण त्यांच्या विद्वत्तेकरता आणि अस्त्र, शस्त्र, युद्ध विद्येच्या प्रभुत्वासाठी प्रसिद्ध होते. उच्चकोटीची गुणवत्ता असूनही द्रोणाचार्य आजवर जंगलातील कुटिरांमध्ये निष्कांचन आयुष्य जगत होते. द्रोण त्यांची पत्नी आणि पुत्र अश्वत्थामा यांच्यासह हस्तिनापूर नगरीमध्ये वास्तव्याकरता आले होते. द्रोणाचार्य श्रेष्ठ गुरु होते आणि राजपुत्राच्या शिक्षणाची जबाबदारी ते निष्ठेने आणि उत्तम रीतीने निभावत होते.
बाह्यतः सर्व काही आनंदी आणि सुरळीत भासत होते. कौटुंबिक एकोपा आणि जिव्हाळ्याचे दर्शन होत होते. सर्व राजपुत्र एकाच गुरुकुलामध्ये शिक्षण घेत होते, धृतराष्ट्र आणि गांधारी सिहासनाधिष्ठित होते, आमात्य विदुर, पितामह भीष्म प्रजाहित, राज्यहितासाठी दक्ष होते, आणि एकाकी विधवा कुंतीला राजाश्रय प्राप्तं झालेला होता.
वरकरणी शांत आणि सुस्थिर दिसणाऱ्या जलाशयाच्या अंतरंगामध्ये कितीतरी गुपिते लपलेली असतात, कदाचित एखादे वादळ घोंगावत असते. कुरुकुळातील दोन बंधूंच्या कुटुंबात द्वेष आणि असूया यांचा उपज झालेला होता. भविष्यात उद्भवणाऱ्या वारसा हक्काच्या निवाड्यासाठी कलहाची बीजे रोवली जात होती.
गुणतालिकेमध्ये पांडवांचे श्रेष्ठत्व निर्विवाद होते. पांडवांच्या स्वभावामध्ये शालीनता होती, नम्रता होती. राजपुत्र असूनही त्यांना सत्ता आणि संपत्तीचा उन्माद नव्हता. प्रजाजनांसमोर, सामान्यांशी त्यांनी कधीही उद्दाम वर्तन केलेले नव्हते. कौरव राजपुत्राचे स्वभाव आणि गुण मात्र त्याविरुद्ध होते. प्रजाजनांमध्ये दुर्योधन अप्रिय होता, आणि युधिष्ठिराची लोकप्रियता दिनप्रतिदिन वाढतच होती. भविष्यामध्ये घडणाऱ्या महाभारताची ती नांदीच होती.
***